Saturday, July 20, 2024
Homeब्रेकिंग न्यूजGopichand Padalkar : आता बाळूमामा नाही तर बापू बिरू वाटेगावकर व्हा, आडवं...

Gopichand Padalkar : आता बाळूमामा नाही तर बापू बिरू वाटेगावकर व्हा, आडवं येणा-याला तुडवा!

२१ नोव्हेंबरला धरणे आंदोलन तर ११ डिसेंबरला विधान भवन घेरण्याचे आवाहन

धनगर आरक्षणाच्या लढ्याची आमदार गोपीचंद पडळकर यांची घोषणा

सांगली : राज्यात एकीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर असताना आता धनगर समाजही आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक झाला आहे. आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर आपल्याच सरकारच्या विरोधात दंड थोपटले आहेत. माझा सरकारला अल्टिमेटम आहे. तुम्ही काहीही करा, पण धनगरांना एसटीतून आरक्षण द्या, अशी मागणीही गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

सांगलीत झालेल्या धनगर मेळाव्या दरम्यान गोपिचंद पडळकर (Gopichand Padalkar) म्हणाले की, कुणी कितीही राजकारण केले तरी धनगर समाज त्याला बळी पडणार नाही. मराठा समाज आणि धनगर समाज मोठे समाज आहेत. गरज पडली तर बाळू मामा व्हायचं नाही तर बापू बिरू वाटेगावकर व्हायचं, असे म्हणत गोपीचंद पडळकर यांनी एका नव्या संघटनेची स्थापना केली. हिंदुस्थान शिवमल्हार क्रांती सेनेची स्थापना पडळकर यांनी केली आहे. ही अराजकीय संघटना असेल. फक्त मेंढपाळ समाजासाठीच ही संघटना काम करेल, अशी घोषणा ही गोपीचंद पडळकर यांनी केली.

यावेळी ते म्हणाले की, १९९० मध्ये शरद पवार मुख्यमंत्री होते. त्यावेळी धनगरांना आरक्षण मिळाले असते, पण तसे झाले नाही. पण आता धनगर आरक्षणाच्या आड कोणी आला तर त्याला तुडवू, असा इशाराच त्यांनी दिला आहे.

पुढे बोलताना पडळकर म्हणाले, बिरोबाच्या वनात दसरा मेळावा पार पडतोय. राजे महाराजांच्या काळात ढोल वाजवला जात होता. त्याचा निनाद वारंवार झाला पाहिजे. जेणेकरून प्रस्थापितांना धडकी भरली पाहिजे. आज अनेक प्रश्न मनात आहेत, ते सोडवण्यासाठी आपण झगडतोय. धनगरांची जागर यात्रा केली. त्यावेळी लबाड लांडग्यांच्या पिल्लावळीने विष पेरायला सुरुवात केली. आपण दोन लढाई लढत आहोत. महाराष्ट्रातल्या धनगरांची लढाई आपण न्यायालयात लढतोय. नाताळची सुट्टी झाल्यावर धनगर आरक्षणाचा निकाल येईल, असे कोर्ट म्हणतंय, पण आपल्याला सावध रहायला हवे, असे पडळकर यांनी सांगितले.

पुढे बोलताना त्यांनी शरद पवार यांच्यावर नाव न घेता खरपूस टीका केली. तसेच त्यांचा लबाड लांडगा असा उल्लेख ही केला. ते म्हणाले, ७० वर्षात धनगर समाजावर अन्याय झाला, तितका अन्याय कुठल्याच समाजावर झाला नाही. सरकारकडे अनेक वेळ धनगर समाजाची शपथपत्र दिली. एक लाख टक्का आरक्षण मिळेल. पण त्यासाठी धनगर समाजाने रस्त्यावरच्या लढाईला तयार राहिले पाहिजे. आपल्यात फूट पडावी असे अनेकजण प्रयत्न करत आहेत. फूट पाडण्यासाठीच लबाड लांडगा आरक्षणाला विरोध करतोय. लबाड लांडगा कोण आहे माहीत आहे ना? मराठा आरक्षणाला देखील याच लबाड लांडग्याने विरोध केला, अशी नाव न घेता पडळकरांनी पवारांविरोधात टीका केली. या लबाड लांडग्याने पहिल्यांदा मराठा समाजाला विरोध केला. तीन महिन्यापूर्वी त्यांचा पुतण्या पार्टीतून फुटला. पुतण्या पार्टीतून फुटला त्यात दुसऱ्यांचा काय दोष आहे? हे सगळेजण छगन भुजबळांच्या विरोधामध्ये शिव्या द्यायला लागले. भुजबळांनी समता परिषदेच्या माध्यमातून बहुजनांना एकत्र करण्याची चळवळ उभी केली होती. बहुजन एकत्र आले तर काय होऊ शकतं हे त्यांना माहीत आहे. त्यामुळे ही चळवळ दाबण्याचा प्रयत्न झाला, असा आरोप त्यांनी केला.

पुढे ते म्हणाले, ६० दिवसांची मुदत दिली. पण सरकारकडून अद्याप कोणत्याही प्रकारची पावले उचलली नाहीत. २९ दिवसांनंतर धनगर समाज रस्त्यावर उतरेल. आरक्षण अंमलबजावणीची लढाई तीव्र करा. २१ नोव्हेंबर रोजी प्रत्येक तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन करा, असे सांगतानाच ११ डिसेंबर रोजी नागपूरला विधान भवन घेरण्याचे आवाहनही पडळकर यांनी यावेळी केले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -