Thursday, July 25, 2024
Homeताज्या घडामोडीMaratha Reservation : मराठा आरक्षणासाठी एकाच दिवसांत तिघांची आत्महत्या

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी एकाच दिवसांत तिघांची आत्महत्या

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा दिवसेंदिवस तापला असून राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन केले जात आहे. याचवेळी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मागील काही दिवसांत अनेकांनी टोकाचे पाऊल उचलत आपले जीवन संपवले. तर, गुरुवारी मराठवाड्यात एकाच दिवशी तिघांनी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या (Suicide) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

जालना येथील अंतरवाली टेंभी गावातील शिवाजी किसन माने (वय ४५), छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील आपतगाव येथील गणेश काकासाहेब कुबेर (वय २८) आणि हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील देवजना लहू उर्फ कृष्णा यशवंतराव कल्याणकर (वय २५) यांनी आपले जीवन मराठा आरक्षणासाठी संपवले.

जालन्यातील घनसावंगी तालुक्यातील अंतरवाली टेंभी गावात सुरू असलेल्या साखळी उपोषणात सहभागी असलेल्या मराठा तरूणाने आत्महत्या केली. उपोषण सुरु असताना सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास मंडपातून उठून थेट घर गाठत दरवाजाच्या कोंड्याला दोरी लावून गळफास घेत शिवाजी किसन माने या तरुणाने आत्महत्या केली. सरकारला वेळ देऊनही मराठ्यांना आरक्षण मिळत नसल्याने मुलांचे शिक्षण करू शकत नाही, या नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याचे निकटवर्तीयांनी सांगितले.

तिकडे छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील आपतगाव येथे एका मराठा तरुणाने गुरुवारी दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केली. गणेश काकासाहेब कुबेर असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे. “जोपर्यंत आरक्षण भेटत नाही, तोपर्यंत माझ्या शरीराला जाळू नका,” असा मजकूर आत्महत्या करण्यापूर्वी त्याने पाटीवर लिहून ठेवला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले (चार व सहा वर्षाची) आई-वडील व भाऊ असा परिवार आहे. त्यांना दोन एकर शेती असून या शेतीच्या उत्पन्नावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह ते भागवत होते. दरम्यान, या घटनेनंतर गावकरी आक्रमक झाले. त्यांनी धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील आपतगाव फाट्यावर रास्ता रोको करून टायर देखील पेटवण्यात आले.

तिस-या घटनेत, हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील देवजना येथे लहू उर्फ कृष्णा यशवंतराव कल्याणकर या युवकाने शेतातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. त्याच्या खिशामध्ये एक चिठ्ठी सापडली आहे. त्यामध्ये मी मराठा आरक्षणामुळे जीव देत आहे, असा उल्लेख आहे. या घटनेबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -