सेवाव्रती: शिबानी जोशी
‘‘आसिंधु सिंधु-पर्यन्ता यस्य भारत-भूमिका। पितृभूः पुण्यभूश्चैव स वै हिंदुरिति स्मृतः॥’’
हिंदू व्यक्ती या शब्दाचा अर्थ हाच आहे की, जी व्यक्ती सिंधू क्षेत्रापासून सागरापर्यंत या भारत भूमीला आपली पितृभूमी किंवा पुण्यभूमी अर्थात आपल्या धर्माची जननी मानते.
वीर सावरकर – हिंदुस्तानचे विभाजन १९४७ साली झालं आणि सिंध प्रांत पाकिस्तानमध्ये गेला, या भागात राहणारे सिंधी बांधव बेदखल झाले. सिंधी समुदाय हा छोटा समुदाय होता. फाळणीचे चटके सोसणाऱ्या या समाजातील लोकांनी हिंदुस्थानात मिळेल तिथे आपला डेरा जमवला आणि उद्योगधंदा, नोकरी मिळवून स्वतःला प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. हा समाज शांतिप्रिय आणि मिळून-मिसळून राहणारा आहे. त्याने कुठली आरक्षणं मागितली नाही. सिंधी लोकांमुळे कुठेही दंगेधोपे, कलह झाल्याचं आपल्याला दिसून येत नाही. सिंध प्रांतातून पलायन केल्यानंतर सुरक्षित आयुष्य आणि उपजीविकेचे साधन शोधण्यासाठी मुख्यत्वे मुंबई, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यांमध्ये सिंधी समाज विखुरला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना १९२५ मध्ये झाली तेव्हापासून सिंध प्रांतातही संघाचं कार्य सुरू होतं. यापैकी अनेक सिंधी लोक संघाचे स्वयंसेवक होते. यापैकी निवडक राजकारणातही आले होते. आपल्याला माहीतच असेल चेंबूर हा एकेकाळी मुंबईच्या सीमेवर वसलेला अविकसित भाग होता, त्याचा मोठा विकास करणारे, शिक्षणाचे जाळे निर्माण करणारे भाजपाचे माजी मंत्री हशू अडवाणी होते.
सिंधी समाज भारतभूमीलाच आपली मातृभूमी मानत आला आहे. आधीच मूठभर समाज त्यात तो विखुरला गेलेला असल्यामुळे सिंधीपण हरवण्याची भीती निर्माण झाली होती. सिंधी भाषा, सिंधी संस्कृती टिकून राहावी यासाठी काहीतरी करण्याची गरज सिंधी स्वयंसेवकांना वाटू लागली. तसा प्रयत्न १९५१ साली केला गेला. त्यानंतर १९७९ मध्ये एक कुंभमेळा झाला होता, त्या ठिकाणी अनेक वरिष्ठ स्वयंसेवक एकत्र आले होते. त्यावेळी अशी संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतला गेला. २९ मार्च १९७९, चेटी चांद (सिंधी नववर्ष) दिनी जनसंघाचे त्यावेळचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष झमटमल वाधवानी, चेंबूरमधले सुप्रसिद्ध आमदार भाजप नेते हशू आडवानी, हरि समतानी, वासदेव वलेचा, छत्रसाल ए. मुक्ता, बलदेव बुलानी, ईश्वरी जेटली, के. टी. शाहनी, मोहन मोटवानी, लक्ष्मण चंदीरामानी या संघविचारी लोकांनी “भारतीय सिंधुसभा” या संस्थेची स्थापना केली आणि त्याच दिवशी मुंबई शाखेचे उद्घाटन झाले
हशू आडवाणी यांच्या अध्यक्षतेखाली आणि ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांच्या उपस्थितीत भारतीय सिंधुसभेची पहिली अखिल भारतीय बैठक १९८० मध्ये पार पडली. त्यात देश-विदेशातून ३५० प्रतिनिधी सहभागी झाले होते. भारतीय सिंधुसभा १ ऑगस्ट १९८० साली पंजिकृत झाली. स्थापनेपासूनच संस्थेने कधीही मागे वळून पाहिलं नाही. मुख्य हेतू अर्थातच सिंधी संस्कृती टिकवणे, सिंधी निर्वासितांचं पुनर्वसन तसेच ज्या विधवा झाल्या आहेत, अजूनही गरीब आहेत, अशांना आर्थिक मदत करणं आणि आपण राहात आहोत, त्या समाजासाठीसुद्धा समाजकार्य करणे असे होते. गेल्या ३८ वर्षांत संस्थेचे आठ हजारांहून अधिक सदस्य झाले आहेत आणि देशभरात जवळजवळ ४५० शाखा कार्यरत आहेत. त्यात युवा, महिला अशा वेगवेगळ्या शाखाही चालतात. एकट्या मुंबई शहरातच नऊ शाखा कार्यरत आहेत. संस्थेचे मुख्य कार्यालय मुंबईतल्या वांद्रे येथे आहे. या ठिकाणी दर महिन्याला दोन बैठकांचं आयोजन होत असे मुंबई आणि महाराष्ट्राचे तसेच सांस्कृतिक मंचाचे विद्यमान उपाध्यक्ष विरू दुलानी यांनी सांगितलं. अखिल भारतीय अध्यक्ष राहिलेले लधाराम नागवाणी तसेच सध्याचे अध्यक्ष भगतराम छाबडा यांच्यासारखे अनेक स्वयंसेवक संस्थेसाठी निष्ठेने काम करत आहेत.
सर्व राज्यांसाठी वेगवेगळ्या कार्यकारिणी काम करत असतात. अशा प्रकारची सिंधी लोकांची इतकी मोठी ही एकमेव संघटना असावी. सिंधी समुदायाशी संबंधित विभिन्न मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी नियमित कालावधीनंतर अखिल भारतीय कार्यकर्ता आणि पंचायत सम्मेलनं आयोजित केली जातात. २००७ साली इंदूर येथे आयोजित केलेल्या संमेलनात विविध शहरांतून दहा हजारांहून अधिक सिंधी लोक आले होते.
गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत दिली जाते. सिंधी भाषा टिकून राहावी, लोप पावू नये यासाठी सिंधी शिकवण्याचे क्लास चालवले जातात. खरंतर काही वर्षांपूर्वी मुंबईत चार-पाच सिंधी माध्यमाच्या शाळा होत्या; परंतु आता सर्वांचं इंग्रजी माध्यमाकडे जाण्याचं प्रमाण वाढत आहे. तसच सिंधी समाजातही झाल्यामुळे शाळा बंद पडल्यात; परंतु तरीही सिंधी मुलांना सिंधी भाषा अवगत असावी, यासाठी सिंधी भाषा शिकवण्याचे क्लास चालतात. खरंतर सिंधी भाषेची लिपी ही सुरुवातीला देवनागरीत होती; परंतु मुघलांच्या आक्रमणानंतर भाषेची लिपी अरेबिक झाली होती. ती नंतर पुन्हा एकदा देवनागरी करण्यात आली आहे; परंतु जुनं दर्जेदार साहित्य अजूनही अरेबिक लिपीत असल्यामुळे तरुण वर्गाला ते वाचता येत नाही. त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असं संस्थेचे उपाध्यक्ष दुलानी यांनी सांगितलं. सिंधी समाजातही अनेक संत-महात्मे होऊन गेले. संत तोलाराम राम यांचे साहित्य वाचणं गरजेचं आहे.
संघटनेचं ब्रीदवाक्य आहे “सेवा संघटन संस्कार” त्यानुसार चरित्र निर्माण, सामाजिक-सांस्कृतिक संस्थांचा विकास होण्यासाठी प्रयत्न केले जातात. आपली संस्कृती येणाऱ्या पिढीला समजावी यासाठी पालकांचं प्रशिक्षण होणं गरजेचं आहे, हे लक्षात घेऊन पालकांना प्रशिक्षण दिलं जाते. वाचनालय, शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्था सुरू करणे किंवा चांगल्या संस्थांना मदत करणे असे सामाजिक कार्य केले जाते. सिंधी लेखक, कवी, कलाकारांना प्रोत्साहित करण्यासाठी सहकार्य केले जाते. गरिबांना आरोग्य सुविधा, वृद्ध तसंच अपंगांसाठी अनाथालय, तीर्थयात्रा असे उपक्रमही संस्था चालवते. सिंधू संस्कृतीतील तसेच हिंदू संस्कृतीतील सण,उत्सव दरवर्षी उत्साहात साजरे केले जातात. मकर संक्रांत, शहीद हेमू कलानी बलिदान दिवस, महाशिवरात्री, होळी, चेट्टी चांद, सिंधी भाषा दिवस, हिन्दू सामराज्य दिवस, शिवाजी महाराज जयंती ‘गुरुपूर्णिमा, बेलिसन दिवस, रक्षाबंधन, स्वातंत्र्य दिवस, विजयादशमी, दीपावली असे काही सण-उत्सव महाराष्ट्र, मुंबई, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटक, बंगाल इथल्या शाखांमध्ये दरवर्षी साजरे होतात. मुंबईमध्ये विशेषकरून चेटी चांदसोबत गुढीपाडवाही साजरा केला जातो. यात चेंबूर येथील विवेकानंद एज्युकेशन सोसायटी तसंच शिवाजी पार्क इथे कार्यक्रम आयोजित केले जातात. १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला सिंधी स्मृती दिवसही साजरा केला जातो.
भारत तसेच जगभरात पसरलेल्या सिंधी समाजात सांस्कृतिक, अध्यात्मिक, नैतिक आणि शैक्षणिक उत्थान करणे आणि आपण ज्या समाजात राहतो, त्या समाजाला मदत करण्यासाठी भारतीय मूल्यांना अनुसरून कार्य करणे हे प्रमुख उद्देश भारतीय सिंधू सभेचे आहेत. त्याशिवाय आरोग्य शिबीर भरवणं, हस्तकला, माती काम यांचे प्रशिक्षण वर्ग देखील चालवले जातात. सिंधी भाषेचा प्रचार, प्रसार व्हावा तसंच लोकांना माहिती मिळावी यासाठी संस्थेने वेळोवेळी पुस्तक, न्यूज लेटर्स, वृत्तपत्रांचं प्रकाशन मुंबई, जयपूर, कानपूर अशा ठिकाणाहून केलं गेलं आहे. काही ठिकाणी वाचनालय सुरू करण्याचे प्रयत्नही केले आहेत.
देशभरातल्या काही शाखा गरिबांना रेशनचं धान्य पुरवणं, त्यांना रुग्णालयात अॅडमिशन मिळवून देणे शिवाय आर्थिक मदत करणे, तसेच सामूहिक विवाह कार्यक्रम, सामूहिक उपनयन संस्कारसुद्धा आयोजित करतात. त्याशिवाय विवाह वधू-वर सूचक मंडळदेखील चालवले जाते. अशा प्रकारचं काम मुंबई, इंदूर, कानपूर, कोटा, सतना या शहरातून चालते. त्याशिवाय हुंडाबंदीसारख्या प्रथा बंद व्हाव्यात, यासाठीसुद्धा संस्थेने आवाज उठवला होता.
संस्थेचा आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम म्हणजे भारतीय सिंधू सभेने सुरू केलेली सिंधू दर्शन ही यात्रा. सिंधू नदीला अभिवादन करण्यासाठी ही यात्रा काढली जाते. यात सनातन धर्म मानणारे इतर भाषिकसुद्धा आता सहभागी होतात. लेह-लडाख इथे सिंधू नदीचा उगम होतो, त्या ठिकाणी ही यात्रा गेली सत्तावीस वर्षे निघत आहे. दरवर्षी अंदाजे १५०० ते २००० जण यात सहभागी होतात. काही वर्षांपासून यात्रेकरूंची संख्या वाढल्यामुळे ही यात्रा दोनदा सुद्धा काढली जाते. सिंधू नदीचे पूजन केलं जातं तसंच लेह लडाखची सीमा जिथे चीनला मिळते, त्या ठिकाणी सीमेवर जाऊनही दर्शन घेतलं जाते. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केलं जाते. लेह-लडाखमध्ये राहणारे बौद्धजन आणि त्यांचा हिमालया परिवारही यात सहभागी होतो. अशा रितीने संघ स्वयंसेवकांनी एकत्रित येऊन स्थापन केलेली “भारतीय सिंधसभा” सिंधी बांधवांसाठी तसेच देशभरात ते जिथे जिथे वास्तव्य करत आहेत, तिथल्या समाजात समरस होऊन कार्य करीत आहे.
joshishibani@yahoo. com