विठ्ठल जरांडे
गेल्या अनेक वर्षांपासून चीन सणासुदीच्या काळात भारतीय बाजारपेठेत सुमारे एक लाख कोटी रुपयांचा व्यवसाय करत आहे. अलीकडे मात्र भारताने लादलेल्या काही अटींमुळे चीनने आपले गुप्तहेर भारतीय बाजारपेठेत कामाला लावून आणि इतर अनेक देशांमधील ‘शॅडो’ कंपन्यांच्या माध्यमातून गुप्तपणे ऑर्डर मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यांच्या माध्यमातून चीन आपला माल भारतीय बाजारपेठेत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे.
भारतात दिवाळीच्या हंगामात मोठी उलाढाल होत असते. या काळात चिनी उत्पादने मोठ्या प्रमाणात भारतीय बाजारपेठेत येत असतात. चीनने काश्मीर, लडाख, अरुणाचल प्रदेशमध्ये केलेल्या घुसखोरीमुळे तसेच संयुक्त राष्ट्रात आणि जागतिक व्यासपीठावर घेतलेल्या भारतविरोधी भूमिकांमुळे भारतात चिनी मालावर बहिष्कार घालून ‘मेक इन इंडिया’ मोहिमेला चालना देण्याचे हत्यार गेल्या काही वर्षांपासून उपसले जात आहे. त्याचा किती फायदा होतो, हा संशोधनाचा भाग असला तरी आता बहिष्कारास्त्र निकामी करण्याची नवी चाल चीनने खेळली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून चीन सणासुदीच्या काळात भारतीय बाजारपेठेत सुमारे ८५ हजार कोटी ते एक लाख कोटी रुपयांचा व्यवसाय करत आहे; परंतु भारताने लादलेल्या काही अटींमुळे अनेक चिनी कंपन्या आणि त्यांच्या उत्पादनांनास भारतीय बाजारपेठेत पोहोचण्याची संधी मिळत नाही. सरकारच्या कठोर नियमांमुळे अनेक कंपन्या अस्वस्थ आहेत. एक लाख कोटी रुपयांचा व्यवसाय हिसकावून घेतल्याने चीन धास्तावला आहे, चिडला आहे. त्याने आपले गुप्तहेर भारतीय बाजारपेठेत उतरवले आहेत. स्थानिक बाजारपेठेत त्यांचा माल विकण्यासाठी गुप्तपणे ऑर्डर मिळवणे हा त्यांचा उद्देश आहे. यासाठी चीनने इतर अनेक देशांमध्ये आपल्या ‘शॅडो’ कंपन्या स्थापन केल्या आहेत. त्यांच्या माध्यमातून चीन आपला माल भारतीय बाजारपेठेत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. भारतीय व्यापारी जागरूक झाल्यामुळे आणि भारतीय उत्पादनांना अधिक संधी देत असल्याने या सणासुदीच्या हंगामात चिनी वस्तूंना मागणी कमी आहे. यामुळेच चीन चिंतेत आहे. मात्र भारतानेही सावध राहण्याची गरज आहे.
सणासुदीच्या काळात भारतीय गुप्तचर यंत्रणांनी इशारा दिल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यात म्हटले आहे की चीनचे एजंट नेपाळमधील नागरिकांच्या नावाने कागदपत्रे तयार करून घेत आहेत. त्या आधारे ते भारतात प्रवेश करतात. भारतीय बाजारपेठेत घुसण्याचा त्यांचा उद्देश आहे. त्यांना भारतीय कंपन्यांच्या हातून सणाचा हंगाम कोणत्याही प्रकारे हिसकावून घ्यायचा आहे. गेल्या काही वर्षांप्रमाणे यंदाही सणासुदीमध्ये चिनी वस्तूंचा महापूर आला पाहिजे, हा त्यांचा उद्देश आहे. चिनी एजंट भारतीय बाजारपेठेत येत आहेत. ते व्यापाऱ्याना स्वस्तात माल देण्याचे आमिष दाखवत आहेत. मालाची ऑर्डर घेण्यासाठी ते अनेक प्रकारच्या सवलतींची आश्वासने देत आहेत. व्यापाऱ्यांचे सर्व गणित नफ्याच्या अानुषंगानेच आखले जात असते. पुरेसा नफा मिळत नसल्याने ठरावीक व्यवसायात हात न घालणारे अनेक व्यापारी उत्तम नफा समोर दिसताच थोडी धावपळ करून, जास्त कष्ट उपसून का होईना, दलालांच्या चालींना बळी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच दलाल मंडळींचे व्यापाऱ्यांना भरीस पाडणारे प्रयत्न तपासण्यासाठी स्थानिक सुरक्षा यंत्रणांना सतर्क करण्यात आले आहे.
‘कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’ (कॅट)ने चीनच्या अशा कृतींना चोख प्रत्त्युत्तर देण्याचा इशारा दिला. ‘कॅट’ने सणासुदीच्या काळात स्वस्तात वस्तू विकून उत्तम कमाई करु पाहणाऱ्या आपल्या सर्व सदस्यांना चिनी कंपन्यांच्या जाळ्यात न अडकण्याची सूचना केली आहे. दरम्यान, केंद्र सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ मोहिमेची फळे आता दिसू लागली आहेत. आता बहुतांश वस्तू भारतातच बनवल्या जात आहेत. अशा स्थितीत चीनला फायदा होण्याचे कोणतेही औचित्य नाही. भारतीय बाजारपेठेत चिनी एजंट दाखल झाल्याची चर्चा खरी असेल, तर ‘कॅट’ त्यासाठी तयार आहे. सर्व व्यापाऱ्यांना कोणत्याही कंपनीशी व्यवहार करण्यापूर्वी त्यांची सर्व कागदपत्रे तपासून घेण्यास सांगण्यात आले आहे. व्यवहार करत असलेल्या कंपनीला भारत सरकारकडून मंजुरी मिळाली आहे की नाही, ती कंपनी जीएसटी संदर्भातील सर्व अटी पूर्ण करत आहे की नाही आदी बाबींची खातरजमा करण्याबाबत संघटना व्यापाऱ्यांना बजावत आहे. एखाद्या व्यावसायिकाला काही शंका असल्यास त्यांनी संबंधित विभाग किंवा एजन्सीला कळवण्याचा निर्णयही ‘कॅट’ने घेतला आहे.
चीन आपला माल भारतीय बाजारपेठेत आणण्यासाठी इतर देशांची मदत घेत असल्याचेही दिसून येत आहे. तैवान, बांगलादेश, नेपाळ, म्यानमार या देशांमध्ये ‘शॅडो’ कंपन्या स्थापन केल्या जात आहेत. त्यांच्या माध्यमातून ते आपली उत्पादने भारतीय बाजारपेठेत पाठवण्याची तयारी करत आहेत. रक्षाबंधनापासून सुरू होणाऱ्या सणासुदीच्या हंगामात दिवाळीपर्यंत सुमारे तीन लाख कोटी रुपयांचा व्यवसाय अपेक्षित आहे. गेल्या काही काळामध्ये दुष्काळी राज्ये वगळता अन्य बाजारपेठांमध्ये उलाढाल वाढली आहे. गेल्या वर्षी या हंगामात सुमारे अडीच लाख कोटी रुपयांचा व्यापार झाला होता. नवरात्री, रामलीला, दसरा, दुर्गा पूजा, करवा चौथ, धनत्रयोदशी, दिवाळी, गोवर्धन पूजा, भाई दूज, छठपूजा आणि तुळशी विवाह या सणांचा हंगाम असतो. या हंगामात ग्राहकांच्या मागणीनुसार देशभरातील व्यापार्यांनी मोठ्या प्रमाणात माल उपलब्ध करून देण्याची मोठी तयारी केली आहे. भारतातील बाजारपेठांमध्ये किरकोळ विक्रीला हातभार लावणारे अंदाजे ६० कोटी ग्राहक आहेत. या अंदाजानुसार प्रति व्यक्ती केवळ पाच हजार रुपये खर्चाचा अंदाज लावला तर तीन लाख कोटी रुपयांचा आकडा अगदी सहज गाठता येऊ शकतो. या पार्श्वभूमीवर घरगुती वस्तू, उपकरणे, भेटवस्तू, कपडे, दागिने, नकली दागिने, भांडी, सजावटीच्या वस्तू, फर्निचर आणि फिक्श्चर, भांडी, ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल्स, मोबाइल, लॅपटॉप, संगणक आणि उपकरणे, इलेक्ट्रिकल वस्तू, मिठाई आदी वस्तूंच्या खरेदीसाठी ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात खर्च करणे अपेक्षित आहे. इथेच चिनी वस्तूंना मोठी बाजारपेठ मिळते. त्यामुळे त्यांची विक्री करण्यासाठी बाजारपेठेत शिरकाव करणाऱ्या दलालांचा प्रयत्न सुरू होतो.
देहरादूनच्या विविध बाजारपेठांमध्ये चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मोहीम सुरू झाली आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये चिनी वस्तूंच्या व्यवसायात घट झाल्यानंतर या दिवाळीमध्ये पुन्हा त्यांची मागणी वाढली आहे. चीनमध्ये उत्पादित इलेक्ट्रिक झुंबर आणि इतर सजावटीच्या वस्तू मुबलक प्रमाणात विकल्या जात आहेत. सर्वसामान्यांची दिशाभूल करण्यासाठी चिनी वस्तूंच्या बॉक्सवर ‘मेरा भारत महान’सारखी घोषवाक्ये छापून विक्री केली जात आहे. २०१७ मध्ये भारत आणि चीनमध्ये झडलेला डोकलाम वाद आणि त्यानंतर २०१९ मध्ये लडाखमधील गलवान खोऱ्यात चिनी सैन्याची घुसखोरी आणि भारतीय सैनिकांवरील हिंसाचाराच्या निषेधार्थ चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचा ट्रेंड देशभरात सुरू झाला. या संदर्भात गेल्या दोन वर्षांमध्ये देहरादूनमधील सणांच्या वेळी चीनमध्ये बनवलेल्या वस्तूंना बाजूला सारण्यात आले. व्यापारी आणि नागरिकांनी चिनी उत्पादनांपेक्षा भारतीय उत्पादनांना प्राधान्य दिले; पण या वेळी या शहरात चिनी उत्पादनांचा व्यवसाय फोफावताना दिसत आहे. पलटन बाजार, धामावाला, मोती बाजार, प्रेमनगर, राजपूर, जाखन, रायपूरसह अनेक ठिकाणी चिनी वस्तूंची बिनदिक्कत विक्री सुरू आहे. चिनी वस्तू स्वस्त असल्याने लोक मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत, तर अधिक नफा मिळवण्यासाठी व्यापारीही मोठ्या प्रमाणात चिनी वस्तू मागवत आहेत.
भारतात बनवलेल्या सजावटीच्या वस्तू महाग असल्याने फारशा विकल्या जात नाहीत. अशा परिस्थितीत व्यापाऱ्यांना चिनी बनावटीच्या वस्तू विकणे भाग पडले आहे. अनेक लोक चिनी वस्तूंची मागणी करत असल्याचेही आढळले आहे. स्वस्त असण्याबरोबरच त्या आकर्षकही असतात. चिनी वस्तूंच्या बॉक्सवर बरेचदा ‘माय इंडिया’ असे लिहिलेले असते. सर्वसामान्यांची दिशाभूल करून या वस्तू विकल्या जात आहेत. बाजारात विकल्या जाणाऱ्या बहुतांश चिनी वस्तूंच्या बॉक्सवर ‘मेरा भारत महान’ किंवा ‘मेक इन इंडिया’चा उद्घोष दिसतो, जेणेकरून ग्राहक ते भारतीय उत्पादन समजून खरेदी करतात. चीनमधून येणाऱ्या वस्तूंचे पॅकिंग भारतातच केले जाते. अशा परिस्थितीत या वस्तूसाठी भारतीय बॉक्सवर वरील संदेश छापण्यात आले आहेत. याशिवाय कागदापासून बनवलेले चिनी दिवेही बाजारात विकले जात आहेत. त्यांची किंमत १५० ते ५०० रुपयांदरम्यान आहे. चिनी रंगाच्या बल्बलाही मोठी मागणी आहे. तथापि, या वस्तूंची कोणतीही हमी नाही. अशा परिस्थितीमध्ये चिनी वस्तूंचा गनिमी काव्याला साजेसा शिरकाव आणि व्यापारीवर्गाची अधिकाधिक नफ्याची वृत्ती रोखायला हवी.