दिल्ली: ऑस्ट्रेलियाचा फलंदाज ग्लेन मॅक्सवेलने दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियममध्ये वनडे वर्ल्डकपमधील सर्वात वेगवान शतक ठोकले आहे. त्याने ४० बॉलमध्ये ८ चौकार आणि ८ षटकारांच्या मदतीने आपले शतक पूर्ण केले. तो ४४ बॉलमध्ये ९ चौकार आणि ८ षटकारांच्या मदतीने १०६ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याचा बॅटिंग स्ट्राईक २४०.९१ इतका होता.
मॅक्सवेलने ही कामगिरी नेदरलँड्सविरुद्ध केली. त्याने वर्ल्डकपमधील सगळ्यात वेगवान शतक ठोकण्याच्या यागीत दक्षिण आफ्रिकेच्या एडन मार्करेचा रेकॉर्ड तोडला. त्याने ४९ चेंडूत आपले शतक पूर्ण केले होते. याच वर्ल्डकपमध्ये एडन मार्करमने श्रीलंकेविरुद्ध खेळवण्यात आलेल्या सामन्यात ४९ बॉलमध्ये शतक ठोकले होते.
मॅक्सवेलच्या शतकाबाबत बोलायचे झाल्यास त्याने नेदरलँड्सच्या गोलंदाजांना पूर्णपणे लोळवले. तो ३९.१ षटकांत सहाव्या विकेटसाठी बॅटिंगसाठी उतरला आणि त्याने ४८.५ ओव्हरमध्ये आपले शतक पूर्ण केले. म्हणजेच मॅक्सवेलने १० ओव्हरपेक्षाही कमीमध्ये आपले शतक पूर्ण केले. याआधी मॅक्सवेलने २०१५च्या वनडे वर्ल्डकपमध्ये
सामन्यात ५१ बॉलमध्ये शतक ठोकले होते.
वनडे वर्ल्डकपमधील सगळ्यात वेगवान शतक
ग्लेन मॅक्सवेल(ऑस्ट्रेलिया) विरुद्ध नेदरलँड्स, २०२३ – ४० बॉल
एडन मार्करम(द. आफ्रिका) विरुद्ध श्रीलंका, २०२३ – ४९ बॉल
केविन ओब्रायन(आयर्लंड) विरुद्ध इंग्लंड, २०११ – ५० बॉल
ग्लेन मॅक्सवेल(ऑस्ट्रेलिया) विरुद्ध श्रीलंका, २०१५ – ५१ बॉल
ऑस्ट्रेलियाने नेदरलँड्सला दिले ४०० धावांचे आव्हान
दिल्लीमध्ये खेळवल्या जात असलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नेदरलँड्सविरुद्ध खेळताना ५० ओव्हरमध्ये ८ बाद ३९९ धावा केल्या. सलामीवीर डेविड वॉर्नरने ९३ बॉलमध्ये ११ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने १०४ धावांची खेळी केली. त्यानंतर सहाव्या स्थानावर उतरलेल्या ग्लेन मॅक्सवेलने ४४ बॉलमध्ये ९ चौकार आणि ८ षटकारांच्या मदतीने १०६ धावा केल्या.