Thursday, July 25, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखमुख्यमंत्र्यांची तळमळ; उबाठा सेनेची मळमळ

मुख्यमंत्र्यांची तळमळ; उबाठा सेनेची मळमळ

शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत लढणार आणि मराठा समाजाला टिकणारं आरक्षण मिळवून देणार, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील मराठा समाजाला दिलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले केवळ शाब्दिक आश्वासन नव्हते; तर त्यामागे त्यांची तळमळ दिसली. त्यांचा प्रामाणिकपणा दिसला. पायातील चपला काढून ते व्यासपीठावरील छत्रपती महाराजांच्या पुतळ्यापाशी गेले व त्यांच्यापुढे नतमस्तक होऊन आणि महाराजांची शपथ घेऊन मराठा समाजाला आरक्षण देणारच, अशी ग्वाही दिली. यापूर्वी राज्यातील कोणत्याही मंत्र्याने किंवा मुख्यमंत्र्याने अशी तळमळ दाखवली नव्हती.

ठाकरे यांच्या नेतृत्वाच्या विरोधात सव्वा वर्षापूर्वी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या उठावानंतर शिंदे यांच्या शिवसेनेचा यंदा दुसरा दसरा मेळावा मुंबईत संपन्न झाला. गेल्या वर्षी बीकेसी (वांद्रे-कुर्ला संकुल)च्या मैदानावर दसरा मेळावा झाला होता. यंदाचा मेळावा मुंबईतील आजाद मैदानावर पार पडला. दोन्ही मेळाव्यांना शिवसैनिकांची अफाट गर्दी जमविण्यात एकनाथ शिंदे व त्यांच्या टीमचे सर्व सहकारी यशस्वी झाले. ठाकरे यांचे नेतृत्व झुगारून शिवसेनेचे ४० आमदार व तेरा खासदार आज शिंदे यांच्यासोबत आहेत. शिवाय दहा अपक्ष आमदारांची साथ आहेच. अशा ५० आमदारांचा ताफा शिंदे यांच्या नेतृत्वावर समाधानी आहे. त्याचेच प्रतिबिंब आजाद मैदानावरील जमलेल्या विराट गर्दीतून प्रकट होत होते. जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी उपोषणाचे हत्यार उपसल्यापासून हा मुद्दा राज्यात अतिशय संवेदनशील बनला आहे. आमच्या आरक्षणात मराठा वाटेकरी नकोत, यासाठी राज्यातील ओबीसी संघटनांनी मुठी आवळल्या आहेत. धनगरही त्यांच्या मागणीसाठी आक्रमक झाले आहेत. या सर्व समाजांना विश्वासात घेऊन एकनाथ शिंदे यांना राज्याचे शकट हाकायचे आहे. म्हणूनच ते आजाद मैदानावरील दसरा मेळाव्यात काय बोलणार, याकडे सर्व महाराष्ट्राचे लक्ष लागले होते.

एकनाथ शिंदे हे वर्षानुवर्षे सत्तेच्या परिघात आहेत. अनेक वर्षे मंत्री होते. पण सत्तेचा अहंकार त्यांच्या मनाला कधी शिवला नाही किंवा त्यांच्या घराची दारे जनतेसाठी कधी बंद ठेवली गेली नाहीत. रस्त्यावरचा कार्यकर्ता व सर्वांच्या मदतीला अहोरात्र धावणारा नेता अशी त्यांची पक्षात व जनतेत प्रतिमा आहे. शिवसेनाप्रमुखांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या सहवासातून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण झाली आहे. म्हणूनच ते मराठा समाजाच्या आरक्षणाकडे अतिशय संवेदनशील भूमिकेतून बघत आहेत. मराठा समाजातील काही जणांनी आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या केली, या घटनांनी त्यांना खूप वेदना झाल्या. म्हणूनच कुणीही टोकाचे पाऊल उचलू नका, आपल्या संसारची काळजी घ्या, बायका-लेकरांना अनाथ करू नका, त्यांना वाऱ्यावर सोडू नका, असे कळकळीचे आवाहन त्यांनी केले. मराठा आरक्षण ही लढाई रस्त्यावरची राहिलेली नाही, न्यायालयात जाऊनच संघर्ष करावा लागणार आहे, याचे भान एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांना आहे. ही बाब समाजातील सर्वांनी समजून घेणे गरजचे आहे. मराठा, ओबीसी व धनगर यांच्यात फूट पाडण्याचा जे कोणी प्रयत्न करीत आहेत, त्यांच्यावर विश्वास ठेऊ नका, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

सर्व देशाला लोकसभा निवडणुकीची चाहूल लागली आहे. पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीत महाराष्ट्रातून ४८ पैकी ४५ हून अधिक खासदार निवडून आणायचे आहेत व महाराष्ट्र हा नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी उभा आहे, हे देशाला दाखवून द्यायचे आहे, असे मुख्यमंत्र्यांनी दसरा मेळाव्यात आवर्जून सांगितले. सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी हेच पुन्हा पंतप्रधान होणार आहेत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आपल्या सरकारने केलेली कामे, सरकारच्या योजना शिवसैनिकांनी घराघरात पोहोचवाव्यात असेही त्यांनी आवाहन केले. मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात हिंदुत्वाचा पुरस्कार केलाच पण उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीकाही केली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे ज्यांना ज्यांना गाडण्याची भाषा करीत होते, त्यांच्या गळ्यात गळे घालण्याचे काम उद्धव ठाकरे करीत आहेत, काँग्रेस व शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर त्यांनी हातमिळवणी केलीच आहे; आता समाजवाद्यांच्या सभेत जाऊनही त्यांच्याशी जमवून घेत आहेत. उद्या ओवेसी यांच्या एमआयएमबरोबर त्यांनी गळाभेट केली तरी मुळीच आश्चर्य वाटायला नको असाही टोला एकनाथ शिंदे यांनी उद्धव यांना लगावला. धर्मवीर आनंद दिघे यांना अपघात झाल्यावर त्यांना ठाकरे बघायला आले नव्हते, त्यांच्या अंत्ययात्रेलाही आले नव्हते, त्यांच्या समाधीचे दर्शन घ्यायलाही आले नाहीत, उलट आपण जेव्हा ठाकरेंकडे गेलो तेव्हा त्यांनी आनंद दिघेंची प्रॉपर्टी कुठे कुठे आहे, असा प्रश्न आपल्याला विचारला याचीही मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणातून आठवण करून दिली.

एकनाथ शिंदे यांच्या भाषणात आत्मविश्वास होता. ठाकरे नावावर शिवसैनिकांची गर्दी जमते हा भ्रम त्यांनी दूर केला. मैदान कोणतेही असले तरी फरक पडत नाही, शिवसेनाप्रमुखांचे विचार मांडणे महत्त्वाचे आहे, असा ठाकरे यांचा झणझणीत समाचारही त्यांनी घेतला. हा गरीब माणूस मुख्यमंत्री झालाच कसा, या प्रश्नाने अनेकांचे पोटशिळ उठले आहे, पण मला गोर-गरीब जनतेपेक्षा मुख्यमंत्रीपद महत्त्वाचे नाही, असे शिंदे सांगून लक्षावधी शिवसैनिकांची मने जिंकली. आजाद मैदानावर एकनाथ शिंदे यांच्याकडून महाराष्ट्राच्या हिताची तळमळ ऐकायला मिळाली, तर शिवाजी पार्कवर उबाठा सेनेच्या मेळाव्यात केवळ शिंदे व मोदी सरकारविषयी मळमळ ऐकायला मिळाली. मोदी यांचा द्वेष व शिंदे यांच्याविषयी मत्सर याचेच दर्शन शिवाजी पार्क मैदानावर घडले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -