मुंबई : राज्यात मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा आमरण उपोषणाला सुरुवात केलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात टीका करणाऱ्या गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीच्या काचा फोडणा-या मराठा आंदोलकांचे वकीलपत्र सतीश मानेशिंदे (Satish Maneshinde) घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. मानेशिंदे हे न्यायालयात मराठा आंदोलकांची बाजू मांडतील. यासाठी ते कोणतेही शुल्क आकारणार नसल्याचेही समजते.
पोलिसांनी गाडीची तोडफोड करणाऱ्या मंगेश साबळे, वसंत बनसोडे, राजू सावे अशी तिघांना अटक केली आहे. त्यांच्या मदतीला ॲडव्होटकेट सतीश मानेशिंदे धावून आले आहेत. मराठा आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर वीरेंद्र पवार आणि श्रीरंग बारगे यांनी भोईवाडा पोलीस ठाण्यात जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, आमच्या माहितीनुसार लवकरच ॲडव्होटकेट सतीश मानेशिंदे यांची टीम या मराठा आंदोलकांच्या सुटकेसाठी दाखल होणार आहे. आम्ही मराठा आंदोलकांच्या चुकीच्या कृत्याचे समर्थन करत नाही. मात्र, आमचा त्यांना पाठिंबा आहे, असे वीरेंद्र पवार यांनी सांगितले.
सतीश मानेशिंदे हे देशातील आघाडीच्या वकिलांपैकी एक म्हणून ओळखले जातात. अलीकडेच त्यांनी कॉर्डिलिया क्रुझ ड्रग्ज प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याचा खटला लढवला होता. यापूर्वी त्यांनी अनेक हायप्रोफाईल खटले लढवले आहेत. १९९३ सालच्या बॉम्बस्फोट प्रकरणात अभिनेता संजय दत्तचा खटला लढवणाऱ्या टीमचा ते एक भाग होते. संजय दत्तवर अत्यंत गंभीर आरोप असताना सतीश मानशिंदे यांनी त्याला जामीन मिळवून दिला होता. त्यामुळे कायदेशीर वर्तुळात सतीश मानेशिंदे या नावाभोवती एक वलय निर्माण झाले आहे.