Friday, October 17, 2025
Happy Diwali

कराड स्फोटाचे गूढ कायम! ९ गंभीर जखमी; घरातील तिन्ही सिलिंडर सुरक्षित!

कराड स्फोटाचे गूढ कायम! ९ गंभीर जखमी; घरातील तिन्ही सिलिंडर सुरक्षित!

कराड : कराड शहरातील मुजावर कॉलनीलगतच्या वस्तीतल्या एका घरात पहाटे झालेल्या भीषण स्फोटात संबंधित घराची भिंत फुटून समोरच्या घरावर आदळली. त्यामध्ये मोठे नुकसान झाले आहे. एकाच कुटुंबातील ५ जण गंभीर जखमी, तर अन्य ४ जण किरकोळ जखमी झाले. यात नऊ जण जबर जखमी झाले आहेत. तर चार वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामध्ये दुचाकी गाड्यांचा समावेश आहे. खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता मुल्ला कुटुंबीयांच्या घरात गॅसचे तीन सिलेंडर आढळून आले. मात्र, तिन्ही सिलेंडर सुरक्षित आहेत. तसेच शेगडीही सुस्थितीत आहे. त्यामुळे हा स्फोट सिलेंडरचा झाला नसावा अशी दाट शक्यता आहे.

या घटनेत शरीफ मुबारक मुल्ला (वय ३६), सुलताना शरीफ मुल्ला (वय ३२), जोया शरीफ मुल्ला (वय १०), राहत शरीफ मुल्ला (वय ७) गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर शेजारच्या घरातील अशोक दिनकर पवार (वय ५४) सुनीता अशोक पवार (वय ४५), दत्तात्रय बंडू खिलारे (वय ८०, सर्व रा. मुजावर कॉलनी, शांतिनगर, कराड) यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अन्य तीन जण किरकोळ जखमी झाले आहेत. स्फोटानंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.

बुधवारी पहाटे मुजावर कॉलनी परिसरात नागरिक झोपेत असताना पाण्याच्या टाकीजवळील शरीफ मुल्ला यांच्या इमारतीत भीषण स्फोट झाला. गॅस सिलेंडरच्या टाकीला गळती लागल्याने हा स्फोट झाल्याची शंका व्यक्त केली जात होती. स्फोटाचे नेमके कारण पोलिसांकडून शोधले जात आहे. पहाटेच्या सुमारास झालेल्या या स्फोटाच्या आवाजाने कराड हद्दवाढ भागातील परिसर हादरून गेला. ज्या इमारतीत स्फोट झाला, त्या इमारतीचे मोठे नुकसान झाले आहे. भिंती पडल्या आहेत.

दरम्यान, स्फोटाच्या घटनेनंतर घटनास्थळी पुण्यातील फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले. तसेच घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल, पोलीस उपअधिक्षक अमोल ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी, डीबी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे, प्रविण जाधव यांच्यासह पोलीस दाखल होते.

Comments
Add Comment