मुंबई : महाराष्ट्र आणि कर्नाटकात गुरुवारी पहाटे झालेल्या चार अपघातांत मृतांचा आकडा २४ वर पोहचला आहे.
बीड आणि पुणे जिल्ह्यात झालेल्या वेगवेगळ्या अपघातांत १२ जणांचा मृत्यू झालेला असताना कर्नाटकातही एसयुव्ही गाडी टँकरवर आदळून चिक्कबळ्ळापूरमध्ये १२ जणांचा मृत्यू झाला.
बुधवारी रात्रीपासून अपघातांचे सत्र सुरु झाले आहे. कडा-धामणगावकडून अहमदनगरकडे जात असलेल्या एका ट्रकला रुग्णवाहिकेने पाठीमागून जोरात धडक दिली. या भीषण अपघातात रुग्णवाहिकेतील डॉक्टरसह चौघांचा जागीच मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे.
दुसऱ्या अपघातात मुंबईवरून बीडकडे जात असलेल्या सागर ट्रॅव्हल्सच्या बसचा ताबा सुटल्याने सकाळी सहाच्या दरम्यान पलटली. यात सहा जणांचा मृत्यू झाला.
पुण्याच्या पाटस हद्दीतील घाट परिसरात टायर फुटून रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या सिमेंटच्या ट्रकला लक्झरी बस आदळून अपघात झाला. पहाटे साडेचारच्या दरम्यान हा अपघात घडला असून यामध्ये दोन मृत्यू तर पंधरा जखमी झाले आहेत.
तर एका थांबलेल्या टँकरला एसयूव्हीने धडक दिल्याने १२ जण ठार झाले आहेत. एसयूव्ही बागेपल्ली ते चिक्कबल्लापूरला जात होती. यात चार महिलांसह १२ प्रवासी जागीच ठार झाले. एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत, असे पोलिसांनी सांगितले.
रस्त्यावर अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस प्रचंड प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे अपघात रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी सातत्याने केली जात आहे. अंतर लवकर पार करण्याच्या नादात अपघात घडत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या गोष्टींकडे लक्ष देण्याची आणि वाहतुकीचे नियम पाळण्याची गरज आहे.