देशात प्रदूषणात दिल्ली आघाडीवर आहे. त्या पाठोपाठ आता मुंबईच्या प्रदूषणाने देखील उच्चांकी पातळी गाठली आहे. देशाची आर्थिक राजधानी आणि सतत धावणारे, सर्वांना सामावून घेऊन त्यांचा सांभाळ करणारे, त्यांना हात देणारे शहर म्हणून ख्याती असलेल्या मुंबई शहराचा हवेचा दर्जा खालावत आहे. हे शहर प्रदूषणाच्या विळख्यात सापडले आहे. हे शहरच नव्हे, तर त्याच्या आसपासचा भाग म्हणजे एमएमआर रिजन किंवा महामुंबई परिसर म्हणा हा वाढत्या प्रदूषणामुळे सध्या गुदमरतोय, ही सर्वात मोठी चिंतेची बाब आहे. या वाढत्या प्रदूषणावर तातडीने नियंत्रण आणणे गरजेचे असून त्या दृष्टीने उपाययोजना युद्धपातळीवर हाती घ्यायल्या हव्यात. वाढत्या प्रदूषणामुळे मुंबईच्या हवेची गुणवत्ता वारंवार खालावत चालली आहे. सध्या मुंबई आणि परिसरातील हवा अत्यंत वाईट असल्याची नोंद झाली आहे. देशातील प्रदूषित शहर अशीच ख्याती असलेल्या दिल्लीपेक्षाही मुंबईतील प्रदूषणाचे प्रमाण अधिक आहे.
मुंबईच्या हवेचा दर्जा काही वेळा दिल्लीच्या हवेशी स्पर्धा करतो. त्यामुळे हे धुरके आहे की धुके? असा प्रश्न मुंबईकरांना बरेचदा पडतो. अलीकडेच एका अहवालानुसार, जगातील सर्वात प्रदूषित शहरांमध्ये मुंबईची गणना झाली आणि तमाम मुंबईकर आणि परिसरात राहणाऱ्यांचा मुखभंग झाला. विशेष म्हणजे पावसाळ्यात हवेचा दर्जा काहीसा सुधारला होता. मात्र मोसमी पावसाने मुंबईचा निरोप घेताच पुन्हा एकदा मुंबईच्या हवेत प्रदूषके साचून राहू लागली आहेत. मुंबईला गेले काही दिवस धुरक्याने वेढले आहे. मुंबईतील प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे. मुंबईतील प्रदूषणाचे प्रमाण वाढत असल्याचे विविध संस्थांनी सादर केलेल्या अहवालांतून स्पष्ट होत आहे.
दरवर्षी साधारणपणे थंडीची चाहूल लागताच मुंबईच्या हवेचा दर्जाही ढासळू लागतो. गेल्या वर्षी डिसेंबर, यंदा जानेवारी, फेब्रुवारीमध्ये मुंबईच्या हवेची स्थिती वाईट झाली, ती अगदी मार्च अखेरपर्यंत होती. पावसाळ्यानंतर मुंबईतील वाऱ्यांची स्थिती बदलते, वेग मंदावतो. त्यामुळे हवेत साचलेली धूळ, प्रदूषके यांचा निचरा होत नाही. बाष्पामुळे धूलिकण हवेतच तरंगत राहतात. या नैसर्गिक कारणांबरोबच अनेक मानवनिर्मित कारणेही मुंबईच्या प्रदूषणात भर घालत आहेत. पायाभूत सुविधांची मोठ्या प्रमाणात उभारणी, रहिवासी आणि व्यावसायिक संकुले, नवे प्रकल्प यांची बांधकामे विपुल प्रमाणावर सुरू आहेत. त्यातून उडणारी धूळ हवेचा दर्जा ढासळण्यास कारणीभूत ठरते. त्याचप्रमाणे वाहनांतून बाहेर पडणाऱ्या धुरांमध्ये अति-अतिसूक्ष्म काजळीसारखे कण असतात. हे कण एकत्र येऊन वातावरणातील प्रदूषण वाढविण्यास कारणीभूत ठरतात. अगदी सरधोपटपणे सांगायचे, तर हवेतील प्रदूषकांचे प्रमाण किती यावर हवेचा गुणवत्ता निर्देशांक निश्चित होतो. तसेच धुरक्याचे किंवा धूलिकणांचे प्रमाण वाढून दृश्यमानतेची पातळी घसरते.
मुंबईतील हवेमध्ये वाढणारे प्रदूषण गेल्या काही दिवसांपासून त्रासदायक ठरत आहे. धुरक्यामुळे घसा, नाक यावर परिणाम होत असून ॲलर्जीच्या खोकल्याचा त्रास होत आहे. मुंबईकरांना होणारा कफ, खोकला हा साधा नसून काही आठवडे, महिने हा कफ टिकून राहिला असल्याचे दिसते. काही अस्थमा रुग्णांना देण्यात येणारी इनहेलर वापरल्यानंतर दिलासा मिळत आहे. परदेशात हवेची गुणवत्ता दोन आकडी झाली की, स्थानिकांमध्ये अस्वस्थता निर्माण होते. मात्र आपण त्यापेक्षाही अधिक वाईट गुणवत्ता असतानाही बाहेर फिरतो. याचा परिणाम म्हणून नाकाचे, श्वसनाचे विकारही वाढत आहेत.
मुंबईत अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बांधकामे सुरू आहेत. परिणामी मुंबईतील बांधकामांतून माती, सिमेंटचे कण मोठ्या प्रमाणात हवेत मिसळतात. तसेच वारेमाप वाढललेल्या वाहनांच्या संख्येमुळे, कारखान्यांमधून येणारा धूर व रसायनांमुळे प्रदूषणाचे प्रमाण वाढत आहे. त्यावर निर्बंध आणणे गरजेचे आहे. शहरात जवळजवळ २४ तास बांधकामे सुरू असतात, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्यातील मुख्य कारण म्हणजे महामुंबई क्षेत्रात सर्वत्र सुरू असलेली मेट्रोची कामे. या कामांमुळे वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात होते. त्याचबरोबर ध्वनी प्रदूषणही प्रचंड प्रमाणात होत आहे, ही वस्तुस्थिती आहे. याकडे संबंधितांनी लक्ष देणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे कामाच्या वेळा निश्चित करणे गरजेचे आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांचे पालन केले जात आहे का? याची खात्री करण्याची आवश्यकताही आहे. मुंबईतील वाढत्या धुरक्यावर उपाय म्हणून मुंबईत धुरके शोषक यंत्रे (ॲन्टी स्मॉग गन) बसवण्याची घोषणा करण्यात आली आहे. या यंत्रातून पाणी फवारले जाते. त्यामुळे काही प्रमाणात धूळ जमिनीवर बसते. दिल्लीमध्ये २०१७पासून अशा यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. मात्र त्याच्या परिणामकारतेबाबत अनेक मतमतांतरे आहेत. प्रदूषण नियंत्रणात मोठ्या कंपन्या तसेच छोट्या-मोठ्या उद्योगांनी आणि नागरिकांनीही सहभाग घेण्याची गरज आहे. वाहनांचे प्रदूषण, अनेक ठिकाणी सुरू असलेल्या इमारतींच्या बांधकामांमुळे होणारे प्रदूषण यावर कसे नियंत्रण मिळवता येईल, हे पाहावे लागणार आहे.
रासायनिक कंपन्यांमधील प्रदूषण, जैविक कचरा जाळणे, स्मशानभूमीतील धूर तसेच डम्पिंग ग्राऊंडमुळे होणाऱ्या प्रदूषणावर उपाययोजना कराव्या लागणार आहेत. शहराची शान असलेल्या चौपाट्यांच्या स्वच्छतेच्या दृष्टीने वेगळेगळे कार्यक्रम राबविण्याची गरज आहे. मुंबईत सध्या सहा हजार ठिकाणी बांधकामे सुरू आहेत. या बांधकामांवेळी नियमांचे पालन होत नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात धूलिकण हवेत पसरतात आणि हवा प्रदूषित होते. त्याचबरोबर मुंबईतील विविध वायू प्रकल्प, रिफायनरी यातूनही वायुप्रदूषण होत आहे. हे प्रदूषण कमी करण्यासाठी मुंबई महापालिकेकडून काही सूचना देण्यात आल्या आहेत. काही कंपन्या आणि उद्योग प्रदूषण रोखण्यासाठी पुढाकार घेण्यासाठी तयार आहेत. तसेच प्रदूषण रोखण्याबाबत मुंबई महापालिकेने काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यामुळे प्रदूषण रोखण्यात यश येईल आणि धुरक्यात गुदमरणाऱ्या स्वप्ननगरीला प्रदूषणमुक्त करण्यात यश येईल, हे निश्चित.