- गुंतवणुकीचे साम्राज्य : डॉ. सर्वेश सुहास सोमण
सध्या सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे मागील आठवड्यात निर्देशांकात मोठ्या प्रमाणात घसरण झाली. शेअर बाजारात गेल्या काही महिन्यांत निफ्टी आणि सेन्सेक्स यामध्ये मोठी वाढ झालेली होती. आपण आपल्या मागील आठवड्याच्या लेखात निर्देशांकांची दिशा जरी तेजीची असली तरी करेक्शन येणे अपेक्षित आहे हे सांगितलेले होते. आपण वारंवार मागील काही महिन्यांपासून सांगितल्याप्रमाणे सध्या शेअर बाजार अत्यंत महाग असून फंडामेंटलकडे पाहता शेअर बाजाराचे पी.ई गुणोत्तर अत्यंत धोकादायक पातळीजवळ आलेले आहे हे देखील सांगितलेले होते.
इतिहासाचा जर अभ्यास केला तर आपणास असे दिसून येईल की ज्यावेळी पीई गुणोत्तरानुसार निर्देशांक महाग होतात, त्यानंतर शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण झालेली आहे. त्यामुळे शेअर बाजाराचे फंडामेंटलनुसार मूल्यांकन जोपर्यंत स्वस्त होत नाही तोपर्यंत गुंतवणूक करीत असताना संधी ओळखूनच व्यवहार करणे आवश्यक आहे हे देखील सांगितलेले होते. सध्या गुंतवणूक करीत असताना संयम ठेवूनच व्यवहार करणे आवश्यक आहे. या महिन्यात निवडणुकांचे निकाल हाती येतील.
निवडणूक निकाल हाती येईपर्यंत निर्देशांकात मोठे चढउतार होणे अपेक्षित आहे. सध्या मध्यम मुदतीच्या चार्टनुसार निर्देशांकाची गती मंदीची आहे. त्यामुळे टेक्निकल अॅनालीसीसनुसार मंदीत असणाऱ्या शेअर्समध्ये अल्प तसेच मध्यम मुदतीचा विचार करता स्टॉपलॉसचा वापर करूनच मंदीचा व्यवहार करता येईल. अल्पमुदतीसाठी गुजरात गॅस, राजेश एक्स्पो, व्हीमार्ट, तात्वा यांसह अनेक शेअर्सची दिशा मंदीची आहे. मागील आठवड्यात ‘बायोकॉन’ या शेअरने ही अत्यंत महत्त्वाची पातळी तोडत मंदी सांगणारी विशेष रचना तयार केलेली असून आज २३० रुपये किमतीला असणाऱ्या या शेअरमध्ये मध्यम मुदतीसाठी आणखी मोठी घसरण होणे अपेक्षित आहे. त्यामुळे या शेअरमध्ये योग्य स्टॉपलॉस ठेवून मंदीचे व्यवहार केल्यास चांगला फायदा होऊ शकेल.
कमोडीटी मार्केटमध्ये टेक्निकल अॅनालीसीसनुसार अल्पमुदतीसाठी सोने या मौल्यवान धातूची दिशा आणि गती तेजीची आहे. अल्पमुदतीच्या चार्टनुसार चांदीची दिशा आणि गती तेजीची आहे. चार्टनुसार जोपर्यंत सोने ५९००० या पातळीच्या वर आहे तोपर्यंत सोन्यामधील तेजी कायम राहील. मागील आठवड्यात कच्च्या तेलात वाढ झाली. अल्पमुदतीच्या चार्टनुसार कच्च्या तेलाची दिशा आणि गती तेजीची झालेली आहे. आता चार्टनुसार जोपर्यंत कच्चे तेल ७००० या पातळीच्या खाली आहे तोपर्यंत कच्च्या तेलातील तेजी कायम राहील. ज्या ज्यावेळी युद्धजन्य परिस्थिती उत्पन्न होते त्यावेळी अत्यंत सुरक्षित समजल्या जाणाऱ्या सोने या मौल्यवान धातूमधील गुंतवणूक वाढताना दिसते. त्याचवेळी इक्विटीमधील पैसा कमी होताना दिसतो तसेच निर्देशांकात घसरण होते. काही आठवड्यात हेच घडताना दिसत आहे. सध्या आंतरराष्ट्रीय घडामोडी या तणावपूर्ण असून याचाच परिणाम म्हणून सोन्यामध्ये गेल्या काही दिवसांतच अचानक मोठी उसळी दिसून आलेली आहे. पुढील काळात जर आंतरराष्ट्रीय तणाव असाच कायम राहिला तर सोन्यामध्ये आणखी मोठी विक्रमी वाढ दिसून येऊ शकते. निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी यांची गती मंदीची झालेली असून चार्टनुसार निर्देशांकात आणखी घसरण होणे अपेक्षित आहे.
(सूचना : लेखकाची तसेच त्यांच्या जवळच्या नातेवाइकांची लेखात सुचवित असलेल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणतीही गुंतवणूक नाही किंवा सुचविलेल्या कंपन्यांशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून कंपनीकडून कोणतेही मानधन किंवा भेटवस्तू घेतलेली नाही).