Tuesday, October 8, 2024
Homeताज्या घडामोडीWestern Railway Megablock : सहाव्या मार्गिकेचं काम मुंबईकरांसाठी ठरणार डोकेदुखी

Western Railway Megablock : सहाव्या मार्गिकेचं काम मुंबईकरांसाठी ठरणार डोकेदुखी

पश्चिम रेल्वे लोकलच्या रोज सुमारे ३०० फेर्‍या होणार रद्द

एकूण २७०० लोकल आणि ४५ एक्स्प्रेस फेर्‍या होणार रद्द

मुंबई : मुंबईकरांसाठी (Mumbaikars) काही दिवसांकरता त्रासदायक ठरणारी बातमी नुकतीच समोर आली होती. ती म्हणजे मुंबईकरांची जीवनवाहिनी असणाऱ्या पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) दररोज सुमारे ३०० फेर्‍या काही काळासाठी रद्द होणार आहेत. हा काळ उद्यापासूनच सुरु होत असल्याने आता मुंबईकरांना रेल्वेच्या वेळा पाहूनच घराबाहेर पडावे लागणार आहे, अन्यथा धावपळीत अजून धावपळ होऊ शकते. २७ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबरपर्यंत हा ब्लॉक असणार आहे.

पश्चिम रेल्वे वरील तब्बल २७०० पेक्षा जास्त लोकल (Local) २७ ऑक्टोबर पासून ते ५ नोव्हेंबरच्या काळात रद्द करण्यात येणार आहेत. पश्चिम रेल्वेवरील खार आणि गोरेगाव दरम्यान दरम्यान ८.८ किमीची सहावी मार्गिका सुरु करण्यासाठी मुख्य जोडकाम २७ ऑक्टोबरपासून सुरू होईल आणि ५ नोव्हेंबरपर्यंत हे काम सुरु राहील. यामुळे दररोज ३०० पेक्षा अधिक सामान्य लोकलसह वातानुकूलित लोकल फेऱ्या रद्द होणार आहेत. तसेच ३०० पेक्षा जास्त लोकल या विलंबाने धावतील.

पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते विरार/डहाणू रोडदरम्यान दररोज १३८३ लोकल फेऱ्या धावतात. या लोकलमधून दररोज २० ते ३० लाख प्रवासी प्रवास करतात. प्रवाशांची संख्या एवढी प्रचंड असल्याने लोकल रद्द होणे म्हणजे प्रवाशांना एका कठीण परिक्षेलाच तोंड द्यावे लागणार आहे. शिवाय चार आणि पाच तारखेला म्हणजेच शनिवार आणि रविवार जोडून २४ तासांचा एक जम्बो मेगाब्लॉक देखील घेण्यात येईल. त्यामुळे पाच तारखेपर्यंत पश्चिम रेल्वे वरील प्रवाशांची डोकेदुखी वाढणार आहे.

उद्यापासून ते ३१ ऑक्टोबरपर्यंत वातानुकूलित लोकलच्या दररोज ९ फेऱ्या रद्द राहणार आहेत. त्यामुळे एसी लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. १ नोव्हेंबरपासून वातानुकूलित लोकल फेऱ्या रद्द करण्याबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. तसेच एसी लोकलच्या तिकीट-पासवर साध्या लोकलच्या प्रथम श्रेणीतून प्रवास करण्याची मुभा प्रवाश्यांना देण्यात आली आहे.

ब्लॉक कालावधीदरम्यान रेल्वेचं वेळापत्रक पाहून घराबाहेर पडण्याची सूचना वारंवार रेल्वे स्थानकांवर देखील करण्यात येत आहे. शिवाय हे वेळापत्रक प्रत्येक स्थानकाच्या स्टेशन मास्तरांकडे उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच प्रवाशांच्या गैरसोयीसाठी रेल्वेकडून दिलगिरी देखील व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान मेल एक्स्प्रेस प्रमाणे लोकल सेवांवर देखील या ब्लॉकचा परिणाम होणार असल्यामुळे चाकमान्यांना देखील मोठ्या त्रासाला समोरे जावे लागणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -