राज्यात २७ ऑक्टोबर ते ९ डिसेंबर या कालावधीत विशेष संक्षिप्त मतदार पुनरीक्षण कार्यक्रम राबवणार
मुंबई : येत्या निवडणुकांमध्ये मताधिकार बजावण्यासाठी नवमतदारांनी नाव-नोंदणी करावी, असे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी मुंबईत प्रारूप मतदार यादी प्रकाशन कार्यक्रमात बोलतांना आवाहन केले आहे. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर आणि मतदार नोंदणी कार्यालयात प्रारूप यादी प्रकाशित करून यंदाच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा आज २७ ऑक्टोबर रोजी प्रारंभ करण्यात आला. हा कार्यक्रम २७ ऑक्टोबर ते ९ डिसेंबर या कालावधीत राज्यात राबवला जाणार आहे.
१ जानेवारी २०२४ रोजी किंवा त्याआधी १८ वर्षं पूर्ण केलेले नागरिक या कालावधीत मतदार नोंदणी करू शकतात. प्रारूप मतदार यादीमध्ये आपले नाव आहे किंवा नाही याची मतदारांनी खात्री करणे आवश्यक आहे. तसेच आपले नाव, पत्ता, लिंग, जन्मदिनांक, वय, ओळखपत्र क्रमांक, मतदारसंघ इत्यादी तपशील सुद्धा अचूक आहेत का, याची खात्री करून घ्यावी, असे आवाहन देशपांडे यांनी केले आहे. तपशिलात दुरुस्त्या करायच्या असतील तर त्यांनी अर्ज क्रमांक आठ भरावा.
समाजातील काही वंचित घटकातील नागरिकांची नोंद करण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. 18 व 19 नोव्हेंबर रोजी महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला व दिव्यांग व्यक्तिंसाठी विशेष शिबिरे राबवली जाणार आहेत. तृतीयपंथी व्यक्ती, शरीरविक्रय करणाऱ्या महिला, भटक्या विमुक्त जमातींसाठी 2 आणि 3 डिसेंबर या दिवशी शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. त्यामुळे कोणतीही कागदपत्रे नसली तरी मतदार नोंदणी करता येणार आहे. ग्राम विकास व पंचायतराज विभागाच्या सहकार्याने 1 ते 7 नोव्हेंबर या कालावधीत राज्यभरात विशेष ग्रामसभेचे आयोजन केले जाणार आहे. तसेच ग्रामसभांमध्ये मतदार याद्यांचे वाचन केले जाईल.
5 जानेवारी 2023 च्या अंतिम मतदार यादी मध्ये राज्यात एकूण 9 कोटी 2 लाख 64 हजार 874 इतकी मतदार संख्या होती. 27 ऑक्टोबर रोजी प्रकशित झालेल्या मतदार यादीतील एकूण मतदार संख्या 9 कोटी 8 लाख 32 हजार 263 एवढी आहे. युवा मतदारांची नोंदणी वाढवण्यासाठी महाविद्यालयांमध्ये विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येईल. 100 टक्के मतदार नोंदणी केलेल्या आणि मतदार जागृतीचे उपक्रम राबवणाऱ्या महाविद्यालयांना उत्कृष्ट मतदार-मित्र महाविद्यालय पुरस्कार दिले जाणार आहेत अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली आहे.