Saturday, April 19, 2025
Homeसाप्ताहिकश्रध्दा-संस्कृतीGajanan Maharaj : शाश्वत स्वरूपाचे आले सद्गुरू भक्तीचे राज्य घरा (भाग १)

Gajanan Maharaj : शाश्वत स्वरूपाचे आले सद्गुरू भक्तीचे राज्य घरा (भाग १)

  • गजानन महाराज : प्रवीण पांडे, अकोला.

श्री गजानन महाराज शेगाव येथे असताना एक कशिनाथ खंडेराव गद्रे नावाचा विप्र खमगाव येथून महाराजांच्या दर्शनाकरिता तेथे येऊन पोहोचला. महाराजांचे दर्शन घेतले, नमस्कार केला. त्याच्या वडिलांनी जीवनमुक्ताची जी लक्षणे लिहून ठेवली होती, त्याप्रमाणे प्रत्यक्ष मूर्ती समोर पाहून त्याच्या मनाला अतिशय आनंद वाटला. आपण दर्शनाला आलो त्याचे सार्थक झाल्याचे त्याला समधान वाटले. इतक्यात समर्थांनी एक लीला केली. त्या काशिनाथाच्या पाठीवर कोपरखळी मारली आणि त्याला म्हणाले, “जा, तुझा हेतू पूर्ण होईल. तारवाला तुझी वाट पाहतोय.”

हे ऐकून काशिनाथ मनात घोटाळला व मनाशी विचार करू लागला की, “माझे तर येथ कोणतेच काम नाही, किंवा मी काही देखील मागावयास येथे आलेलो नाही आणि महाराज म्हणतात तारवाला वाट पाहतो म्हणून.” त्याला हे गूढ काही उकलेना आणि महाराजांना विचारण्याची त्याची हिम्मत होईना.

पुन्हा महाराजांना नमस्कार करून खामगावी परत आला. घरी येऊन पाहतो, तर तारवाला तार घेऊन दारात उभा होता. काशिनाथाने त्याचे जवळून तार घेतली. ती वाचली. त्या तारेमध्ये काशिनाथ याची नेमणूक मोर्शी तालुक्यात मुनसफीच्या हुद्द्यावर केल्याचा संदेश होता. आता काशिनाथ यास महाराजांनी मारलेल्या कोपरखळीचा अर्थ उमजला. संत हे अंतर्ज्ञानी असतात.

एकदा गजानन महाराज यांची स्वारी नागपूर येथे गोपाळ बुटी यांच्या घरी त्यांनी केलेल्या आग्रहावरून गेली. नागपूर ही भोसल्यांची राजधानी. याचे तत्कालीन वर्णन तसेच महाराजांच्या काळातील नागपूरची परिस्थिती यांची तोलनिक मांडणी देखील दासगणू महाराज यांनी ओवीबद्ध केली आहे. (शआजच्या काळात तर नागपूर हे शहर खूपच सुंदर आहे.)

दासगणू महाराज लिहितात :
ही भोसल्यांची राजधानी।
पूर्वकाली होती जाणी।
त्या शहराची आज दिनी।
दैना झाली विबुध हो ॥१७॥
स्वातंत्र्य रूपी प्राण गेला।
खरा धनी याचक ठरला।
परक्यांचा बोलबाला।
झाला जया शहरात ॥१८॥
गज घोडे पालख्या अपार।
नाहीश्या झाल्या साचार।
रस्त्याने फिरे मोटार।
अती जोराने विबुध हो ॥१९॥
असो हा महिमा काळाचा।
नाही दोष कवणाचा।
वाडा गोपाळ बुटीचा।
होता सिताबर्डीवर॥२०॥

तर अशा या भव्य बुटी वाड्यात महाराज आले. बुटी यांची महाराजांवर अत्यंत श्रद्धा होती. त्यामुळे बुटी यांना असे वाटत होते की, महाराजांना निरंतर बंगल्यावर ठेवून घ्यावे. शेगावी जाऊ देऊ नये.

इकडे शेगाव महाराजांविना भणभणीत पडले. महाराज तेथे नसल्यामुळे भक्त मंडळी दुःखी झाली. हरी पाटील यांना विनंती करू लागली, “आपण गावचे जमेदार आहात. श्री गजानन महाराजांना परत येथे घेऊन या. बुटी हे नागपूरचे सावकार आहेत. तिथे आमच्यासारख्या सामान्य माणसांचा काय लाग लागेल?”

ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण हस्तिनापुरात आनंदी नव्हते, त्याचप्रमाणे महाराज बुटी वाड्यात विशेष आनंदी नव्हते.

ते बुटी यांना म्हणाले, “मला शेगावी जाऊ दे. इथे तुझ्या या भव्य सदनात आम्हाला ठेवून घेऊ नकोस.”

बुटी सदनामध्ये रोज ब्राह्मण भोजने, महाराजांसमोर भजन असे कार्यक्रम होत असत. पण शेगावचे लोक आले, तर त्यांना तिथे येण्यास बंदी केली जाई आणि श्रीमंतांच्या सदनात असे कोणासही जाता येत नाही. त्यामुळे शेगावचे लोक जरी महाराजांना आणावयास गेले तरी त्यांचा काही उपाय तिथे चालत नव्हता. ते जसे येत असत तसेच वापस जात असत. एक दिवस हरी पाटील काही मंडळींना बरोबर घेऊन गाडीने नागपूर येथे येण्यास निघाले. महाराजांनी हे अंतरज्ञानाने जाणले आणि ते गोपाळ बुटी यांना म्हणाले, “अरे गोपाळा, हरी पाटील अग्निरथात बसून नागपुरी येण्यास निघाला आहे. तो येथे पोहोचण्यापूर्वी मला येथून जाऊ दे. तो येथे आल्यावर शांतता राहणार नाही. तो शेगावचा जमेदार आहे. याचा तू विचार करावा हेच बरे. तुझी ही वर्तणूक धनाच्या जोरावर आहे. हरी पाटील मनगटाच्या जोरावर मला येथून घेऊन जाईल.” हरी पाटील बुटी सदनाला पोहोचले. शिपायांनी त्यांना अटकाव केला. पण हरी पाटलांनी त्यांना जुमानले नाही आणि सदनात प्रवेश केला. त्यावेळी तिथे भोजनाकरिता ब्राह्मण आले होते. गोपाळ बुटी हे नागपूरमधील फारच मोठे व्यक्तिमत्त्व होते. त्यांना नागपूरचा कुबेर असे संबोधले जात असे.

क्रमशः

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -