
- टर्निंग पॉइंट : युवराज अवसरमल
संगीत म्हटलं की, स्वर आणि ताल यांचं विलक्षण मिश्रण आणि सृजनशील मिश्रण करणारे संगीतकार नेहमीच प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण करत असतात. रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्याच्या वाटचालीत असणारा संगीतकार ऋषी बी. आपल्या शब्दांनी आणि स्वरांनी महाराष्ट्रातल्या मनामनाचा ठाव घेण्यासाठी सिनेसृष्टीत जोमाने पदार्पण करत आहे. ‘इंटरनॅशनल फालमफोक’ या धमाकेदार मराठी चित्रपटाचे गीत त्याने शब्दबद्ध आणि संगीतबद्ध केले आहे.
शालेय जीवनापासून त्याला संगीताची आवड निर्माण झाली. पुढे इंजिनीअरिंगला त्याने प्रवेश घेतला; परंतु संगीताची ओढ त्याला शांत बसू देईना. शेवटी त्याने गाणे स्वरबद्ध करण्याचे काम सुरू केले. त्याच्या आईच्या एका कवितेचे गाण्यात रूपांतर त्याने केले. त्याला स्वरबद्ध करण्यात तो यशस्वी ठरला. गाण्याला उत्तम स्वरबद्ध करता येते याची त्याला जाणीव झाली. ‘इथेच आहे’ हे पहिले गाणे त्याने स्वरबद्ध केले. ‘भिमानं सोण्यानं भरली वोटी’ हे गाणे केले.गायिका काळूबाईचे पहिले गाणे त्याने रेकॉर्ड केले. त्यानंतर हिंदी भाषेत बैरागी, बेखबर ही गाणी स्वरबद्ध केली. ट्रिंग ट्रिंग, दादा लय दमदार, जिगरचा तुकडा, माझे माऊली गो, थाटामाटात, माझ्या गोविंदा रे, तुझी नवरी, तुझ्या विना देवा, अंबे जगदंबे, मेरी जाना अशा प्रकारच्या अनेक गाण्यांना त्याने स्वरबद्ध केले.
इंटरनॅशनल फालमफोक या मराठी चित्रपटाचे लेखक एकदा ऋषीकडे आले. त्या चित्रपटाला त्यानेच संगीत द्यावे अशी त्याने गळ घातली. या गोष्टीचा त्याला अभिमान वाटला. मिळालेल्या संधीचे त्यानं सोनं केलं. या चित्रपटातील प्रेरक गाण्याला त्याने स्वरबद्ध केलं. हा त्याच्या जीवनातला टर्निंग पॉइंट ठरला.
भविष्यात एक मोठं प्रोजेक्ट करण्याचा त्याचा मानस आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक राज्याच्या बोलीभाषेला घेऊन गाणे करण्याची त्याची इच्छा आहे. गायक संगीतकार अजय गोगावले यांनी गायलेल्या गाण्याला स्वरबद्ध करण्याची त्याची इच्छा आहे. गायक अवधूत गुप्ते, संगीतकार ए. आर. रेहमान, गायक अमित त्रिवेदी, गायक सलीम सुलेमान हे संगीत क्षेत्रातील दिग्गज त्याचे आवडते आहेत व त्यांच्यासोबत काम करण्याची त्याची इच्छा आहे. ही त्याची इच्छा पूर्ण होवो, हीच शुभेच्छा!