भिवंडी : राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकार बेकायदेशीर सरकार असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी केले होते. याबाबत संवाद यात्रेनिमित्त भिवंडीत आलेल्या भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारणा केली असता २०१९ मध्ये राज्यात अस्तित्वात आलेले सरकार हे कायदेशीर होते का? असा सवाल केला.
त्यावेळी शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना सोबत घेऊन बेकायदेशीर सरकार स्थापन केले होते. शरद पवार यांचा पक्ष २०१९ मध्ये चौथ्या स्थानावर असतानाही सत्तेत होता. त्यामुळे शरद पवार यांनी आताचे सरकार बेकायदेशीर म्हणणे चुकीचे असून शरद पवारांना या वयात षडयंत्र करणे शोभत नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीत शरद पवारांनी खंजीर खुपसला व आमच्या सोबत असलेल्या उद्धव ठाकरे यांना सोबतीला घेऊन स्वतः बेकायदेशीर सत्ता स्थापन केली, अशी टीका देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी पवारांच्या प्रतिक्रियेवर केली आहे.