Monday, July 22, 2024
Homeताज्या घडामोडीरेल्वे गोदामात नोकरी फसवणूक प्रकरणी संतोष थोरात विरोधात हरिष बेकावडे यांची लेखी...

रेल्वे गोदामात नोकरी फसवणूक प्रकरणी संतोष थोरात विरोधात हरिष बेकावडे यांची लेखी तक्रार

देवा पेरवी

पेण : मागील एक ते दीड वर्षांपासून रायगड जिल्ह्यात विविध प्रकारे नोकरीचे आमिष दाखवून किंवा पैशाची मागणी करून तरुणांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. आता तर थेट केंद्र सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या रेल्वे गोदामात नोकरीचे आमिष दाखवून पेण येथील समोसे विक्रेता संतोष थोरात याने १४०० ते १५०० बेरोजगारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली असल्याचा धक्कादायक प्रकार घडला असल्याची माहिती सामोर आली आहे. पेण तालुक्यातील समोसे विक्रेता संतोष थोरात यांनी भारतीय रेल्वे माल गोदामात नोकरीचे आमिष दाखवून हजारो बेरोजगार तरुणांची फसवणूक केली असल्याची लेखी तक्रार सामजिक कार्यकर्ते हरिष बेकावडे यांनी रायगड पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक व रायगड आर्थिक गुन्हे शाखा येथे केली आहे.

गेल्या दीड महिन्यापूर्वी पेण पोलिसांकडे तक्रार अर्ज दाखल करून देखील योग्य ती कारवाई न झाल्याने अखेर बेकावडे यांनी लेखी तक्रार अर्ज दाखल केला आहे. रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे व अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी या प्रकरणाची तात्काळ सखोल चौकशी करून आणि कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करावा व फसवणूक झालेल्या हजारो तरुणांना न्याय द्यावा अशी मागणी केली असल्याचे बेकावडे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

हरिष बेकावडे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिलेल्या माहितीनुसार, पेण येथील समोसे विक्रेते संतोष थोरात आणि त्यांच्या अन्य सहकाऱ्यांनी केंद्र सरकारच्या अंतर्गत असणाऱ्या भारतीय रेल्वे माल गोदाम श्रमिक संघा तर्फे नोकरीचे आमिष दाखवून संबंधित गोरगरीब तरुण – तरुणी, विवाहित महिला – पुरुष यांच्याकडून गेली एक ते दीड वर्षांपासून फॉर्म भरून रजिस्टर नोंद करून सुरुवातीस फॉर्म फी म्हणून दोन हजार प्रत्येकी व नोकरी लावण्यासाठी प्रत्येकी पंचवीस हजार रुपये पेण तालुक्यासह रायगड, मुंबई, ठाणे, कोकण मधील लोकांकडून घेतले आहेत. पंधराशेहुन अधिक जणांकडून नोकरीसाठी प्रत्येकी पंचवीस हजार रुपये घेतल्यानंतर आज पर्यंत कोणत्याही बेरोजगारास नोकरी दिली नसल्याचे समोर आले आहे. थोरात याने अंदाजे ४ कोटीहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याचे निदर्शनात आले आहे.

पैसे भरुन एक ते दीड वर्षे झाल्यानंतर देखील नोकरी मिळत नसल्याने तसेच नोकरी मिळण्याची कोणतीही शक्यता दिसत नसल्याने अनेक बेरोजगारांनी फोन केल्यानंतर व प्रत्यक्ष भेट घेतल्यावर काही बेरोजगारांना भारतीय रेल्वे माल गोदाम श्रमिक संघाचे ओळखपत्र दाखवले जात होते. तर काहींना नमुना म्हणून ओळखपत्र दिले जाते. त्यानंतर पंचवीस हजार रुपये घेऊन भारतीय रेल्वे कार्यालयाकडून नोकरीचे भरतीचे पत्र आपणास शंभर टक्के मिळेल अशी खात्री देऊन फसवणूक केली जात आहे. मात्र प्रत्यक्षात आजपर्यंत एकाही बेरोजगाराला रेल्वे माल गोदामात नोकरी दिली नसल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते हरीश बेकावडे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे.

केंद्र सरकारच्या अखत्यारीत येत असलेल्या भारतीय रेल्वे माल गोदामात नोकरी लावण्याचे शिक्षण, वय असे कोणतेही निकष देखील थोरात पाळत नाही. काही बेरोजगारांचे सरकारी नोकरी मिळण्याचे वय देखील उलटून गेले आहे, अशा बेरोजगारांकडून देखील फॉर्म भरून पैसे घेण्यात येऊन त्यांची फसवणूक सुरू असल्याचे हरीश बेकावडे यांनी सांगितले.

पेण मधील फणसडोंगरी येथील एका छोट्याशा कौलारू ऑफिसमध्ये रेल्वेत नोकरी देण्याच्या अमिषाने हजारो बेरोजगारांची फसवणूकी बाबत सामाजिक कार्यकर्ते हरिष बेकावडे यांनी पेण पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला होता. मात्र एक ते दीड महिना उलटूनही कोणतीही कारवाई होत नसल्याचे निदर्शनास येत आहे. म्हणून या फसवणुकीच्या प्रकारामुळे आणखी अन्य तरुणांचा आर्थिक बळी जाऊ नये यासाठी तात्काळ कायदेशीर कारवाई करून संतोष थोरात याच्याकडे गेल्या एक दीड वर्षभरापासुन असलेली रजिस्टर नोंद माहिती घेउन संबंधितांकडून त्याबाबत विचारणा करुन त्यांच्यावर व अन्य सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे व अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्याकडे केली असल्याचे बेकावडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

सदर प्रकरणात सखोल चौकशी करून कायदेशीर कारवाई करत लवकरात लवकर आर्थिक फसवणूक झालेल्या तरुणांना न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात येईल. आर्थिक फसवणूक झालेल्या तरुणांना न्याय देण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी पेण व पेण पोलिस निरीक्षकांना आदेश देण्यात आले आहेत. फसवणूक झालेल्या तरुणांनी संबंधित स्थानिक पोलीस स्टेशनशी संपर्क साधून फसवणूक करणाऱ्यांविरोधात लेखी तक्रार दाखल करावी. – सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, रायगड

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -