अलिबाग : जेवण वाढले नाही म्हणून रागाच्या भरात नराधम मुलाने जन्मदात्या आईलाच जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना अलिबागमधील सुडकोली येथील आहे. चांगुणा रामदेव खोत असे मृत आईचे नाव आहे. तर जयेश या २७ वर्षाच्या मुलाला रेवदंडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
शाब्दिक वादानंतर रागाच्या भरात जयेशने लाकडी दांडक्याने आईला मारहाण केली. त्यानंतर कोयत्याने वार करत त्याने आईला घराबाहेर अंगणात आणले. त्यावरही त्याचे समाधान झाले नाही. त्याने आईला कोयत्याचा धाक दाखवून तिच्यावरती पालापाचोळा टाकून तिला जिवंत जाळले.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी चांगुणा खोत यांना अलिबाग उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरता दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ आणि संताप व्यक्त केला जात आहे.
या घटनेची माहिती मिळताच रेवदंडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जयेशला ताब्यात घेतले आहे. या आरोपीला कठोर शिक्षा करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.