Thursday, June 12, 2025

आयुष्य वाकण्यात गेलं, तुम्ही ठाकरे नाही 'वाकरे' आडनाव लावा

आयुष्य वाकण्यात गेलं, तुम्ही ठाकरे नाही 'वाकरे' आडनाव लावा

ज्योती वाघमारेंची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका


मुंबई : आम्हाला मिंधे म्हणता, तुम्ही अडीच वर्षे काय धंदे केले ते सांगा. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसमोर वाकण्यात आयुष्य गेलं, त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी ठाकरे नव्हे तर वाकरे आडनाव लावावे, अशी जहरी टीका शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या ज्योती वाघमारे यांनी केली. ज्या बाईने बाळासाहेबांना थेरडा असं संबोधलं, त्याच बाईला उद्धव ठाकरे आज सन्मान देतात, अशीही टीका त्यांनी सुषमा अंधारे यांचं नाव न घेता केली.


ज्योती वाघमारे उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना म्हणाल्या की, तिकडे जमले आहेत सत्तेसाठी इमान विकलेले कावळे आणि इकडे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे. आज या दसरा मेळाव्याच्या मंचावरून मी प्रश्न विचारते की मर्द कुणाला म्हणायचं? कोरोना काळात घरात बसणारा की पीपीई किट घालून रुग्णांची भेट घेणारा? अडीच वर्षात अडीच तास मंत्रालयात जाणारा मर्द नसतो, रात्री तीन वाजेपर्यंत काम करणारा मर्द असतो. पेंग्विन आणणारा मर्द नाही तर अफजलखानाची वाघनखं आणणारा मर्द असतो. बाळासाहेबांच्या विचारांसाठी छाताडावर केसेस घेणारा मर्द असतो. मतांसाठी पावसात भिजणारे भरपूर असतात. पण लोकांच्या मदतीसाठी धावणारा मर्द असतो. अफजल खानाची समाधी उद्ध्वस्त करणारा मर्द असतो. एकनाथ शिंदे यांनी महिलांना सन्मान देणारी बाळासाहेब ठाकरेंची महिला आघाडी उभी केली, महिलांना सन्मान दिला. हे आम्हाला मिंधे म्हणतात, गद्दार म्हणतात. पण बंडखोरांचा इतिहास लिहिला जातोय, तळवे चाटणाऱ्यांचा नाही.


ज्योती वाघमारेंनी आज ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर जहरी टीका केली. त्या म्हणाल्या की, बाळासाहेबांच्या जीवावर राजकारण करणाऱ्यांनी बाळासाहेबांना थेरडा म्हणणाऱ्या बाईला सन्मान दिला. तुळजाभवानीची चेष्टा करणारी बाई जर यांचा चेहरा असेल तर थू यांच्यावर. अशा बाईच्या पदराआड राजकारण करत असाल तर थू. हिंदुत्व विरोध करणाऱ्या लोकांना सन्मानाचं स्थान देताय. लोकांच्या पुढे वाकण्यात जिंदगी गेली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसमोर ते कायम झुकले. आम्हाला मिंधे म्हणताय? अडीच वर्षे घरात बसून काय धंदे केलेत?

Comments
Add Comment