शिर्डी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्रातील अहमदनगर मधील शिर्डी येथे आरोग्य, रेल्वे, रस्ते, तेल आणि वायू यासारख्या क्षेत्रातील सुमारे ७,५०० कोटी रुपयांच्या बहुविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी केली. बहुविध विकास प्रकल्पांमध्ये अहमदनगर नागरी रुग्णालयातील आयुष रुग्णालय; कुर्डुवाडी-लातूर रोड रेल्वे विभागाचे विद्युतीकरण (186 किमी); जळगाव ते भुसावळला जोडणाऱ्या (24.46 किमी) 3 ऱ्या आणि 4थ्या रेल्वे मार्गिका; एनएच -166 (पॅकेज-I) च्या सांगली ते बोरगाव विभागाचे चौपदरीकरण; आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या मनमाड टर्मिनलवर अतिरिक्त सुविधा यांचा समावेश होता. अहमदनगर नागरी रुग्णालयातील माता व बाल आरोग्य शाखेची त्यांनी पायाभरणी केली. मोदींनी लाभार्थ्यांना आयुष्मान कार्ड आणि स्वामित्व कार्डचेही वाटप केले.
इतर प्रकल्पांपैकी, मोदींनी शिर्डी येथे नवीन दर्शन रांग संकुलाचे उद्घाटन केले, निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याचे (85 किमी) नेटवर्क राष्ट्राला समर्पित केले आणि 86 लाखांहून अधिक शेतकरी-लाभार्थ्यांना लाभ देणारी ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ सुरू केली.
तत्पूर्वी दुपारी मोदींनी शिर्डीच्या श्री साईबाबा समाधी मंदिरात पूजाअर्चना केली आणि निळवंडे धरणाचे जलपूजन केले.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, साईबाबांच्या आशीर्वादाने 7500 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली जात आहे. 5 दशकांपासून प्रलंबित असलेल्या निळवंडे धरणाच्या कामाचा संदर्भ देत पंतप्रधानांनी आजच्या उद्घाटनाचा उल्लेख केला. या ठिकाणी जलपूजन करण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी कृतज्ञताही व्यक्त केली. श्री साईबाबा समाधी मंदिरातील दर्शन रांग संकुलाबद्दल बोलताना, मोदींनी ऑक्टोबर 2018 मध्ये केलेल्या त्याच्या पायाभरणीचा उल्लेख केला आणि ते म्हणाले की यामुळे भारत आणि परदेशातील यात्रेकरूंच्या सोयीमध्ये आणखी वाढ होईल.
पंतप्रधानांनी वारकरी समाजातील बाबा महाराज सातारकर यांच्या आज सकाळी झालेल्या दुःखद निधनाचा उल्लेख केला. पंतप्रधानांनी बाबा महाराजांना आदरांजली वाहिली आणि कीर्तन आणि प्रवचनाद्वारे त्यांनी केलेल्या सामाजिक प्रबोधनाच्या कार्याचे स्मरण केले जे पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहील.
‘सबका साथ सबका विकास’ या सरकारच्या मंत्राचा पुनरुच्चार करताना “सामाजिक न्यायाचा खरा अर्थ म्हणजे जेव्हा देश दारिद्र्यमुक्त होतो आणि गरिबांना विपुल संधी मिळतात”, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. दुहेरी इंजिन असलेल्या सरकारचे गरिबांचे कल्याण हे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे त्यांनी अधोरेखित केले आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचा विस्तार होत असताना त्यासाठी अर्थसंकल्पीय तरतूद वाढवणार असल्याचे सांगितले. त्यांनी महाराष्ट्रातील लाभार्थ्यांना 1 कोटी 10 लाख आयुष्मान कार्ड वितरित केल्याचे नमूद केले ज्यांना 5 लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा मिळेल ज्यासाठी सरकार 70,000 कोटी रुपयांचा बोजा उचलत आहे.
पंतप्रधानांनी सांगितले की, गरीब नागरिकांच्या घरांना नळाने पाणीपुरवठा करण्यासाठी सरकारने आतापर्यंत 2 लाख कोटी रुपये खर्च केले आहेत. पंतप्रधान स्वनिधी योजनेअंतर्गत, फिरत्या विक्रेत्यांना हजारो रुपयांची मदत दिली जात आहे अशी माहिती त्यांनी दिली. तसेच देशातील सुतार, सोनार, कुंभार आणि शिल्पकार यांच्या लाखो कुटुंबांना मदत करण्यासाठी नुकत्याच सुरु करण्यात आलेल्या 13,000 कोटींहून अधिक खर्चाच्या पंतप्रधान विश्वकर्मा योजनेबद्दल देखील पंतप्रधानांनी यावेळी चर्चा केली.
देशातील छोट्या शेतकऱ्यांबद्दल बोलताना, पंतप्रधान मोदी यांनी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा उल्लेख केला.या योजनेअंतर्गत, देशभरातील छोट्या शेतकऱ्यांना 2 लाख 60 हजार कोटी रुपये मिळाले आहेत आणि महाराष्ट्रातील छोट्या शेतकऱ्यांना या योजनेतून 26 हजार कोटी रुपयांची मदत मिळाली आहे. महाराष्ट्र सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ सुरु केल्याबद्दल आनंद व्यक्त करत पंतप्रधान म्हणाले की या योजनेतून शेतकऱ्यांना अतिरिक्त 6000 रुपयांचा लाभ होणार आहे म्हणजेच यापुढे राज्यातील छोट्या शेतकऱ्यांना 12,000 रुपयांचा सन्मान निधी मिळणार आहे.
शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी सरकार कटिबद्ध आहे याचा ठळक उल्लेख पंतप्रधानांनी केला. कालावधीत किमान आधारभूत किंमत योजनेतून गेल्या 7 वर्षांच्या काळात साडेतेरा लाख कोटी रुपयांचे अन्नधान्य खरेदी करण्यात आले असून याधीच्या सरकारमधील ज्येष्ठ नेत्याच्या कार्यकाळात केवळ साडेतीन लाख कोटी रुपयांचे अन्नधान्य खरेदी करण्यात आले होते अशी माहिती त्यांनी दिली. वर्ष 2014 नंतरच्या काळात 1 लाख 15 हजार कोटी रुपये मूल्याच्या तेलबिया आणि डाळींची खरेदी झाली आहे तर पूर्वीच्या सरकारने सुमारे 500 ते 600 कोटी रुपये किमान आधारभूत मूल्याच्या तेलबिया आणि डाळी खरेदी केल्या होत्या. थेट लाभ हस्तांतरण प्रक्रियेमुळे भ्रष्टाचार तसेच निधीच्या गळतीचा प्रश्न निकाली निघाला आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.
आपल्या भाषणाचा समारोप करताना पंतप्रधान म्हणाले, “महाराष्ट्र हे अफाट क्षमता आणि शक्यतांचे केंद्र आहे. जेवढ्या वेगाने महाराष्ट्राचा विकास होईल, तेवढ्या वेगाने भारताचाही विकास होईल.” पंतप्रधान मोदी यांनी मुंबई आणि शिर्डीला जोडणाऱ्या वंदे भारत रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखविल्याचे स्मरण केले, आणि महाराष्ट्रात रेल्वेचे जाळे सतत विस्तारत असल्याचे अधोरेखित केले. जळगाव ते भुसावळ दरम्यान तिसरा आणि चौथा रेल्वे मार्ग सुरू झाल्यावर मुंबई-हावडा रेल्वे मार्गावरील वाहतूक सुलभ होईल, असे त्यांनी नमूद केले. त्याचप्रमाणे सोलापूर ते बोरगाव या चौपदरी महामार्गाच्या बांधकामामुळे संपूर्ण कोकण विभागाचे दळणवळण सुधारेल आणि या भागातील उद्योगांना आणि ऊस, द्राक्ष आणि हळद उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. “ही संपर्क सक्षमता (कनेक्टिव्हिटी) केवळ वाहतुकीसाठीच नव्हे तर प्रगती आणि आर्थिक विकासासाठी एक नवीन मार्ग तयार करेल”, असे सांगून त्यांनी भाषणाचा समारोप केला.
महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.