जनार्दन पाटील
अलीकडच्या काळात प्रबोधनाला, कीर्तनाला विनोदाचे स्वरूप दिले जात आहे. गंभीरपणे सांगण्याच्या गोष्टी घसा खरवडून सांगितल्या जात आहेत. अशा वेळी बाबामहाराजांचे जाणे वारकरी संप्रदायासाठी हानीकारक आहे. वारकरी संप्रदाय विद्रोही विचारांचा असला, तरी अकांडतांडव करणारा नाही. मने बदलण्यावर विश्वास ठेवणारा आहे. मोठमोठ्याने विव्हळल्यासारखे बोलणे म्हणजे कीर्तन नव्हे. कीर्तन, निरुपणात प्रासादिकता, गेयता, लयबद्धता असावी लागते. ती एकाएकी येत नाही. त्याला रियाज, सराव करावा लागतो. आज बाबामहाराज यांच्या निधनाच्या वार्तेनंतर हे वास्तव ठळकपणे जाणवते. बाबा महाराजांच्या पिढीत आजपर्यंत कोणी वारी चुकवली नाही. आजोबा दादा महाराज, वडील भाऊ महाराज त्यानंतर बाबा महाराज आणि पुढे मुलगी भगवतीताई, नातू चिन्मय महाराज अशी समर्थ पिढी वारकरी संप्रदायाच्या प्रचार-प्रसाराचे कार्य करत आहे. बाबामहाराजांनी अगदी सोप्या आणि साध्या शब्दांत लोकांचे प्रबोधन केले.
आनंदी राहण्यासाठी काय करावे, आयुष्यात यशस्वी होण्यासाठी काय करावे, यासारख्या अनेक विषयांवर बाबामहाराज सातारकर यांनी मार्गदर्शन केले. आपल्या अनोख्या शैलीत बाबामहाराज सातारकर कायम प्रबोधनाचे काम करत असत. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी काय करावे या कीर्तनातून त्यांनी यशाचे रहस्य सांगितले आहे. यशस्वी होण्यासाठी सतत परमेश्वराच्या स्मरणात असणे गरजेचे असते. ते म्हणायचे, ‘विचार चांगले ठेवा, चांगलेच होणार. विचारच तुमच्या यशस्वी जीवनासाठी महत्त्वाचे आहेत. बाबामहाराज आपल्या कीर्तनातून कायम वेगवेगळ्या विषयांवर मोकळेपणाने बोलायचे. विचारांची ताकद खूप महत्त्वाची असल्याचे ते आपल्या कीर्तनातून सांगत, ‘आयुष्य बदलवणारे सुंदर विचार तुमचे संपूर्ण आयुष्य बदलवू शकतात. याकरता सुंदर विचार, सकारात्मक विचार, परमेश्वराचे स्मरण करणारे विचार अतिशय महत्त्वाचे ठरतात. या विचारांचे भान कसे ठेवायचे हे समजून घेणे गरजेचे असते. जीवनात कितीही यशस्वी झालात, तरी मी पणा नसावा.
मी पणाच्या मागे अहंकार, क्रोध, उद्धटपणाची भावना आहे. यामुळे जीवनात यशस्वी होणे कठीण होते. जीवनात यशस्वी होत असताना आपल्यामागे कोण आहे, ‘मी’च्या मागे कोण आहे, हे समजून घेणे गरजेचे आहे. कोणतेही यश संपादन करताना कायम परमेश्वराचे स्मरण करावे, असेदेखील ते सांगत. प्रभूवर प्रेम करणे म्हणजे परमार्थ नव्हे, तर प्रभूच्या प्रेमाची प्रचिती घेणे म्हणजे परमार्थ.’ असे बाबामहाराज सातारकर यांचे विधान परमेश्वराची खरी प्रचिती करून देते. बाबा महाराजांचे वडील ज्ञानेश्वर दादामहाराज गोरे हे उत्कृष्ट मृदंगवादक होते. त्यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई ज्ञानेश्वर गोरे यांना संत साहित्याची आवड होती. चुलते आप्पामहाराज आणि अण्णामहाराज यांच्याकडून त्यांनी परमार्थाचे धडे घेतले.
वयाच्या आठव्या वर्षांपासून बाबा महाराज श्री सद्गुरू दादामहाराज यांच्या कीर्तनात अभंगांच्या चाली म्हणत असत. वयाच्या अकराव्या वर्षांपासून त्यांनी पुरोहितबुवा, आग्रा घराण्याचे लताफत हुसेन खाँ साहेब यांच्याकडे शास्त्रीय गायनाचे धडे घेतले. १९५० ते १९५६ या काळात बाबा महाराज सातारकर यांनी फर्निचरचा व्यवसाय केला होता. त्यातून कसे बाहेर पडले, हे त्यांनी सांगितले होते. ते म्हणाले की, १९५६ मध्ये माझा पाच ते सहा लाखांचा फर्निचरचा व्यवसाय होता. पण मी तो व्यवसाय थांबवला. जवळ जे काही होते, ते कवडीमोल दरात विकले. त्या काळाबद्दल ते सांगतात, मी वडिलांना सांगितले की, ज्याला भांडवल लावले आहे ते विकून टाकू आणि ज्यासाठी रक्त ओकले आहे ते टिकवून धरू. प्रारब्धात असेल ते होईल. असे सांगत मी हा व्यवसाय बंद केला आणि कीर्तन करू लागलो. फर्निचर विकून मी पैसा कमवला असता. काही लोकांपर्यंत माझे जीवन सीमित झाले असते; परंतु वारकरी संप्रदायाची गुढी उभी धरल्याने आज जग मला ओळखते, असे त्यांनी सांगितले होते. बाबा महाराज म्हणाले होते, ‘फर्निचरचा व्यवसाय बंद केला नसता, तर मला कोट्यवधी रुपये मिळाले असते. पण व्यापारी म्हणून मला लोकांनी ओळखलेही नसते. आज माझे जगभरात नाव आहे ते माझ्या दुकानात चांगली खुर्ची मिळते म्हणून नाही तर वारकरी आहे म्हणून. वारकरी झालो त्याचीच फलश्रुती आहे.’ वारकरी संप्रदाय सर्वांना बरोबर घेऊन चालतो. स्तुती करत नाही आणि निंदाही करत नाही. दुसऱ्याच्या निंदेवर उभी असलेली तुमची इमारत कच्ची आहे, हेच आमचा वारकरी संप्रदाय सांगतो.
बाबा महाराजांनी कीर्तन, प्रवचनातून श्रोत्यांना अध्यात्माची गोडी लावली. त्यांच्या मधुर आवाजात ‘जय जय राम कृष्ण हरी’ हे भजन ऐकणे म्हणजे पर्वणीच! त्यांच्या कीर्तनाला गावागावातून हजारोंचा जनसमुदाय गोळा होत असे. त्यांच्या रसाळ वाणीने श्रोतागण मंत्रमुग्ध होत असे. शास्त्र, पुराण, संतसाहित्य, सामाजिक, राजकीय विषयांची सरमिसळ करत ते श्रोत्यांना तासन्तास जागेवर खिळवून ठेवत असत. आजच्या मोबाइल युगातही व्हीडिओच्या माध्यमातून त्यांचे कीर्तन-प्रवचन ऐकणाऱ्यांची कमतरता नाही. एवढेच नव्हे, तर अनेक घरात सायंकाळी बाबामहाराजांच्या स्वरातील हरिपाठाबरोबर दिवेलागण होते. बाबामहाराज सातारकर यांनी आयुष्यभर वारकरी संप्रदायाचे ब्रीद आणि त्याला जोडून आलेली पथ्ये पाळली. ज्ञानोबारायांनी पांडुरंगाला केवळ देव मानले नाही, तर मायबाप मानले. हा जिव्हाळा जसा माउलींच्या ठायी होता, तसा आपल्या ठायी निर्माण व्हावा, म्हणून प्रति वर्षी आपण वारीला जातो. वारी हे केवळ भेटीचं निमित्त. त्यानिमित्ताने वारकरी एकत्र येतात, भजन कीर्तन करतात, सत्संग घडतो. पण पांडुरंगाचे दर्शन रोज घडावे असे वाटत असेल, तर त्याचा शोध मनाच्या गाभार्यात घेतला पाहिजे. त्यासाठी तुळशी माळ घालावी. माळ घातली की सद्गुणाकडे वाटचाल सुरू होते. आचार, विचार शुद्ध होतात. आधी आचार म्हणजे आचरण सुधारते. मग आपोआप विचारही शुद्ध होऊ लागतात.
विठ्ठलाच्या मंदिरात जायला बंदी का नाही, याचे कारण बाबा महाराज सातारकर यांनी सांगितले होते. ते म्हणाले होते की, पुंडलकाची आई-वडिलांची भक्ती पाहून विठ्ठल स्वतः त्याच्याकडे आला. ही केवढी मोठी सामाजिक घटना आहे. ज्याला आई नाही आणि बाप नाही तो पांडुरंग. कारण पांडुरंगच सगळ्यांचा आई-बाप आहे. विठ्ठल बाप, माय, चुलता. विठ्ठल भगिनी आणि भ्राता विठ्ठल आमचे जीवन. आगम निगमाचे स्थान, विठ्ठल आमचा निजाचा. सज्जन सोयरा जिवाचा. माय, बाप, चुलता, बंधू अवघा तुझसी संबंधू! समर्पिली काया तुका म्हणे पंढरीराया! हे तुकाराम महाराजांनी म्हणून ठेवले आहे. या भूमिकेतून विठ्ठलाचा अवतार आहे. त्यामुळे विठ्ठलाच्या मंदिरात जायला बंदी नाही. काही काळ होती; सानेगुरुजींनी ती हटवली, असे बाबामहाराज सातारकर यांनी एका मुलाखतीत सांगितले होते.
वारकरी संप्रदायात एकनाथांनी दाखवून दिले की कुणीही श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नाही. ज्याच्यामध्ये ईश्वराचे अस्तित्व आहे, तो पवित्रच आहे. जीवनात उलटसुलट गोष्टी घडणारच. परिपूर्णतेने सुखी कोण आहे? कुणीच नाही; पण ज्या उणिवा वारीत भरून निघतात. सगळ्या गोष्टींशी जुळवून घ्यायला पंढरीची वारी शिकवते. सहनशीलता वारी शिकवते. वारीतली सहनशीलता घरी आली, तर ‘अवघाची संसार’ झालाच म्हणून समजा. विठ्ठलाशी एकरूप होऊन त्याचा विचार सगळ्यांपर्यंत पोहोचवणारे बाबामहाराज सातारकर यांनी आता जगाचा निरोप घेतला आहे. मात्र प्रवचनांमधून ते कायमच आपल्याबरोबर राहतील, यात शंका नाही.