हिंदू संस्कृतीतील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण आणि साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक असा जो दसरा सण आज साजरा केला जात आहे. दिवाळी पाडवा, चैत्री पाडवा आणि दसरा हे तीन पूर्ण तर एक अक्षय्य तृतीया असे हे साडेतीन मुहूर्त आहेत. यात दसऱ्याला सर्वात मोठे मानाचे स्थान आहे. याच दिवशी सोने खरेदी केले जाते. ‘दसरा सण मोठा, नाही आनंदा तोटा’ असे आपल्याकडे म्हटले जाते. दसरा सण म्हणजे वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक समजले जाते. पुराण कथांतून दसऱ्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि दसऱ्याच्या दिवशी भगवान राम यांनी रावणावर भयंकर युद्ध करून विजय मिळवला. त्या विजयाचा आनंदोत्सव म्हणून दसरा साजरा केला जातो. पौराणिक महत्त्व तर दसऱ्याचे आहेच. महिषासूर मर्दिनीने म्हणजे देवीने महिषासुराचा वध दहाव्या दिवशी केला, म्हणूनही दसरा साजरा केला जातो. पांडवांनी कौरवांशी लढण्यासाठी शमीच्या झाडावर ठेवलेली शस्त्रे याच दिवशी काढून युद्ध केले, अशीही एक पौराणिक समजूत आहे. म्हणून या दिवशी शमीच्या झाडाची पाने लुटून त्यांचे एकमेकांना वाटप केले जाते. यालाच सोने लुटणे असे म्हणतात.
दसऱ्याच्या अनेक पौराणिक कथा आहेत. पण याहीपुढे जाऊन दसरा म्हणजे वाईटावर चांगल्या वृत्तीनी मिळवलेला विजय, हे प्रतीक जास्त भावणारे आहे आणि तेच जास्त लोकप्रियही आहे. गणेशोत्सवाप्रमाणेच दसरा हाही ब्रिटिशांविरोधात जनजागृती करण्यासाठी पूर्वी बंगालमध्ये साजरा केला जायचा. १८८२ साली बंकिमचंद्र यांची ‘आनंदमठ’ ही कादंबरी प्रकाशित झाली. त्यानंतर संन्यासी विद्रोहाची संकल्पना घेऊन अनेक लढवय्ये त्यातून ब्रिटिशांविरोधात तयार झाले. त्याचा फार मोठा परिणाम ब्रिटिशांविरोधात लोकांच्या मनात संताप निर्माण करण्यासाठी झाला. जुलमी ब्रिटिशांचा संहार करण्यासाठी देवीनेच अवतार घेतला, अशी त्याकाळी समजूत होती. त्यातून दुर्गापूजा हा बंगालपुरता तरी राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जाऊ लागला. असा या सणाचा इतिहास मोठा रंजक आहे.
दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. त्यामुळे या दिवसापासून मनातील पाप सोडून देऊन चांगल्याच्या मागे जावे, हा संदेश दसरा देत असतो. नवरात्री आणि नऊ दिवस युद्ध करून दुर्गेने महिषासुराचा पराभव केला आणि त्याला ठार मारले, असेही म्हटले जाते. त्या नवरात्रीची अखेर म्हणजे दसरा, असेही समजले जाते. दसरा सणाभोवती अनेक पौराणिक कथा आहेत. प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या प्रथा असून त्यानुसार सण साजरा केला जातो. उत्तर प्रदेशात दसरा येण्यापूर्वी दहा दिवस रामलीला खेळली जाते आणि त्यात रामासह साऱ्या महाभारतातील पात्रांचे वेष घेऊन रामायण सादर केले जाते. अखेरच्या दिवशी म्हणजे दसऱ्याच्या रात्री राम रावणाचा वध करतात, तर उत्तर प्रदेशात मोठ्या प्रमाणावर रावण आणि त्याचा पुत्र मेघनाद आणि भाऊ कुंभकर्ण यांचे पुतळे जाळले जातात. त्यासाठी त्यांच्या देहांत फटाके पेरून ठेवतात आणि रात्री धडाका उडवतात. उत्तर भारतात हा प्रकार फारच लोकप्रिय आहे. प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या प्रकारे दसरा साजरा केला जातो. त्यानुसार धार्मिक विधी केले जातात. रावणाच्या प्रतिमा जगभरात जाळून दसरा साजरा केला जातो आणि हा सण भारतातच नव्हे; तर साता समुद्रापार परदेशातही मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. बँकॉकमध्ये मोठ्या प्रमाणावर हिंदूंची वस्ती आहे आणि तेथे दसरा थाटात साजरा करतात, यात काही नवल नाही. पारंपरिक प्रथेनुसार येथे दसरा साजरा होतो. जिथे जिथे भारतीय आहेत, तेथे तेथे दसरा साजरा होतो. मग तो अगदी न्यूझीलंडसारखा देश असो की, अमेरिका.
भारतीय लोक जेथे जेथे गेले तेथे आपली संस्कृती आणि आपले सणवार आणि परंपरा घेऊन गेले. त्याचे प्रतीक म्हणजे अनेक परदेशात आज दसरा साजरा उत्साहात होतो. न्यूझीलंडच्या ऑकलंडमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमही सादर केले जातात. रामलीलाही येथे सादर केली जाते. कोलंबो म्हणजे श्रीलंकेत दसरा अत्यंत प्रभावीपणे साजरा केला जातो. रावण हा लंकेचाच होता, असे मानले जात असल्याने तेथे सारे सोपस्कार अत्यंत पद्धतशीरपणे पार पाडत सण साजरा होतो.
दसरा असा जगभर साजरा होत असला तरीही त्याचा जो संदेश आहे, तो चांगल्याचा वाईटावर विजय तो मात्र सर्वत्र स्वीकारला गेला आहे. दसऱ्याला लोकांनी आपल्यातील वाईट प्रवृत्तींना मूठमाती देऊन चांगल्याचा स्वीकार करावा, हा संदेश दसरा सणाने दिला आहे. दसरा हा खरेतर लढवय्यांचा सण. त्या दिवशी छत्रपती शिवरायांचे मावळे युद्धासाठी बाहेर पडत आणि त्याच दिवशी ते रणमैदानासाठी जात. त्याला सीमोलंघन म्हटले जात असे. दसऱ्याचे शेतकऱ्यांसाठी महत्त्वही अपरंपार आहे. त्या दिवसापर्यंत खरीप पिके म्हणजे तांदूळ, ज्वारी, कापूस, सोयाबीन, मका, डाळी हे कापणीसाठी तयार झालेली असतात. दसऱ्याचा मुहूर्त साधून काही शेतकरी आपली पिकांची कापणीही सुरू करतात. भारतासाठीच नव्हे; तर जगभरच्या लोकांसाठी दसरा सण खरोखरच महत्त्वाचा आहे आणि त्यांच्या आयुष्यात चांगले परिवर्तन घडवणारा सिद्ध होत असतो. त्यामुळे दसरा आला की सारे जग चैतन्याने रसरसून जाते. सृष्टीनेही पाऊस पडून गेल्याने हिरवा शालू पांघरलेला असतो. सर्व विश्व आनंदाने न्हाऊन निघालेले असते. म्हणूनच दसरा सण मोठा, नाही आनंदा तोटा असे सार्थ वचन एका कवीने म्हटले आहे. अशा या दसऱ्याच्या सर्वांना शुभेच्छा!