Tuesday, December 3, 2024
Homeताज्या घडामोडीLawyer Gunaratna Sadavarte : वकील सदावर्तेंच्या गाडीची तोडफोड; म्हणाले, मनोज जरांगेंच्या मुसक्या...

Lawyer Gunaratna Sadavarte : वकील सदावर्तेंच्या गाडीची तोडफोड; म्हणाले, मनोज जरांगेंच्या मुसक्या बांधा!

आम्ही याचं समर्थन करत नाही : मनोज जरांगे

नेमकं प्रकरण काय?

मुंबई : मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) मुद्दा दिवसेंदिवस चिघळत असतानाच आता वकील गुणरत्न सदावर्ते (Lawyer Gunaratna Sadavarte) यांच्यासोबत आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. आज सकाळी साडेसहाच्या सुमारास परळ येथील क्रिस्टल टॉवरमध्ये असणाऱ्या त्यांच्या घराबाहेर उभ्या असणार्‍या गाडीची तीन अज्ञात लोकांनी तोडफोड केली. ही तोडफोड मराठा समाज आरक्षणासाठी आंदोलन करणार्‍या कार्यकर्त्यांकडून करण्यात आल्याचा आरोप सदावर्तेंनी केला आहे. शिवाय गेले काही दिवस त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना वारंवार धमक्या येत आहेत, असा दावाही सदावर्ते यांनी केला आहे. गाडीची तोडफोड केल्याप्रकरणी तिघांना भोईवाडा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

वकील गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल केली होती, ज्यामुळे मराठा आरक्षण रद्द झालं होतं. हे दोघेही त्यातील मुख्य याचिकाकर्ते असल्याने वकील सदावर्ते यांच्याबाबत मराठा समाजामध्ये रोष असल्याचं चित्र आहे. तसेच, याचाच राग मनात ठेवून मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी सदावर्तेंच्या गाडीची तोडफोड करण्यात आल्याचं बोललं जात आहे. दोन दिवसांपूर्वी काही मराठा आरक्षण संघटनांनी सदावर्तेंतच्या परळ येथील घराबाहेर उपोषण केलं होतं. त्यानंतर दोन दिवसांनी सदावर्तेंच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. पोलिसांकडून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

गाडीची तोडफोड करणारे तिन्ही तरुण संभाजीनगरचे असल्याची माहिती मिळत आहे. यामुळे संतप्त होऊन वकील सदावर्ते यांनी या प्रकरणी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांना दोषी ठरवत अटक करण्याची मागणी केली आहे. सदावर्ते म्हणाले की, “हल्लेखोरांना आणि त्यासोबतच मनोज जरांगेंना मला प्रश्न विचारायचाय, हीच आहे का तुमच्या शांततामय आंदोलनाची व्याख्या? मला सायलेंट केलं जाऊ शकत नाही. ५० टक्के जागा, ज्या खुल्या वर्गासाठी असतात, त्या वाचवण्यासाठी माझा लढा आहे. या देशाला जातीजातीत न तोलता गुणवत्तेत तोललं जावं, यासाठी माझा लढा आहे. माझ्या कष्टाचं आणि घामाचं तुम्ही नुकसान केलं. यापूर्वी ३२ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मारहाण तुम्ही केली. त्यासंबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारण नसताना कारवाई करण्यात आली. तेव्हापासूनच मला अनेक प्रकारच्या धमक्या दिल्या जात आहेत, असं सदावर्ते म्हणाले.

माझी मुलगी आठ दिवसांपासून शाळेत गेली नाही…

माझी मुलगी झेन गेल्या आठ दिवसांपासून शाळेत जात नाही. कारण तिलाही मारण्याच्या आणि माझ्या पत्नीला उचलून नेण्यापर्यंत मला धमक्या येत आहेत. अशा प्रकारचे हल्ले, असा आघात होईल, आम्हाला त्रास दिला जाईल, असं सांगणारे फोन, व्हिडीओ रेकॉर्डिंग, सोशल मीडियावरच्या धमक्या आम्हाला येत आहेत. असाही खुलासा गुणरत्न सदावर्ते यांनी केला.

…तर मी या क्षणापासून प्राणांतिक उपोषण करेन

जरांगे तुम्हाला मी सांगतो, देवेंद्र फडणवीसांनाही सांगतो, महाराष्ट्रात अशा अघटित घटनांची श्रृंखला पोलिसांवरील हल्ल्यापासून झाली, ती आज माझ्या घरात येऊन ठेपली. आता बस्स झालं, ज्या माणसामुळे पोलीस धारातीर्थी पडले, अशा या जरांगेला तातडीनं अटक करा, मुसक्या बांधा, कारवाई करा अन्यथा सर्व गुणवंतांना वाटेल की, अशा प्रकारे जात म्हणून एकत्र आलं तर तोडमोड केली जाऊ शकते. पण मी थांबणार नाही, या क्षणानंतर मीसुद्धा राज्यभरातील महाविद्यालयांमध्ये जाऊन खुल्या गुणवंत विद्यार्थ्यांशी चर्चा करेल आणि मी सरकारला सांगेन की, एकट्या जरांगेचं ऐकायचं नाही, आमचंही ऐकायचं. आणि जरांगेंचे लाड थांबवले नाही, तर मी या क्षणापासून प्राणांतिक उपोषण करेन, असंही सदावर्ते म्हणाले आहेत.

मनोज जरांगे काय म्हणाले?

दरम्यान, या हल्ल्याचे आम्ही समर्थन करत नाही, अशी भूमिका जरांगेंनी घेतली आहे. मनोज जरांगे म्हणाले की, नेमकं काय झालं आहे, त्याबद्दल मला काहीच माहित नाही. मराठा समाज शांततेत आंदोलन करत आहे. जर सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला झाला असेल, तर त्याचे आम्ही समर्थन करत नाही. तसेच, सदावर्ते यांच्याबद्दल आम्हाला काहीच बोलायचं नाही. या हल्ल्यासाठी ते कोणाचे देखील नाव घेतील. उद्या ते देवेंद्र फडणवीस यांचे नाव देखील घेतील. आम्ही कसे उपोषण करावे याबद्दल त्यांनी सांगण्याची गरज नाही. त्यांनी त्यांचे पाहावे. मराठा समाजाला उचकवण्याचा प्रयत्न सदावर्ते करतात. त्यामुळे आम्हाला त्यांच्याबद्दल काहीच बोलायचं नाही, असं जरांगे म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -