Sunday, July 7, 2024
Homeताज्या घडामोडीBaba Maharaj Satarkar : ज्येष्ठ कीर्तनकार ह. भ. प. बाबा महाराज सातारकर...

Baba Maharaj Satarkar : ज्येष्ठ कीर्तनकार ह. भ. प. बाबा महाराज सातारकर यांचं निधन

वयाच्या ८९व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

नवी मुंबई : ज्येष्ठ आणि जगभरात ख्याती असलेले प्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प. बाबा महाराज सातारकर (Baba Maharaj Satarkar) यांचं निधन झालं. वयाच्या ८९व्या वर्षी त्यांनी नवी मुंबईतील (Navi Mumbai) नेरुळ येथे अखेरचा श्वास घेतला.

त्यांनी आपल्या खास कीर्तन शैलीने अध्यात्म आणि भागवत सांप्रदायाचा विचार समाजापर्यंत पोहोचवले. वारकरी सांप्रदायाशी त्यांचे अत्यंत जवळचे संबंध होते. विठ्ठलाच्या (Vitthal) भक्तीत रममाण होणा-या आणि ज्ञानेश्वरीमध्ये (Dnyaneshwari) आपलं संपूर्ण आयुष्य घालवलेल्या बाबा महाराजांच्या निधनाने वारकरी सांप्रदायावर मोठा आघात झाला आहे.

महाराष्ट्राच्या गावागावांत बाबा महाराज सातारकर यांचं कीर्तन आवडीने ऐकलं जायचं. ज्या गावात बाबा महाराजांचं कीर्तन झालं नाही असं गाव सापडणं फार कठीण आहे. उतारवयात त्यांना फार वेळ कीर्तनासाठी उभं राहणं शक्य होत नव्हतं मात्र त्यांच्या नातवाने त्यांची कीर्तनाची परंपरा सुरु ठेवली आहे. परंतु त्यांच्या प्रवचनाचे लाखो चाहते महाराष्ट्रात आहेत, त्यामुळे बाबा महाराजांची कीर्तने लोक खास कॅसेट्स घेऊन नित्यनेमाने ऐकतात.

यावर्षीच्या सुरुवातीलाच फेब्रुवारी महिन्यात बाबा महाराज सातारकर यांच्या पत्नी रूक्मिणी सातारकर ऊर्फ माई सातारकर यांचं निधन झालं होतं. त्यानंतर ८ महिन्यानंतर बाबा महाराज सातारकर यांचीही प्राणज्योत मालवली. नेरुळ येथील जिमखान्यासमोर असलेल्या विठ्ठल रखुमाई मंदिरात बाबा महाराजांचं पार्थिव आज दुपारी तीन वाजल्यापासून अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. हे मंदिर बाबा महाराजांनीच उभं केलं होतं. उद्या संध्याकाळी पाच वाजता याच ठिकाणी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

इंग्रजी माध्यमातून शिक्षण ते कीर्तनापर्यंतचा प्रवास

बाबा महाराज सातारकर यांचा जन्म ५ फेब्रुवारी १९३६ रोजी साताऱ्यात झाला. त्यांनी त्या काळी दहावीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं. बाबा महाराज सातारकर यांच्या घरी शेकडो वर्षांपासून वारकरी सांप्रदायाची परंपरा आहे. त्यांनी १९८३ पासून संतांच्या गावी दरवर्षी कीर्तन सप्ताह आयोजन करण्याची परंपरा सुरू केली. यात त्यांनी भंडारा डोंगर, देहू, त्र्यंबकेश्वर, नेवासे, पैठण, पंढरपूर, पिंपळनेर इत्यादी ठिकाणी कीर्तन सप्ताहांचं आयोजन केलं. त्यांनी जनसेवा करण्यासाठी चैतन्य अध्यात्मिक ज्ञान प्रसार संस्थेचीही स्थापना केली. या माध्यमातून भाविकांना वैद्यकीय सुविधाही पुरवण्यात येते. त्यांच्या निधनाने संपूर्ण वारकरी सांप्रदायावर शोककळा पसरली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -