महानगराध्यक्ष अविनाश शिंदे यांचा आरोप
नाशिक : दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर पांडवलेणे परिसरातील बौद्ध स्मारकात संपन्न होत असलेल्या बोधीवृक्ष फांदी रोपणाच्या कार्यक्रमाच्यावेळी जातीयवादी ना. छगन भुजबळ यांना बोधी फांदीस हात लावू देणार नाही, असा इशारा बहुजन वंचित आघाडीचे महानगराध्यक्ष अविनाश शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिल्यानंतर पोलीस यंत्रणा एक्शन मोडमध्ये आली असून त्यांनी या आघाडीच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केल्याची माहिती शिंदे यांनी दिली.
१९८७ साली दलित बांधव मुंबईच्या हुतात्मा स्मारकात जमले होते. त्यावेळी छगन भुजबळ यांनी नंतर स्मारक परिसर गोमूत्र शिंपडून शुद्ध करून घेतले होते. त्या घटनेची सांगड घालत जातीयवादी असलेले ना. भुजबळ यांना बोधी फांदीस हात लावण्याचा कोणताच अधिकार नाही. त्यांनी आधी बहुजन समाजाची माफी मागावी आणि नंतरच बोधी फांदीस हात लावावा, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे महानगराध्यक्ष अविनाश शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिला आणि त्याच्या क्लिप्स सर्व दूर व्हायरल झाल्यानंतर बोधीवृक्ष फांदीरोपण कार्यक्रमावर कोणताही विपरित परिणाम होऊ नये त्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि कार्यकर्त्यांवर १४९ अंतर्गतच्या नोटिसा बजावल्या आहेत. तसेच काहींची धरपकडही सुरू केल्याचा आरोप अविनाश शिंदे यांनी केला आहे.
बळाचा वापर करून पोलीस बहुजन वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करीत असून हे लोकशाहीच्या दृष्टीने घातक आहे, असा आरोप करून वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते कोणत्याही बाबतीत कमी पडणार नाहीत आणि गनिमी काव्याने आम्ही आमचा लढा सुरूच ठेवू असे अविनाश शिंदे यांनी नमूद केले.