Friday, May 9, 2025

कोकणमहाराष्ट्रराजकीयमहत्वाची बातमी

Nilesh Rane : 'टायगर इज बॅक' म्हणत निलेश राणे यांचे सिंधुदुर्गात जोरदार स्वागत!

Nilesh Rane : 'टायगर इज बॅक' म्हणत निलेश राणे यांचे सिंधुदुर्गात जोरदार स्वागत!

आज झाराप ते कुडाळ निघणार भव्य रॅली


कणकवली : दसर्‍याच्या दिवशी २४ ऑक्टोबरला भाजपा नेते आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी राजकारणातून (Politics) निवृत्ती (Retirement) घेत असल्याचे ट्विट केले होते. अनेक माध्यमांतून त्यांच्या निवृत्तीविषयी अनेक तर्कवितर्क लावण्यात आले. पण दुसर्‍याच दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि मंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavhan) यांनी निलेश राणे यांची भेट घेऊन मध्यस्थी केली. त्यामुळे निलेश राणे यांनी पुन्हा राजकारणात सक्रिय होत असल्याची घोषणा केली.


कार्यकर्त्यांची कामे होत नसल्याने निलेश राणे नाराज झाले होते आणि त्या नाराजीतून त्यांनी निवृत्ती घ्यायचे ठरवले होते. मात्र, त्यांची नाराजी लवकरच दूर करणार असल्याचे रवींद्र चव्हाण यांनी सांगितले. निलेश राणे यांनी राजकारणातून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर मात्र त्यांचा बालेकिल्ला असलेल्या संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात याचे पडसाद उमटले होते. त्यांना भेटण्यासाठी व समजूत काढण्यासाठी कार्यकर्त्यांनी कणकवली येथे प्रचंड गर्दी केली होती. मुंबईवरुनही अनेक कार्यकर्ते कणकवलीच्या दिशेने निघाले होते.


दरम्यान, आता निलेश राणे यांनी निवृत्तीची घोषणा मागे घेतल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे. आज दुपारी साडेतीन वाजता झाराप येथे निलेश राणे यांचे जोरदार स्वागत करण्यात येणार आहे. झारापहून बांधा, पत्रादेवी ते कुडाळ अशी भव्य रॅली काढण्यात येणार आहे. त्यांच्या स्वागतासाठी 'टायगर इज बॅक' अशी बॅनरबाजी करण्यात आली आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या कडेने हे बॅनर्स लावण्यात आले आहेत. निलेश राणे यांच्या जोरदार कमबॅकसाठी कार्यकर्ते उत्सुक आहेत. त्यांच्या कमबॅकमुळे कार्यकर्त्यांची न होणारी कामे आता ताबडतोब केली जातील, यात शंका नाही.


निलेश राणेंचे मुंबई गोवा महामार्गावरील झाराप झीरो पॉईन्ट येथे जंगी स्वागत केल्यानंतर झारापवरून निघणारी रॅली कुडाळ भाजप कार्यालयापर्यंत काढण्यात येणार आहे. कुडाळ येथे निलेश राणे कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. गेल्या काही दिवसांत विरोधकांनी केलेल्या आरोपांना निलेश राणे सडेतोड उत्तर देण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment