
नवी दिल्ली : हवामान विभागाने चक्रवाती वादळामुळे केरळमध्ये जोरदार पावसाचा अलर्ट जारी केला आहे. येथे पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच वेगवान वारे आणि वीज कडाडण्याचीही शक्यता व्यक्त केली आहे. सोबतच चेन्नई आणि तामिळनाडूच्या किनारी भागातही हवामान बदलण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे देशाच्या इतर भागात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. राजधानी दिल्लीसह संपूर्ण उत्तर भारतात थंडीचा परिणाम दिसू लागला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार दिल्ली आणि लखनऊमध्ये पुढील पाच दिवस धुके वाढण्याची शक्यता आहे.
पंजाब, हरियाणा, बिहार, उत्तर प्रदेशातील काही भागांमध्ये पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार मणिपूर, मिझोरम, नागालँड आणि त्रिपुरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनाऱ्यालगतच्या जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
आयएमडीच्या माहितीनुसार पुढील काही दिवसांमध्ये डोंगराळ भागांमध्ये बर्फवृष्टी होऊ शकते. हवामान विभागाने हिमाचल प्रदेशातील काही भागांमध्ये येलो अलर्ट जारी केला आहे. चक्रवाती वादळाबाबत बोलायचे झाल्यास आयएमडीने सांगितले की चक्रवाती वादळ २५ ऑक्टोबरच्या संध्याकाळी खेपुपारा आणि चटगाव यांच्यात बांगलादेशचा किनारा पार करण्याची शक्यता आहे.
आजच्या हवामानाबाबत बोलायचे झाल्यास स्कायमेट वेदरच्या रिपोर्टनुसार आज ओडिशाच्या उत्तरी किनारी, गंगीय पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तसेच काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.