नवी दिल्ली: गेल्या वर्षी कतारमध्ये अटक झालेल्या ८ माजी नौदलाच्या अधिकाऱ्यांना कतारच्या एका न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. कतारच्या न्यायालयाच्या निर्णयावर भारताने आक्षेप नोंदवला आहे. भारत सरकारकडून गुरूवारी सांगण्यात आले की कतारमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या सुटकेसाठी सर्व कायदेशीर पर्यायांचा शोध घेतला जात आहे.
भारतीय नौदलाचे हे ८ माजी अधिकारी गेल्या ऑगस्ट महिन्यापासून कतारमधील तुरूंगात बंद आहेत. आतापर्यंत या माजी अधिकाऱ्यांविरोधात लावण्यात आलेल्या आरोपांची माहिती देण्यात आलेली नाही. यांच्याशी संबंधित लोकांचे म्हणणे आहे की या अधिकाऱ्यांवर गुप्तहेरी केल्याचा आरोप आहे.
भारत सरकारने गुरूवारी सांगितले की आम्हाला माहिती मिळाली आहे की कतारच्या एका न्यायालयाने अल दहरा कंपनीत काम करणाऱ्या भारताच्या ८ माजी नौदल अधिकाऱ्यांना अटक केल्याप्रकरणात निर्णय दिला आहे. न्यायालयाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. फाशीच्या शिक्षेने आम्ही हैराण आहोत आणि या निर्णयाच्या डिटेल्स कॉपीची प्रतीक्षा करत आहोत. आम्ही त्यांच्या कुटुंबातील सदस्य तसेच कायदेशीर टीमशीही संपर्कात आहोत. भारतीय नागरिकांच्या सुटकेच्या निश्चितीसाठी सर्व कायदेशीर पर्यायांचा शोध घेतला जात आहे.
भारत सरकारने पुढे सांगितले, आम्ही हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. आम्ही सर्व कौन्सिलर आणि कायदेशीर मदत सुरू ठेवू. कतारी न्यायालयाचा हा निर्णय आम्ही तेथील अधिकाऱ्यांसमोर ठेवू.. प्रकराणाचे गांभीर्य आणि गोपनीयतेची गरज पाहता या वेळेस याबाबत कोणतेही विधान करणे योग्य नाही.
राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित अधिकारीही अटकेत
कतार पोलिसांकडून अटक करण्यात आलेल्या ८ माजी नौदल अधिकाऱ्यांमध्ये राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित कमांडर पूर्णंदू तिवारी(रिटायर्ट) यांचाही समावेश आहे. २०१९मध्ये तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी प्रवासी भारतीय पुरस्काराने त्यांचा सन्मान केला होता.
मार्चमध्ये झाली होती सुनावणी
रिपोर्टनुसार या वर्षी मार्चच्या अखेरीस पहिली सुनावणी झाली होती. अटक करण्यात आलेल्या माजी अधिकाऱ्यांपैकी एकाची बहीण मीतू भार्गवने आपल्या भावाच्या सुरक्षित परतीसाठी भारत सरकारकडून मदत मागितली होती. सोशल मीडियाद्वारे त्यांनी ही मदत मागितली होती.
कतारच्या खाजगी कंपनीत करत होते काम
हे सर्व लोक कतारच्या एका खाजगी कंपनीत काम करत होते. ही कंपनी कतरी एमिरी नौदलाला ट्रेनिंग आणि इतर सेवा देते.