माझगाव न्यायालयाने याचिका फेटाळली
मुंबई : ठाकरे गटाचे (Thackeray Group) मुखपत्र असलेल्या ‘सामना’ (Saamana) या वृत्तपत्रातून शिवसेनेचे आमदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांच्याविरोधात आक्षेपार्ह मजकूर छापल्याचा आरोप शेवाळे यांनी केला होता. या प्रकरणी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि खासदार व सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दोषमुक्तीचा अर्ज दाखल केला होता. मात्र, हा अर्ज फेटाळून लावत माझगांव न्यायालयाने त्यांना मोठा धक्का दिला आहे. त्यामुळे या प्रकरणात ठाकरे व राऊतांना कोणताही दिलासा मिळाला नसून त्यांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
राहुल शेवाळे यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या विरोधात आपली बदनामी झाल्याचा आरोप करत मानहानीची याचिका दाखल केली होती. या याचिकेविरोधात उद्धव ठाकरे, संजय राऊत यांनी या प्रकरणातून दोषमुक्तीसाठी अर्ज केला होता. सदर अर्जावर दोन्हीही पक्षांचा पूर्ण युक्तीवाद झाला. न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता.
अखेर न्यायालयाने हा दोषमुक्तीचा अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना दिलासा मिळाला नाही. माझगांव महानगर दंडाधिकारी कोर्टामध्ये आज सुनावणी पूर्ण झाली. यावेळी कोर्टाने हा निर्णय दिला. न्यायाधीश एस बी काळे यांनी हा निकाल दिला आहे.
शिवसेनेमध्ये फूट पडल्यापासून मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि ठाकरे गट यांच्यातील संघर्ष कायम आहे. दोन्ही गट एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत असतात. बंड झाल्यापासून ठाकरे गटाच्या अनेक मोठमोठ्या नेत्यांचा मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेत पक्षप्रवेश सुरु आहे. त्यामुळे ठाकरे गटाला अनेक धक्के पचवावे लागत आहेत. त्यातच आता राहुल शेवाळे मानहानी प्रकरणामुळे ठाकरे गटाच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.