गेल्या काही वर्षांत मुंबईची हवेची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात खालावली आहे. प्रदूषणात मुंबईने दिल्लीलाही मागे टाकले असून वाढत्या प्रदूषणामुळे मुंबई विविध आजारांनी ग्रस्त आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला प्रदूषणाचा विळखा बसला आहे. हिवाळ्यात हवेत होणारे बदल आता उन्हाळ्यातही दिसून येत आहेत. मुंबईची हवा दिवसेंदिवस खराब होत चालली असून प्रदूषणमुक्त मुंबईसाठी आतापासून ठोस पावले उचलली नाहीत, तर भविष्यात मुंबईची हवा आणि आरोग्य दोन्ही बिघडणार, याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे प्रदूषण रोखण्यासाठी कठोर कारवाईचा निर्णय पालिकेने घेतला असून सर्व बांधकामांच्या ठिकाणी धूळ व प्रदूषण नियंत्रणाच्या उपाययोजनांची अंमलबजावणी झाली पाहिजे, अन्यथा खासगी असो किंवा शासकीय, अशा बांधकामांना रोखण्यात येईल, असा इशाराच पालिकेने दिला असून याची अंमलबजावणी काटेकोरपणे होईल याकडे आता पालिकेने लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. मुंबईकर म्हणून आपली जबाबदारी ओळखत प्रदूषणमुक्त मुंबईसाठी पाऊल उचलेले आहे.
मुंबईच्या प्रदूषणास बांधकामे कारणीभूत असल्याचा ठपका ठेवत मुंबई महापालिकेने प्रदूषणमुक्त मुंबईसाठी पुन्हा एकदा कंबर कसली आहे. प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार असल्याचा इशारा पालिकेने दिला आहे. त्यामुळे प्रदूषणमुक्त मुंबईसाठी सरसावलेली मुंबई महापालिका रस्त्यांवर राडारोडा, कचरा फेकणारे अन् बेकायदा बांधकामांचे पेव रोखणे याचे पालिकेसमोर मोठे आव्हान आहेच. त्यात हिवाळ्यात प्रदूषणात मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याने पुन्हा एकदा प्रदूषणाची धास्ती वाढली आहे.
मुंबईतील हवा खालावली असून मुंबईला प्रदूषणाचा विळखा बसला आहे. वाढत्या प्रदूषणामुळे दमा, श्वसनाचे विकार झपाट्याने पसरत आहेत. मुंबईतील हवा अशुद्ध होण्यामागे मुख्य कारण बांधकामे असल्याचे मुंबई महापालिका प्रशासनाने स्वीकारले आहे. महसूल वाढीसाठी पालिका प्रशासनाने प्रीमियममध्ये ५० टक्के सूट दिली आणि मुंबईत गगनचुंबी इमारती उभारण्याची विकासकांमध्ये जणू शर्यतच लागली आहे. मुंबईत उभ्या राहणाऱ्या टोलेजंग इमारतींच्या बांधकामासाठी परवानगी दिली जाते ती मुंबई महापालिकेकडून. त्यामुळे मुंबईतील वाढत्या प्रदूषणाला मुंबई महापालिकाच कारणीभूत आहे, असा आरोप पर्यावरण तज्ज्ञांनी केला. मुंबई महापालिकेची २५ विभाग कार्यालये असून विभाग कार्यालयांच्या माध्यमातून त्या त्या वॉर्डातील नागरिकांना सोयी-सुविधा उपलब्ध केल्या जातात. पालिकेच्या २५ वॉर्डात काय सुरू आहे, याची जाणीव संबंधित विभाग कार्यालयांना असणे स्वाभाविक आहे. त्यामुळे आपल्या वॉर्डात बांधकाम सुरू असून नियमांचे उल्लंघन केले जाते, याची माहिती विभागीय कार्यालयांना असणे स्वाभाविक आहे. तरीही वर्षानुवर्षे कारवाईचा फक्त इशारा दिला जातो, प्रत्यक्ष कारवाई कागदावरच होत असल्याने मुंबईला प्रदूषणाचा विळखा पडला आहे. प्रदूषणामुळे निर्माण होणारे आजार मुंबईच्या आरोग्यासाठी घातक आहेत. त्यामुळे करदात्या मुंबईकरांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करत धूळमुक्त मुंबई यासाठी नियमांची कठोर अंमलबजावणी करणे काळाची गरज आहे.
पाऊस परतून १५ दिवस उलटले तोच मुंबईच्या हवेतील गुणवत्तेवर परिणाम झाला आहे. मुंबईत सुरू असलेल्या बांधकामांमुळे हिवाळ्यात हवेतील गुणवत्तेवर परिणाम होतो. मुंबईतील वाढत्या प्रदूषणाची दखल केंद्र व राज्य सरकारने घेतली असून तातडीने उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचे आदेश मुंबई महापालिकेला दिले आहेत. पुढील चार महिने आव्हानात्मक असून प्रदूषणमुक्त मुंबईसाठी मुंबई महापालिकेने कंबर कसली आहे. हवेतील वाढत्या प्रदूषणास प्रमुख कारण हे धूळ ठरले असले तरी यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे संबंधितांना बंधनकारक असणार आहे. हिवाळ्यात प्रदूषणात वाढ होण्याचा धोका अधिक असतो. मुंबईत सद्यस्थितीत सहा हजार बांधकामे सुरू असून बांधकाम ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणचे शूटिंग करणे बंधनकारक करण्यात आले आहे. बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी नियमांचे पालन केले जाते का? याची तपासणी करण्यासाठी प्रत्येक विभागात ५० पथकांची गस्त असेल. पालिकेने जारी केलेल्या नियमांचे उल्लंघन आढळल्यास शासकीय असो वा खासगी बांधकाम थांबवण्यासाठी जागेवरच ‘स्टॉप वर्क’ नोटीस बजावण्यात येईल, असा इशारा पालिकेने दिला आहे. दरम्यान, धूळ व प्रदूषण नियंत्रणाची नवीन मार्गदर्शक तत्त्वे आज सोमवारी जारी करण्यात येणार आहेत. मुंबईची हवा शुद्ध करण्यासाठी एअर प्युरी फायर मशीन बसवण्याचा निर्णय पालिकेने घेतला असून १० कोटींची त्यासाठी तरतूद केली असून शुद्ध हवेसाठी मियावाकी जंगल अस्तित्वात आणण्याची सुरुवात केली आहे. शुद्ध मुंबईसाठी आतापर्यंत कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहेत. मात्र दिवसेंदिवस हवेची गुणवत्ता खालावण्याचा स्तर वाढतच आहे.
मुंबईतील वाढत्या प्रदूषणामुळे दमा, श्वसनाच्या विकारात वाढ झाली आहे. राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमांतर्गत, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ व महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार मुंबईतील हवेचा दर्जा सुधारण्यासाठी पालिकेने हवेचा कृती आराखडा तयार केला. कृती आराखड्यात रस्त्यांचे रुंदीकरण करणे, अडथळे दूर करून वाहतूक कोंडी कमी करणे, वाहतूक शिस्तबद्ध करणे, अत्याधुनिक वाहतूक प्रणाली विकसित करणे, वांद्रे कुर्ला संकुल, लोअर परळ इत्यादी विभागातील वाहनांद्वारे उत्सर्जित होणारे हवा प्रदूषण कमी करणे, ध्वनिप्रदूषण नियंत्रित करणे या संबंधातील उपाययोजनांवर भर दिला तरी आजही मुंबईची हवा खालावत असून याला तुम्ही -आम्ही आपण सगळेच जबाबदार आहोत.
वाढत्या प्रदूषणाला आळा बसावा यासाठी यापूर्वीच पाणी शिंपडण्यासाठी यांत्रिकी झाडू खरेदी, वाहतुकीसाठी ई-बसेस खरेदी करणे, जागोजागी बॅटरी चार्जिंग स्टेशन सुरू करणे, हरित पट्ट्याची वाढ व सुधारणा करणे, कचऱ्याचे ऊर्जेत रूपांतरण करणे, ओला कचरा, सुका कचरा वर्गीकरणासाठी मुंबईकरांमध्ये जनजागृती करणे असे उपाय योजून आतापर्यंत झाले आहेत. मात्र अजूनही वाढती वाहनांची संख्या, सिमेंट कॉक्रीटची होणारी धूळ, रस्त्यांवर राडारोडा कचरा फेकणे यामुळे सर्वाधिक प्रदूषण होत आहे.
आता नवीन नियमावलीत कठोर नियम लावण्यात येणार असून बांधकामाच्या ठिकाणी ३५ फूट उंच पत्र्याची भिंत उभारावी लागणार आहे. तसेच बांधकामाच्या ठिकाणी सतत पाण्याचा मारा करावा लागणार आहे. प्रत्येक बांधकामाच्या ठिकाणी स्वतंत्र वायू गुणवत्ता निर्देशांक मोजणारी यंत्रणा बसवावी लागणार आहे. मेट्रो, रस्ते, उड्डाणूपल आदी शासकीय निर्माणाधीन कामाच्या ठिकाणीही ३५ फूट उंचीच्या आच्छादनांसह तुषार फवारणी व धूळ प्रतिबंधक संयंत्रांची व्यवस्था असावी. इमारती अथवा कोणतेही बांधकाम पाडतानासुद्धा आजूबाजूने आच्छादन करून नंतरच बांधकाम पाडावे, जेणेकरून धूळ पसरणार नाही. तसेच सर्व नियमांचे पालन केले जावे लागणार आहे. बांधकामासाठी लागणारे मार्बल, दगड, लाकूड आदींची कटाई, ग्राइंडिंग आदी कामे बंदिस्त भागात किंवा आच्छादन असलेल्या भागातच करावी लागणार आहेत.
बांधकामाच्या ठिकाणी काम करणाऱ्या मनुष्यबळाच्या संरक्षणासाठी मास्क, चष्मा आदी संरक्षण साहित्य दिले जावे लागणार आहे. बांधकामाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा वॉच असेल. बांधकाम साहित्य तसेच राडारोडा (डेब्रीज) ने-आण करणारे वाहन झाकलेले असावे. तसेच, वाहनांची वजन मर्यादा पाळावी, या वाहनांत मर्यादेपेक्षा अधिक वजन वाहून नेऊ नये. बांधकाम राडारोडा (डेब्रीज) ने-आण करताना, प्रत्येक खेपेच्या वेळी तुषार फवारणी करावी. तसेच वाहनांची चाके प्रत्येक खेपेनंतर धुवून स्वच्छ केली जावी, अशी नवी नियमावली पालिकेने केली आहे. काही ठिकाणी रात्रीच्या वेळी राडारोडा वाहतूक करून निर्जन ठिकाणी टाकून दिल्याचे आढळून येते. अशा प्रकारांना रोखण्यासाठी पथकांची स्थापना केली जाणार असून या पथकांनी रात्री गस्त करून अशा वाहनांवर थेट कारवाई करण्यात येणार आहे. मुंबईतील अतिशय वर्दळीच्या किमान ५० ते ६० रस्त्यांवर वाहन आधारित धूळ प्रतिबंधक यंत्र (अॅण्टी स्मॉग मशीन) नियमितपणे पाठवून दररोज भल्या पहाटे व सकाळी फवारणी करण्यात येईल, जेणेकरून रस्त्यांची स्वच्छता होऊन धूळ रोखता येईल.
वाढत्या प्रदूषणामुळे श्वसन आणि त्वचेशी संबंधित आजार वाढत आहेत. श्वसन विकारात दमा, क्षयरोग, न्युमोनिया, फुप्फुसे, कर्करोग, श्वसननलिकेला सूज, दम लागणे असे विकार, समस्यांचे प्रमाण वाढते आहे. ताप येणे, डोळे दुखणे, घसा दुखणे आदी आजार उद्भवत आहेत. सकाळी आणि सायंकाळी धुक्याचे प्रमाण जास्त असल्याने अशा वेळी घराबाहेर पडणे टाळावे. तेलकट खाणे वर्ज्य करावे. लहान मुले, वयोवृद्ध व इतर व्याधी असलेल्या लोकांसाठी हे वातावरण धोकादायक असल्याने त्यांनी विशेष काळजी घ्यावी व बाहेर पडताना मुखपट्टी वापरावी असे सल्ले तज्ज्ञांनी दिले असून याचे काटेकोर पालन करणे हेच सध्या आपल्या हातात आहे.
मुंबई : भारतीय क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत वानखेडे स्टेडियमवर एक धक्कादायक घटना घडली…
मुंबई : बॉलीवूडचा किंग खान म्हणून शाहरुख खानची ओळख आहे. अनेकदा तो आणि त्याचे कुटुंब…
मुंबई : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोमधून स्वत:ची ओळख निर्माण करणारा 'फिल्टरपाड्याचा बच्चन' म्हणजेच गौरव मोरे…
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांना विमान कंपनीच्या गैरव्यवस्थापनाचा चांगलाच फटका बसला. अब्दुल्ला…
छत्तीसगड : छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यात आईस्क्रीम कारखान्यात एक धक्कादायक घटना घडली. कारखान्याच्या मालकाने चोरीच्या संशयावरुन…
मुंबई : आपण अनेक चित्रपटांची गाणी ऐकली आणि बघितली असतील. भारतीय चित्रपटात गाणी नसतील तर…