शिर्डी : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २६ ऑक्टोबर रोजी एक दिवसाच्या महाराष्ट्र आणि गोवा दौऱ्यावर येणार आहेत. महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान, पंतप्रधान मोदी राज्यात सुमारे ७,५०० कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचे लोकार्पण करणार आहेत.
पंतप्रधान मोदी हे या दौऱ्यात दुपारी एक वाजता शिर्डी येथील साईबाबा मंदिरात दर्शन आणि पूजा करणार आहेत. यानंतर अहमदनगरमध्ये सव्वा दोन वाजता निलवंडे धरणाचे जलपूजन त्यांच्या हस्ते होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी हे साई मंदिरात पूजा आणि दर्शन घेतल्यानंतर मंदिरातील नवीन दर्शन रांग कॉम्प्लेक्सचे उद्घाटन देखील करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ३ वाजून ३० मिनिटांनी शिर्डीच्या काकडी ग्राउंडवर कोट्यवधींच्या विकासकामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन देखील करतील. यानंतर पीएम मोदी शिर्डीहून गोव्याला जाणार आहेत. गोव्यातील फतोर्डा स्टेडियमवर पंतप्रधान मोदी संध्याकाळी ६ वाजता ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन करतील.
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले की, गोव्यात जन्मलेल्या भारतीय प्रोफेशनल विंड सर्फर कात्या इडा कोएल्हो गुरुवारी येथे ३७व्या राष्ट्रीय खेळांच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मशाल सुपूर्द करतील. फातोर्डा येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये पाच तास चालणाऱ्या भव्य उद्घाटन सोहळ्यात सुखविंदर सिंग आणि हेमा सरदेसाई यांच्यासह राज्यातील प्रसिद्ध कलाकार सादरीकरण करणार आहेत.