मॉस्को : रशियाचे (Russia) राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांना हार्टअटॅक (Heart attack) आल्याच्या बातम्या सकाळी सर्व माध्यमांतून दाखवण्यात आल्या होत्या. क्रेमलिन म्हणजेच रशियन सरकारमधीलच एका माजी अधिकार्याच्या टेलिग्राम चॅनेलने हा दावा केला होता. WION या वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले होते. मात्र, ही बातमी खरी नसून केवळ अफवा असल्याचे समोर आले आहे. रशियन सरकारने व्लादिमीर पुतिन एकदम तंदुरूस्त असून हार्टअॅटॅकच्या अफवा असल्याचे स्पष्ट केले आहे.
टेलिग्राम चॅनेलने केलेला पुतिन यांच्या हार्टअॅटॅकचा दावा क्रेमलिनने म्हणजे रशियन सरकारने फेटाळून लावला आहे. त्यांनी सांगितलं की, व्लादिमीर पुतिन एकदम तंदुरूस्त आहेत. टेलिग्राम चॅनेलकडून असाही एक दावा करण्यात आला होता की, पुतीन गेल्या काही दिवसांमध्ये ज्या ज्या ठिकाणी विदेश दौऱ्यावर जात होते, तेथे ते बॉडी डबल्ससह उपस्थित होते. तर आता हार्टअॅटॅक आल्यानंतर ते त्यांच्या निवासस्थानी एका स्पेशल इनटेंसिव केअर यूनिटमध्ये उपचार घेत आहेत. तसेच डॉक्टरांनी त्यांच्यावर वेळीच उपचार करत हार्ट सर्जरी केली असून ते शुद्धीवर आले आहेत. मात्र, पत्रकारांशी बोलताना क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी हे सर्व दावे फेटाळले.
क्रेमलिनने एक पत्रकही प्रसिद्ध केले आहे ज्यामध्ये देखील हार्टअॅटॅकचा दावा फेटाळून लावण्यात आला आहे. दरम्यान, २०२२ पासून अनेक अहवालांमध्ये दावा करण्यात आला आहे की, पुतीन हे कॅन्सर आणि पार्किन्ससने ग्रस्त आहेत. त्यामुळेच ते सार्वजनिक ठिकाणी जास्त जात नाहीत. तसेच या अगोदर देखील टेलिग्रामवर पुतिन यांच्या निधनाची अफवा पसरवण्यात आली होती. त्यामुळे अशा अफवा रशियन सरकारने फेटाळून लावल्या आहेत.