समुद्रकिनारी स्वच्छतेसाठीही विशेष लक्ष देणार
मुंबई : मुंबईत सुरु असलेल्या अनेक प्रकल्पांमुळे तसेच खराब वातावरणामुळे मुंबईच्या हवेचा दर्जा (Air Quality) प्रचंड खालावला (Mumbai pollution) आहे. सकाळच्या वेळी लांबच्याच नव्हे तर जवळच्याही इमारती अंधूक दिसतात इतकं प्रदूषण मुंबईत वाढलं आहे. मुंबईच्या हवेचा दर्जा दिल्लीपेक्षाही खालवला आहे. त्यामुळे या प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे, हे लक्षात घेऊन पालकमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी मुंबई प्रदूषणमुक्त करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. मोठ्या कंपन्या तसेच उद्योगांनीही यात सहभाग घेण्याची तयारी दर्शवली आहे.
मुंबईत प्रचंड लोकसंख्या वाढल्याने वाहनांची गर्दीही तितकीच वाढली आहे आणि हे प्रदूषणाचं एक मोठं कारण आहे. मुंबईत इमारती बांधण्याचे प्रकल्पदेखील वेगाने सुरु आहेत, त्यांच्या बांधकामामुळेही हवेत धूलिकण पसरुन प्रदूषणाचे प्रमाण वाढत आहे. यांवर नियंत्रण आणणे तसेच रासायनिक कंपन्यांमधील प्रदूषण, जैविक कचरा जाळणे, स्मशानभूमीतील धुरामुळे तसेच डम्पिंग ग्राऊंडमुळे होणाऱ्या प्रदूषणावर उपाययोजना करणे गरजेचे आहे, असं केसरकरांनी स्पष्ट केलं.
मुंबईत सध्या सहा हजार ठिकाणी बांधकामे सुरू आहेत. या बांधकामांवेळी नियमांचे पालन होत नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात धूलिकण हवेत पसरतात आणि हवा प्रदूषित होते. त्याचबरोबर मुंबईतील विविध वायू प्रकल्प, रिफायनरी यातूनही वायुप्रदूषण होत आहे. हे प्रदूषण कमी करण्यासाठी मुंबई महापालिकेकडून (BMC) काही सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच काही कंपन्या प्रदूषण रोखण्यासाठी पुढाकार घेण्यासाठी तयार असल्याची माहिती केसरकरांनी दिली. त्यामुळे प्रदूषण रोखण्यात यश येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
समुद्रकिनारी देखील चौपाट्यांच्या स्वच्छतेच्या दृष्टीने वेगवेगळे कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री केसरकर यांनी दिली. मिठी नदी समुद्राला मिळते, त्यामुळे माहिमच्या समुद्राच्या भागाकडे लक्ष द्यावे लागेल. या भागात मिठी नदीतून वाहून येणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण अधिक आहे. त्याची साफसफाई करावी लागेल, असं ते म्हणाले. पालकमंत्री केसरकर स्वतः सोमवारी माहिम ते दादर चौपाटी असा फेरफटका मारणार असल्याचे त्यांनी सांगितले.