Monday, July 8, 2024
Homeमहत्वाची बातमीगोहत्या रोखण्यासाठी व्यवस्थेची बसली दातखीळ

गोहत्या रोखण्यासाठी व्यवस्थेची बसली दातखीळ

टपरीवर नजर, महाकाल, बबलूचा उच्छाद, हेल्पलाईनही केवळ बनाव

नाशिक (प्रतिनिधी) – शहर आणि ग्रामीण पोलिस सध्या प्रचंड कर्तव्यदक्ष दिसत असले तरी ग्रामीण भागातून होणारी गोवंशाची बेकायदेशीर वाहतूक आणि शहरात होणारी गोवंशाची कत्तल रोखण्यात मात्र पूर्णतः अपयशी ठरले आहेत. हे अपयश नैसर्गिक की कृत्रिम हा संशोधनाचा विषय असला तरी त्या दरम्यान तिलक धारी महाकाल आणि बबलूचा उच्छाद मात्र गोवंशाच्या मुळावर उठला आहे.

नाशिक शहर आणि जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था राखण्याच्या निमित्ताने पोलिस दलाच्या वतीने सुरु असलेली उपाययोजना केवळ आभास ठरत असून कायदा सुव्यवस्था राखणे म्हणजे नक्की काय याविषयी एकूण व्यवस्थाच संभ्रमात असल्याचे चित्र नाशिक शहर आणि जिल्ह्यात निर्माण झाले आहे त्यातच पुणे आणि मुंबई पोलिस एकामागून एक धक्के देऊ लागल्याने शहर जिल्ह्याची पोलिस यंत्रणा अस्वस्थ झाली आणि मुंबई पुणे पोलिसांच्या तुलनेत आम्ही किती सरस आहोत हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरु आहे. या प्रयत्नात मूळ पोलिसिंगला मात्र छेद दिला जात असल्याने भीक नको पण कुत्रे आवर असे म्हणण्याची वेळ नाशिककरांवर आली आहे.

शिंदे गावातील ड्रग्जचा कारखाना मुंबई पोलिसांनी केवळ १० ग्रॅमच्या मुद्देमालावर साकी नाका पोलिसांनी एमडीचे कोठार शोधून काढले. नाशिक पोलिसांना मात्र या आधी अनेकदा या पेक्षा अधिक पटीने मुद्देमाल मिळुनदेखील या कोठारापर्यंत जाता आले नाही.त्याचे कारण नाशिकच्या स्थानिक व्यवस्थेत आणि राजकीय दबावात आहे.

शिंदेकांड चव्हाट्यावर आल्यानंतर शहर पोलिस आणि पाठोपाठ जिल्हा पोलिस खडबडून जागे झाले आणि प्रत्येक ठिकाणी ड्रग्ज किंवा अमली पदार्थ सापडतील या आशेने छापेमारी सुरु झाली. यातच पोलिसांची नजर अचानक कॉफी शॉपवर गेली. पाठोपाठ पान टपऱ्या धुंडाळने सुरु झाले.वास्तविक एमडी कांडवरचा पडदा हटण्याआधी कॉफी शॉप किंवा पान टपऱ्यांवर काय चालते? काय विकले जाते याविषयी नाशिक पोलिस अनभिज्ञ होते यावर नाशिककर विश्वास ठेवायला तयार नाहीत.

नाशिक शहर आणि जिल्हा पोलिसांच्या कार्यप्रणाली विषयी नाशिक शहर आणि जिल्ह्यातील जनता चांगलीच जाणून आहे. मात्र काही सन्माननीय अपवाद वगळता सद्रक्षणाय… हे ब्रीद विस्मरणात नेवून पोलिसिंग सुरु असल्याने आग सोमेश्वरी लागते अन बंब रामेश्वरच्या दिशेने रवाना करण्याची शैली विकसित केली गेली आहे.

व्हाट्स ऍप नंबरचा बनाव 

अलीकडच्या काळात नव्याने पदभार स्वीकारणारा अधिकारी हेल्पलाईन नंबर जाहीर करून जनतेला तक्रारी करण्याचे आवाहन करतात. बदलत्या काळाबरोबर पोलिसांनीही समाज माध्यमाचे विचारपीठ वापरण्यास सुरुवात केल्याने आता व्हाट्स ऍप नंबरची हेल्पलाईन सुरु केली. तोही केवळ दिखावा असल्याचे निदर्शनास आले आहे. एमडी कांड नाशिकच्या वेशीवर टांगले गेल्या नंतर तर स्वतः पालकमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीत ड्रग्ज हेल्प लाईन असा एक व्हाट्स ऍप नंबर जाहीर केला. त्यावर आलेल्या तक्रारीची देखील अशीच वाट लावल्याचा काल परवाचा अनुभव ताजा आहे. या पूर्वी शहर आयुक्तालयाच्या व्हाट्स ऍप हेल्पलाईनवर तक्रार केल्यानंतर तक्रारीत नमूद केलेले ठिकाण सोडून त्याच्या आजूबाजूला कारवाई करण्याची तत्परता दाखवली गेली. काल परवा तर तेही नाही. या ड्रग्ज हेल्प लाईनवर एका नाशिकच्या नागरिकाने इंदिरा नगर आणि भद्रकली पोलिस ठाण्याच्या हद्दीत किमान शंभर गो वंशाची कत्तल होणार असल्याची माहिती पोलिसांना दिली होती.

पोलिसांच्या वतीने ओके म्हणून दखल घेतल्याचे उत्तर देखील मिळाले मात्र कारवाई नाहीच. उलट संदर्भीत ठिकाणी गणवेश धारी पोलिस तैनात करून सावज टिपण्या ऐवजी सावध करण्यात आले. सावजाने हा इशारा संधी समजून दुसऱ्या ठिकाणी त्याच पहाटे तब्बल ७० ते ८० गोवंशाची बिन दिक्कत कत्तल केली. दुसऱ्या दिवशीही त्याच ठिकाणी कत्तलची पुनरावृत्ती झाली. या बाबत वरीष्ठ अधिकाऱ्यांना कल्पना देऊनही जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले. या एकूण प्रकरणात पालक मंत्र्यांची भूमिका देखील संदीग्ध असल्याची चर्चा आहे. एमडी प्रकरणात देखील या पेक्षा वेगळे चित्र नाही मात्र तो स्वतंत्र बातमीचा विषय आहे.

पोलिस, पोलिसच असतो. मुबंई, पुणे, नाशिक पोलिस हा भेद मानसिकतेमुळे केला जातो. जे नाशिकला आहेत ते या आधी कधीतरी मुंबई पुण्याला होते. आणि आजचे उद्या जातील. मात्र नाशिकला आल्यानंतर पोलिस दलातील स्थानिक चांडाळ चौकडी आणि राजकीय मंडळींच्या दबावात आणि अमिषाला फशी पडतात. म्हणून हा फरक दिसतो.

लांच्छन दूर व्हावे :

काल रात्री गिरणारे येथे 13 ते 14 जिवंत गोवंश असलेले आयशर पोलिसांनी ताब्यात घेतला. तसेच आज सकाळी देखील म्हसरूळ जवळ पाच ते सहा जिवंत गोवंश असलेले पिकप वाहन देखील पकडण्यात आले आहे. पोलिसांनी या वाहनांमध्ये गोवंशांची कत्तलीसाठी होणारी वाहतूक करणारा माफिया कोण याच्या मुळापर्यंत जाणे महत्त्वाचे आहे. एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याच्या जवळच्या व्यक्तीचा खास माणूस हा गोवंश वाहतूक करणारा तिलकधारी आहे ज्याच्या माध्यमातून पोलीस विभागातील भ्रष्ट अधिकाऱ्यांना पैसे पुरवले जातात.अशी चर्चा असून या चर्चेची शहनिशा करून पोलिसांवर लावले जाणारे लाच्छंन दूर होणे आवश्यक आहे.

किती ती तिलकधारीची बडदास्त!

अवैध कत्तल करणाऱ्या घटकांकडून पैसे एकत्र करत एका पोलीस निरीक्षकाला पाच लाख तर त्याच पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाला तीन लाख असे आठ लाख रुपये दिले जातात, घेतलेल्या या पैशांमुळे पोलीस तिलकधारीने वाहतूक करत आणलेल्या जनावरांची कत्तल रोखण्यात अपयश येत आहे.ही चर्चा कर्तव्य तत्पर नाशिक पोलिसांचे मनोधैर्य खच्ची करत आहे. त्याचीही चौकशी करून नाशिक पोलिसांचे मनोबल उंचावावे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -