Enemy countries : परदेशात कोण संपवतेय भारताच्या शत्रूंना?

Share
  • भागा वरखडे

गेल्या काही महिन्यांपासून भारतावर हल्ले करणाऱ्यांचा खात्मा होत आहे. काश्मीर, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि कॅनडामधील भारताच्या या कथित शत्रूंचा नाश कोण करत आहे, याबद्दल कुतूहल निर्माण झाले आहे. यामागे ‘रॉ’चा हात असल्याचे आरोप केले जात असले, तरी ते कुणीही सिद्ध करू शकलेले नाही. गेल्या आठ-नऊ महिन्यांमध्ये अशा सुमारे २५ कट्टर अतिरेक्यांचा खात्मा झाल्याने भारताने मात्र सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.

भारतावर हल्ला करून, भारतात दहशतवादी कृत्ये करून अन्य देशांमध्ये लपलेल्या दहशतवाद्यांना आपण सुरक्षित आहोत, असे वाटत होते; परंतु आता त्यांना आश्रयस्थानही सुरक्षित नाही, हे कळू लागले आहे. कारण पाकिस्तानमधील दहशतवादाचा अड्डा आता अंतर्गतच उद्ध्वस्त झाला आहे. प्रत्यक्षात ज्या ठिकाणी दहशतवाद्यांनी लपण्याचे ठिकाण बनवले होते, ती जागा आता कमी होत आहे. पाकिस्तानचे नेते आता सत्तासंघर्षात अडकले आहेत. ८ सप्टेंबर रोजी पाकव्याप्त काश्मीरमधील (पीओके) मशिदीत निर्जीव पडलेल्या रियाझ अहमद ऊर्फ अबू कासिमच्या भीतिदायक चित्राने या दहशतवादी जगाचा मुखवटा उघडण्यास सुरुवात होते. त्याच्या आजूबाजूला रक्त पसरले होते. रावळकोटमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी त्याची गोळ्या झाडून हत्या केली. ‘लष्कर’च्या मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांपैकी एक असलेल्या रियाझ ऊर्फ अबू कासिमने १९९९ मध्ये सीमा ओलांडून भारतात प्रवेश केला होता. त्यानंतर त्याने भारतात अनेक दहशतवादी हल्ले केले. त्यात गेल्या जानेवारीमध्ये राजौरी जिल्ह्यात झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचाही समावेश होता. आय सी-८१४ विमानाच्या अपहरणापासून संसदेवरच्या हल्ल्यापर्यंत, पठाणकोट एअरबेस हल्ल्यापासून पुलवामा बॉम्बस्फोटापर्यंत एक नाव पुढे येत राहते. ते म्हणजे मौलाना मसूद अझहर. तो ‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेचा संस्थापकही आहे.

फेब्रुवारी २०१९ मध्ये भारतीय लढाऊ विमानांनी बालाकोटमधील ‘जैश-ए-मोहम्मद’च्या दहशतवादी तळांवर हल्ला केला, तेव्हा फरार मसूद अझहरला पेशावरमधील मदरशामध्ये आश्रय मिळाला; मात्र बरोब्बर दोन महिन्यांनंतर, मसूद अझहरने ज्या भागात आश्रय घेतला होता, त्या भागात एका स्फोटाने जमीन हादरली. पण तो थोडक्यात बचावला. तेव्हापासून दहशतवादी मास्टर मसूद अझहर लोकांच्या नजरेतून गायब आहे. हिज्बुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेच्या कमांडर बशीर अहमद पीरचाही अलीकडे दुःखद अंत झाला. जम्मू-काश्मीरमध्ये सशस्त्र दहशतवाद्यांची भरती आणि घुसखोरी करण्यासाठी तो जबाबदार होता. पीरने आपला बॉस सय्यद सलाहुद्दीन यांच्यासह अनेक वर्षे पाकिस्तान सरकारच्या संरक्षणात काम केले; पण या वर्षाच्या सुरुवातीला त्याला अगदी जवळून गोळ्या घालून ठार करण्यात आले. आता प्रश्न असा आहे की, ही प्रकरणे एकाकी घटना आहेत की मोठ्या पॅटर्नचा भाग आहेत?

अल-बद्र कमांडर सय्यद खालिद रझा आणि जैश-ए-मोहम्मद मेकॅनिक झहूर इब्राहिम यांना कराचीमध्ये वेगवेगळ्या हल्ल्यांमध्ये गोळ्या घालून ठार करण्यात आले. ‘इंडियन एअरलाइन्स’च्या आय सी १८४ या विमानाचे अपहरण करणाऱ्यांमध्ये हे दोघेही होते. खलिस्तान कमांडो फोर्सचा म्होरक्या परमजीत सिंग पंजवार ऊर्फ मलिक सरदार सिंग याच्याबाबतही लाहोरमध्ये असाच प्रकार घडला. लाल मोहम्मद, रियाझ ऊर्फ कासिम आणि बशीर अहमद पीर हे दहशतवादी अज्ञात मारेकऱ्यांच्या हातून ठार झाले. भारतीय चलनाच्या व्यापारात सहभागी असलेला संशयित आयएसआय कार्यकर्ता लाल मोहम्मद याला गेल्या वर्षी नेपाळमधील काठमांडूच्या बाहेर पाठलाग करून गोळ्या घालून ठार करण्यात आले होते. गेल्या काही वर्षांमध्ये भारताच्या मोस्ट वाँटेड यादीतील काही अतिभयंकर लोकांवर थेट हल्ले झाले आहेत. जून २०२१ मध्ये, जागतिक दहशतवादी हाफिज सईदच्या शेजारी एक शक्तिशाली स्फोट झाला. याआधी त्याचा मुलगा तल्हा सईदही लाहोरमध्ये झालेल्या स्फोटात जखमी झाला होता.

कॅनडातील सरे येथे फुटीरतावादी संघटनेचा खलिस्तान टायगर फोर्सचा प्रमुख हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येने या भीतिदायक यादीत भर घातली आहे. या सर्व घटनांनंतर, पाकिस्तानच्या गृह मंत्रालयाने केवळ भारतीय गुप्तचर संस्था ‘रिसर्च अँड अॅनालीसीस विंग (रॉ)लाच दोषी धरले नाही, तर बरेली तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या बबलू श्रीवास्तवकडेही बोट दाखवले. तथापि, नवी दिल्लीतील गुप्तचर तज्ज्ञांनी हे दावे ठामपणे नाकारले आणि या हत्यांमध्ये ‘रॉ’चा सहभाग नसल्याचे स्पष्ट केले. या घटना पाकिस्तानी एजन्सींच्या आकलनापलीकडच्या नियंत्रित अनागोंदीचा परिणाम असू शकतात असे तज्ज्ञांचे मत आहे. पाकिस्तानमध्ये भारताचे नुकसान करण्यासाठी पाकिस्तानी आस्थापना आणि एजन्सींनी निर्माण केलेले विविध गैर-राज्य गट आता स्वतःचे अस्तित्व, सत्ता आणि महत्त्व यांच्या संघर्षात अडकले आहेत. पाकिस्तानच्या ‘इंटेलिजन्स ब्यूरो’ने अलीकडेच माजी पॅरामिलिटरी फेडरल लॉ एन्फोर्समेंट कॉर्प्स कमांडो मोहम्मद अलीचा पाकिस्तानमधील काही हल्ल्यांमध्ये सहभाग स्वीकारला आहे.

वेगवेगळ्या देशांमध्ये दहशतवादी पाठवण्याचे पाकिस्तानच्या ‘आयएसआय’चे धोरण आहे. ते आपल्याच लोकांचा नाश करतात. पाकिस्तान, पीओके किंवा कॅनडामध्ये असे अनेक लोक मारले गेले आहेत. ते पाकिस्तानसाठी दायित्व बनले होते. काश्मीरमध्ये दहशत पसरवणारा दहशतवादी खालिद रझा याची कराचीमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली. आठवडाभरात पाकिस्तानात मारला गेलेला हा भारताचा दुसरा शत्रू आहे. अशा स्थितीत भारताच्या या शत्रूंना पाकिस्तानमध्ये कोण मारत आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आठवडाभरात दोन दहशतवादी ठार झाल्यानंतर पाकिस्तानमध्ये लपलेले भारताचे शत्रू घाबरले आहेत. यामुळेच पाकिस्तानी लष्कराने दहशतवादी सय्यद सलाहुद्दीनला सुरक्षेसाठी बुलेटप्रूफ कार दिली आहे.

खालिद रझा हा ‘अल बद्र’ नावाच्या दहशतवादी संघटनेचा कमांडर होता. तो काश्मीरमधून पाकिस्तानमध्ये पळून गेला होता आणि तिथून दहशतवाद्यांची भरती करत असे. खालिद रझाच्या हत्येचे वृत्त पाहिल्यास ज्यांनी खालिदची हत्या केली, त्यांनी विशेष प्रशिक्षण घेतलेले दिसते. पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्सनुसार, खालिद रझा कराचीतील आपल्या घराबाहेर उभा होता. या वेळी दुचाकीवरून दोघे आले. त्यापैकी एकाने खालिदच्या डोक्यात गोळी झाडली. काश्मीरमधील अनेकांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या व्यक्तीला एकाच गोळीने ठार करण्यात आले. आठवडाभरापूर्वी ‘हिज्बुल’चा दहशतवादी इम्तियाज आलम ऊर्फ बशीर अहमद पीरला रावळपिंडीमध्ये पाकिस्तानी लष्कराच्या नाकावर टिच्चून ठार करण्यात आला. रावळपिंडी हे पाकिस्तानी लष्कराचे मुख्यालय आहे. भारताविरोधात दहशत पसरवणारा सय्यद सलाहुद्दीनही बशीर अहमद यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झाला होता.

कराचीमध्ये मारल्या गेलेल्या सय्यद खालिद रझा याच्या हत्येची जबाबदारी ‘सिंधू देश रिव्होल्युशनरी आर्मी’ने (एसआरए) घेतली आहे. पाकिस्तान या संघटनेला घाबरतो. ही संघटना पाकिस्तानमध्ये वेगळ्या सिंधू देशाच्या मागणीसाठी आंदोलन करत आहे. सिंध मुत्ताहिदा चळवळीतून या संघटनेला वैचारिक बळ मिळते. पाकिस्तानमध्ये वेगळ्या देशाची मागणी करणाऱ्या ‘सिंध मुत्ताहिदा मूव्हमेंट’चे प्रमुख सफी दुरफत म्हणतात की पाकिस्तानच्या स्थापनेपासून आम्ही हा देश आमचा नाही, असे म्हणत आहोत. एकीकडे सिंधू देशासाठी राजकीय हालचाली सुरू असताना, दुसरीकडे सिंधू देश क्रांती सेना पाकिस्तानच्या दहशतवाद्यांना समजते त्याच भाषेत इशारा देत आहे. ‘सिंधू देश क्रांतिकारी सेना’ म्हणजेच ‘एसआरए’ ही एक सशस्त्र संघटना आहे. ही संघटना सिंध प्रांताला वेगळा देश बनवण्याची मागणी करत असून त्यासाठी सशस्त्र चळवळ चालवत आहे. ‘एसआरए’ने पाकिस्तानचे विघटन करण्याची शपथ घेतली आहे. त्यामुळे पाकिस्तान आपल्याच दहशतवाद्यांच्या मृत्यूनंतर अडचणीत सापडला आहे.

भारताचा आणखी एक मोठा शत्रू शाहिद लतीफ संपला आहे. शाहिद लतीफ हा २०१६ मध्ये पठाणकोट हल्ल्याचा मास्टरमाईंड होता. त्याने भारतीय जवानांवर हल्ल्याचा कट रचला होता. ‘एनआयए’च्या मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांच्या यादीत शाहिदचा समावेश होता आणि तो ‘जैश-ए-मोहम्मद’चा कडवा दहशतवादी होता. ११ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानमधील सियालकोटमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी शाहिदची गोळ्या झाडून हत्या केली होती. इंटरपोलने दहशतवादी लतीफविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. तो १६ वर्षे भारताच्या तुरुंगात होता; परंतु चांगल्या वर्तणुकीबद्दल (?) त्याची सुटका करून पाकिस्तानला पाठवले गेले. त्यानंतर त्याने पठाणकोट हल्ल्याचा कट रचला. गेल्या काही महिन्यांमध्ये भारतविरोधी नेते हरदीप सिंग निज्जर, अवतार सिंग खांडा, परमजीत पंजवार, रिपुदमन सिंग मलिक, हरविंदर रिंडा, सुखदुल सिंग, हॅप्पी संघेरा तसेच अबू कासिम, झहूर मिस्त्री, अब्दुल सलाम भुट्टावी, सय्यद नूर, एजाज यांना परदेशी भूमीवर यमसदनी धाडण्यात आले. खालिद रझा, बशीर अहमद, शाहिद लतीफ, मुफ्ती कैसर फारुख, झियाउर रहमान या दहशतवाद्यांचा गूढ मृत्यू झाला. निज्जरच्या मृत्यूनंतर सुमारे तीन महिन्यांनी २१ सप्टेंबर रोजी कॅनडातील बंबीहा टोळीचा प्रमुख असलेल्या सुखा दुनीकेची हत्या करण्यात आली. हा नवा भारत आहे. भारताचे शत्रू कुठेही लपले असले तरी ते नष्ट होणार हे निश्चित आहे, असा दावा आता काही उत्साही मंडळी करत आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Recent Posts

विधिमंडळात विश्वविजेत्या क्रिकेटपटूंचा सत्कार; मुख्यमंत्र्यांकडून ११ कोटींचे बक्षीस

मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने दैदीप्यमान कामगिरी करत विश्वचषक जिंकला. भारतीय…

2 mins ago

Motorolaने भारतात लाँच केला नवा फ्लिप फोन, ५ इंचाचा कव्हर डिस्प्ले

मुंबई: Motorola Razr 50 Ultra गुरूवारी भारतात लाँच करण्यात आला. हा कंपनीचा नवा क्लॅमशेल-स्टाईलचा फोल्डेबल…

24 mins ago

Video: बरं झालं सूर्याच्या हाताला बॉल बसला नाहीतर…विधानभवनात रोहितची मराठीत फटकेबाजी

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकून आलेल्या टीम इंडियाचे गुरूवारी मुंबईत अतिशय भव्य दिव्य स्वागत झाले.…

1 hour ago

T20 World Cup नंतर ऑलिम्पिकमध्ये फडकणार तिरंगा? राहुल द्रविडने पंतप्रधान मोदींना दिले वचन!

मुंबई: भारतीय खेळाडू टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर मायदेशात परतले आहेत. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाच्या…

2 hours ago

प्रहार बुलेटीन: ०५ जुलै २०२४

दिवसभरातील (Prahaar Bulletin) महत्वाच्या बातम्या… टीम इंडियाच्या विजयी मिरवणुकीत काही चाहते आजारी तर काही झाले…

4 hours ago

Mumbai News : व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्या ‘या’ विद्यार्थिनींना मिळणार मोफत प्रवेश!

राज्य मंत्रिमंडळाने घेतला मोठा निर्णय मुंबई : सरकारने माझी लाडकी बहीण योजना जाहीर केल्यानंतर आता…

4 hours ago