बंगळुरू: श्रीलंकाने आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप २०२३मध्ये(cricket world cup 2023) आपला दुसरा विजय मिळवला आहे. २६ ऑक्टोबरला बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यात श्रीलंकेने इंग्लंडला आठ विकेटनी हरवले. सामन्यात श्रीलंकेला विजयासाठी इंग्लंडला १५७ धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान श्रीलंकेने १४६ बॉल बाकी राखत पूर्ण केले.
श्रीलंकेच्या विजयात पथुम निसंका आणि सदीरा समरविक्रमा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. निसंकाने ८३ बॉलमध्ये ७७ धावा केल्या. यात त्याने सात चौकार आणि दोन षटकार लगावले. तर समरविक्रमाने सात चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद ६५ धावा केल्या. समरविक्रमा आणि निसंका यांनी तिसऱ्या विकेटसाठी १३७ धावांची भागीदारी केली.
श्रीलंकेने या विश्वचषकात आतापर्यंत ५ पैकी २ सामने जिंकले आहेत. श्रीलंकेचा संघ पाचव्या स्थानावर आहे. तर इंग्लंडच्या संघाचा गेल्या पाच सामन्यांपैकी चौथा पराभव आहे. इंग्लंडने आपले पुढील चारही सामने जरी जिंकले तरी त्यांचे अंक १० होती. यामुळे ते आता सेमीफायनलच्या शर्यतीत बाहेर गेले आहे. इंग्लंड सध्या नवव्या स्थानावर आहे.
चांगल्या सुरूवातीनंतर ढेपाळली इंग्लिश टीम
टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजीस उतरलेल्या इंग्लंड संघाची सुरूवात चांगली राहिली. डेविड मलान आणि जॉनी बेअरस्ट्रॉ यांनी मिळून ६.३ षटकात ४५ धावांची भागीदारी केली. एंजलो मॅथ्यूजने मलानला विकेटकीपर कुसल मेंडिसच्या हाती बाद करत या पार्टनरशिपला खिंडार पाडले. इंग्लंडला दुसरा झटका ज्यो रूटच्या रूपात बसला. यानंतर सलामीवीर जॉनी बेअरस्ट्रॉची विकेट पडली. बेअरस्ट्रोने ३१ बॉलमध्ये ३० धावा केल्या. जोस बटलरला केवळ ८ धावांची खेळी करता आली. इंग्लंडचे विकेट सातत्याने पडतच होते. अखेर त्यांचा संपूर्ण संघ ३३.२ षटकांत १५६ धावांवर आटोपला.