विशेष: उमेश कुलकर्णी
ते दिवस होते जेव्हा तेज गोलंदाज भारतीय क्रिकेटच्या क्षितिजावरही दिसत नव्हते. कपिलदेव नुकताच रणजी स्पर्धेत चमकत होता, तर योगराज सिंग त्याच्या बरोबरीनेच कुठेतरी चाचपडत होता. त्याच काळात भारतात फिरकीपटू चौकडीचे राज्य स्थापित झाले होते. बिशन सिंग बेदी, भागवत चंद्रशेखर, प्रसन्ना आणि वेंकटराघवन या चौकडीने जगभरातील म्हणजे इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंडच्या आणि पाकिस्तानच्या फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जोरावर नाचवण्याचा तो काळ होता. त्यातच बिशन सिंग बेदी या नावाचा दरारा जबरदस्त होता. अगदी चंद्रशेखर आणि बेदी या दोघांवरच भारताने अनेक कसोटी सामने जिंकले होते आणि बेदीच्या उंची दिलेल्या चेंडूवर इंग्लंडचे दिग्गज फलंदाज मग ते टोनी ग्रेग असोत की डेनिस एमिस, वेस्ट इंडिजचे रॉय फ्रेडरिक्स असो की गॉर्डन ग्रीनिज, नाचत होते, बीट होत होते आणि अखेर यष्टीरक्षक किंवा फॉरवर्ड शॉट लेगला उभ्या असलेल्या एकनाथ सोलकर किंवा वाडेकरच्या हाती झेल देऊन निमूटपणे तंबूत परतत होते. क्षेत्ररक्षकांची साथ लाभली तर भारतीय फिरकीपटू काय करिष्मा दाखवून जायचे, हे अनुभवण्याचा तो काळ होता. त्यानंतर भारतात उत्तम क्षेत्ररक्षक आले पण त्यांना सुयोग्य गोलंदाजी करून बळी घेणारे फिरकी गोलंदाज भारताकडे राहिले नाहीत.
जगप्रसिद्ध फिरकी चौकडीच्या पैकी एक असलेले बेदी आता काळाच्या पडद्याआड गेले आहेत. त्यांनी आपल्या गोलंदाजीच्या जोरावर भारताला अनेक सामन्यात विजय मिळवून दिले. ज्या काळात कसोटी सामने फार कमी खेळले जात, त्या काळात त्यांनी ६७ कसोटी सामने खेळले आणि २६६ कसोटी विकेट्स घेतल्या. फिरकी गोलंदाजाने सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम अनेक वर्षे त्यांच्या नावावर होता. पण नंतर अनिल कुंबळेने तो मोडला आणि मोठीच मजल मारली. बेदी आणि वाद यांचेही नातेही अतूट होते. वाईटाला वाईट तोंडावर स्पष्ट असे म्हणणारे असे बेदी होते. त्यांच्या फिरकी गोलंदाजीचे वर्णन कित्येकांनी करून ठेवले आहे. त्यात ते कित्येकवेळा चेंडूला अकारण उंची देत. त्यामुळे फलंदाजाने षटकार मारला की त्यांना आनंद होई. कारण पुढचा चेंडू त्या फलंदाजाचा मृत्युलेख घेऊन येणारा असे. त्यानुसारच पुढच्या चेंडूवर षटकाराने उत्साहित झालेला फलंदाज तसेच खेळायला जाई आणि मिडविकेट किंवा मिडॉनला झेल देऊन बसे. बेदी धावा देण्याबाबत मात्र कधी कंजुषी करत नसत. त्यांना विकेट मिळवण्यासाठी धावांचे मोल द्यावेच लागत असे.
वेंकटराघवन हा कंजुष म्हणून प्रसिद्ध होता. चंद्रशेखरला तर आपला पुढचा चेंडू कसा पडणार आहे, त्यांनाही कळत नसे. त्यामुळे वेंकटराघवन किंवा चंद्रशेखर यांची गोलंदाजी झाली की बेदींचे षटक खेळण्यास फलंदाज नको तितके आरामात खेळायला जात आणि झेल देऊन बसत. एक मात्र सांगायला हवे. आज भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण अत्यंत सुधारले आहे. आजच्यासारखे क्षेत्ररक्षक त्या काळात भारताला मिळाले असते तर फिरकी चौकडीच्या विकेट्सच्या संख्येत कितीतरी भर पडली असती. आजच्या सारखे म्हणजे रवींद्र जाडेजासारखे क्षेत्ररक्षक त्या काळात असते तर बेदी आणि प्रसन्ना यांच्या विकेट्सची संख्या शेकड्यांनी भरली असती. तेव्हा भारतीय क्षेत्ररक्षक केवळ चेंडूला सोबत करण्यासाठी धावत असत. बेदी १९६६ पासून भारतीय क्रिकेटमध्ये आले आणि त्यांनी तेव्हापासून दहा बारा वर्षे भारतीय क्रिकेटमध्ये फिरकीपटूंचे स्थान अव्वल दर्जाचे राखले होते.
फिरकीपटूंचा त्या काळात बोलबाला इतका होता की त्या काळात अबीद अली किंवा सोलकर वगैरे उगीचच चेंडू उष्टावल्यासारखे सुरुवातीची पाच सहा षटके गोलंदाजी करत आणि दिवसभर मग चेंडू फिरकीपटूंच्या हातातच राही. बेदींचा गोलंदाजी टाकण्याचा स्टॅमिना प्रचंड होता. त्या काळात त्यांना तो ठेवावाच लागे. कपिलदेव, कर्सन घावरी, रॉबिन सिंग वगैरेचा उदय त्या काळात क्षितिजावरही दिसत नव्हता. तेव्हाची ही गोष्ट आहे. बेदी यांनी अनेकदा वाद ओढवून घेतले. इंग्लंडचा संघ भारताच्या दौऱ्यावर आला असताना त्यांनी जॉन लिव्हर या इंग्लिश गोलंदाजावर तो व्हॅसलिनच्या पट्ट्या कपाळाला लावून गोलंदाजी करत असल्याचा आरोप केला होता. व्हॅसलिन लावल्याने चेंडूला अतिरिक्त चमक येते, असे त्यांचे म्हणणे असे. पुढे हा आरोप फेटाळला गेला आणि त्या काळात भारतीय क्रिकेट मंडळ इंग्लंडच्या गुलामीतून बाहेर आलेले नसल्याने या आरोपाची शहानिशा करण्याची जबाबदारी एमसीसी म्हणजे इंग्लंडच्या क्रिकेट मंडळालाच सोपवण्यात आली. अर्थात मग इंग्लिश क्रिकेट मंडळाने लिव्हरला क्लीनचिट देणे हे ठरलेलेच होते. पण यामुळे बेदी हे चर्चेत आले होते. बेदी यांना एकदा सामन्यातून घरी बसवल्यावर प्रेक्षकांनी दंगाही केल्याचे आता आठवते. पण नंतर बेदी यांचा समावेश संघात केल्यावरच पुढे सामना होऊ शकला होता. बेदी आणि गावसकर यांच्यात वाद निर्माण झाले आणि पतौडी संपादक असलेल्या स्पोर्ट्सवर्ल्ड या मासिकाने त्यात आग ओतली. त्यामुळे बेदी यांनी आपल्याला संघातून काढण्यामागे गावसकर हाच असल्याचा आरोप केला होता. पण हा विवाद मात्र देशभरात गाजला होता. पुढे त्याचे काहीही झाले नाही.
बेदी यांची फिरकी गोलंदाजी खेळणे आणि तीही भारतीय कसोटी खेळपट्ट्यांवर अत्यंत अवघड होते, हे मात्र निश्चित होते. त्यांचा तो उंची दिलेला चेंडू कधी विकेट घेऊन जाईल, ते कुणालाच कळत नसे. बेदी, प्रसन्ना, वेंट आणि चंद्रशेखर या चौकडीने भारताच्या नशिबात अनेक विजय आणले, हेच एक सत्य आहे. त्यांच्या गोलंदाजीवर परदेशी खेळाडू नाचत असत आणि ते पाहायची भारतीय प्रेक्षकांना सवय लागली होती. बेदी यांना
भावपूर्ण श्रद्धांजली!