Friday, May 9, 2025

महामुंबईताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

मुंबई शहराच्या २५२ कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्प अहवालास मान्यता

मुंबई शहराच्या २५२ कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्प अहवालास मान्यता

मुंबई शहर महिला सुरक्षितता उच्च शक्ती प्रदत्त समितीची बैठक


मुंबई : मुंबई शहर महिला सुरक्षितता पुढाकार योजनेची उच्च शक्ती प्रदत्त समितीची बैठक आज अप्पर मुख्य सचिव (गृह) यांच्या दालनात झाली. बैठकीला अपर मुख्य सचिव (गृह) सुजाता सौनिक, पोलीस आयुक्त विवेक फणसळकर आदी उपस्थित होते. बैठकीत मुंबई शहरासाठी एकूण २५२ कोटी रुपये इतक्या खर्चाच्या प्रकल्प अहवालास मान्यता मिळाली आहे.


देशात महिला सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने केंद्र शासनातर्फे निर्भया निधी अंतर्गत विविध उपाययोजना राबविण्यात येतात. या निर्भया निधी अंतर्गत ‘निर्भया – सेफ सिटी’ ही योजना देशातील ८ शहरात राबविली जात आहे. या केंद्र पुरस्कृत योजनेमध्ये राज्यातील बृहन्मुंबई शहराचा समावेश आहे.


उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेची अंमलबजावणी अधिक गतीने व परिणामकारकरित्या करण्याचे निर्देश दिले आहेत. बैठकीत मुंबई शहरात महिला सुरक्षिततेच्या अनुषंगाने पोलीस आयुक्त, मुंबई यांच्या स्तरावर झालेल्या निविदा प्रक्रियेच्या अनुषंगाने कार्यादेश देण्याचा निर्णय घेण्यात आला.


या मान्यतेमुळे मुंबई पोलिसांना गुन्ह्यांच्या तपासासाठी सायबर साहित्य उपलब्ध होईल. यामुळे महिलांवरील गुन्ह्यांच्या संदर्भात प्रतिसाद कालावधी कमी होईल. तसेच मुंबई पोलिसांना मोबाईल डाटा टर्मिनस व गुन्ह्याच्या स्थळांच्या चित्रीकरणासाठी साधने उपलब्ध होतील. जनतेच्या माहितीसाठी डिजिटल बोर्डच्या उभारणीस देखील बैठकीत मान्यता देण्यात आली. याव्यतिरिक्त पोलिसांना प्रशिक्षण व्यवस्था व वाहतूक पोलिसांनाही स्मार्टफोन देण्याचा बैठकीत निर्णय घेण्यात आला. अत्याधुनिक उपकरणे तसेच पोलिसांना प्रशिक्षणामुळे पोलीस प्रशासनातील क्षमता वृद्धिंगत होवून दोषसिध्दीचे प्रमाण वाढण्यास मदत होईल. या उपाययोजनांच्या माध्यमातून मुंबई शहर महिलांसाठी अधिक सुरक्षित होणार आहे, असा विश्वास यावेळी अपर मुख्य सचिव श्रीमती सौनिक यांनी व्यक्त केला.

Comments
Add Comment