Sunday, July 6, 2025

दसरा मेळाव्यासाठी मुंबई पोलीस सज्ज!

दसरा मेळाव्यासाठी मुंबई पोलीस सज्ज!

६ अपर आयुक्त, १६ उपायुक्त, ४५ सहाय्यक आयुक्त, साडे बारा हजारांचा ताफा तैनात


मुंबई : मुंबईत होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी मुंबई पोलीस सुसज्ज झाले आहेत. उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाचा होणारा मेळावा लक्षात घेता मुंबई पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्था राहिल याची काळजी घेतली आहे. त्यासाठी पोलिसांनी६ अपर आयुक्त, १६ उपायुक्त, ४५ सहाय्यक पोलीस आयुक्त, यांच्यासह २,४९३ पोलीस अधिकारी आणि १२,४४९ पोलीस अंमलदार बंदोबस्तसाठी तैनात करण्यात आलेले आहेत. त्यांच्यासोबत महत्वाच्या ठिकाणी ३३ एसआरपीएफ प्लाटून, होमगार्डस् अशा चोख पोलीस बंदोबस्ताचे आयोजन करण्यात आलेले आहे.


मंगळवारी बृहन्मुंबई शहरामध्ये आझाद मैदान आणि शिवाजी पार्क येथे दसरा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. आझाद मैदान या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गटाचा मेळावा होणार आहे. तर शिवाजी पार्कवर शिवसेना ठाकरे गटाची तोफ धडाडणार आहे. हे दोन्ही मोठे मेळावे लक्षात घेता पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला आहे.


या दोन मेळाव्यांव्यतिरिक्त मंगळवारी देवी विसर्जन आणि विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा वानखेडे स्टेडियम येथील सामना आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, विशेष पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सहआयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) यांच्या देखरेखीखाली बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आलेले आहे.

Comments
Add Comment