पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानला घरवापसी केली आहे. त्यांना परागंदा होण्यासाठी कारण ठरणारे परवेझ मुशर्रफ यांचे निधन झाल्यानंतर शरीफ यांच्या घरवापसीचा मार्ग मोकळा झालाच होता. आता नवाझ शरीफ यांचे मायदेशी आगमन झाल्यानंतर त्यांचे गर्मजोशीने स्वागत करण्यात आले. लाहोरला त्यांच्या घराच्या शहरात जोरदार मेळावा झाला. शरीफ यांची घरवापसी ही साधी नाही. पाकिस्तानच्या राजकारणावर त्याचे महत्त्वपूर्ण परिणाम होणार आहेत. त्यामुळे कित्येक राजकारण्यांचे नशीब पालटणार आहे. तसेच पाकिस्तानातील कित्येक नेत्यांचे नशीब फिरणार आहे. शरीफ हे सध्या आपल्या राजकीय पुनरागमनाकडे नजर लावून आहेत. त्याच दृष्टीने ते पाकिस्तानात परतले आहेत. त्यांच्या आगमनामुळे पाकिस्तानातील राजकीय व्यवस्थेचा उलटफेर जो होणार आहे तो महत्त्वाचा आहे आणि समजून घ्यावाच लागेल असा आहे.
पुढील जानेवारीत पाकिस्तानात सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. माजी पंतप्रधान इम्रान खान हे सध्या जात्यात आहेत. पूर्वी कधी काळी शरीफ सुपात होते. इम्रान खान सध्या तुरुंगात खितपत पडले आहेत. तीन वेळा पाकिस्तानचे पंतप्रधान राहिलेले शरीफ यांचे आगमन हे इम्रान यांच्यासाठी निश्चितच चांगले नाही. इम्रान यांना शरीफ यांचे आगमन हे अशुभसूचक वाटत असल्यास नवल नाही. शरीफ हे भारतासाठी कारगीलचे गुन्हेगार आहेत. त्यांच्याच कारकिर्दीत कारगील युद्ध झाले आणि पाकिस्तानी लष्कराला पराभूत करून भारतीय लष्कराने विजयी पताका फडकवली. शरीफ यांना गुडघे टेकून भारतापुढे शरण यायला लागले. त्यामुळे शरीफ यांचे पाकिस्तानात कितीही गर्मजोशीने स्वागत झाले असले तरीही भारतासाठी ते खलनायकच आहेत. पण शरीफ यांचे आगमन अशा वेळेस झाले आहे की, आज पाकिस्तान आर्थिक आणि राजकीय संकटाशी झुंजत आहे. इम्रान खान यांच्या तेहरिक-इ-पाकिस्तान या पक्षाला शरीफ यांच्या आगमनामुळे फार मोठा झटका बसू शकतो. स्वतः इम्रान खान सध्या तुरुंगात असून पाकिस्तानी विद्यमान सरकारशी लढा देत आहेत. शरीफ यांचे जोरदार मेळाव्याने स्वागत करण्यात आले.
यावेळी बोलताना शरीफ यांनी आपण सुडाच्या भावनेतून राजकारण करण्यासाठी आलेलो नाही, असे म्हटले असले तरीही पाकिस्तानचा दुर्लौकिक पाहता तसे राजकारण केले जाणार नाही, असे मुळीच नाही. इतक्या वर्षांत खूप पाणी पुलाखालून वाहून गेले आहे. इम्रान खान तुरुंगात आहेत, मुशर्रफ अल्लाला प्यारे झाले आहेत आणि पाकिस्तानची जनता रोजच्या जगण्यासाठीही झगडते आहे. ४ वर्षे स्वतःच अज्ञातवासात घालवून शरीफ परत येत आहेत आणि त्यांनी म्हटले आहे की, आपण प्रगत पाकिस्तान पाहण्यासाठी आलो आहोत. जानेवारीत पाकिस्तानात निवडणुका होत असून चौथ्यांदा विक्रमी वेळा पुन्हा सत्तेत पुनरागमन करण्याच्या हेतूने शरीफ आले आहेत. अर्थात तसे ते होईल की नाही, हे सांगता येणार नाही. पण जो प्रतिसाद त्यांच्या मेळाव्याला मिळाला, त्यावरून शरीफ पुन्हा सत्तेत येऊ शकतात, याची ग्वाही त्या मेळाव्यातील उपस्थितीने दिली आहे. शरीफ यांनी पाकिस्तानी जनतेला बरीच आश्वासने दिली आहेत. पाकिस्तानला आशियाई वाघ बनवणार आहोत, या आश्वासनाचा त्यात समावेश आहे. अर्थात निवडणुका आल्या की, अशी आश्वासने द्यावीच लागतात. त्यामुळे शरीफ ही आश्वासने किती खरी करून दाखवतील, याचे उत्तर काळच देणार आहे. शरीफ यांच्या आगमनाने त्यांच्या पीएमएल या पक्षाला मात्र जबरदस्त दिलासा मिळाला आहे. कारण त्यांचा पक्ष सध्या इम्रान खान यांच्या तुफान लोकप्रियतेशी मुकाबला कसा करायचा, याच्याशी झगडत आहे. आता निवडणूक तोंडावर आली असताना शरीफ यांची घरवापसी ही पाकिस्तानात निश्चितच एक महत्त्वाचा घटक होणार आहे.
शरीफ यांची सर्वात मोठी लढत अर्थात लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या इम्रान खान यांच्या पक्षाशीच होणार आहे. पाकिस्तानात खरे तर लष्कर हेच प्रामुख्याने सर्व निर्णय घेत असते आणि लष्कराला वाटते तितकाच काळ पंतप्रधान किंवा राजकीय नेता जगात राहू शकतो. इम्रान खान किंवा नवाझ शरीफ हे दोघेही लष्कराच्या हातातील बाहुले होते. लष्कराच्या पाठिंब्याने कारगील युद्ध केले आणि शरीफ यांना अखेर त्यात पराभव पत्करावा लागला आणि पंतप्रधान म्हणून त्यांना भारतापुढे शरणागती पत्करावी लागली. इम्रान यांची अवस्थाही काही वेगळी नव्हती. त्यामुळे हे नेते आपापसात झगडत असले तरीही त्यांच्या या झगड्यांवर सावट असते ते लष्कराचेच. त्यामुळे शरीफ आले काय किंवा इम्रान पुन्हा विजयी होऊन पंतप्रधान झाले काय, भारतासाठी यामुळे काहीही फरक पडणार नाही. पाकिस्तानातील कोणताही नेता अखेर लष्कराच्या हातातील बाहुला असतो आणि त्याचे काम पाकिस्तानी लष्कराच्या भारतविरोधी मोहिमेला मम म्हणणे हेच असते.
मात्र पाकिस्तानातील निवडणूक ही आता शरीफ यांच्या आगमनामुळे एकतर्फी होणार नाही, एवढे मात्र निश्चित झाले आहे. शरीफ यांना देश सोडून परागंदा व्हावे लागले ते अर्थातच तेथील शासनव्यवस्थेमुळे नाही, तर तेथील सर्वोच्च न्यायालयामुळे.
पाकिस्तानी सर्वोच्च न्यायालयाने शरीफ यांचा जामीन नाकारून त्यांना परागंदा होण्यास भाग पाडले. शरीफ यांच्या परागंदा होण्याच्या काळात पाकिस्तानची आर्थिक स्थिती कमालीची खालावली आहे. प्रत्येक संस्थेकडे मग ती आंतरराष्ट्रीय नाणेनिधी असो की जागतिक बँक, पाकिस्तानचे नेते भिकेचा कटोरा हातात घेऊन फिरत आहेत. अमेरिकेने पाकिस्तानला असणारी मदत केव्हाच थांबवली आहे. आता अमेरिकेला भारतासारखा जोडीदार मिळाल्याने पाकची गरज राहिली नाही. त्यामळे जीनांचा पाकिस्तान आज कंगाल झाला आहे. त्यामुळे पाकिस्तानला कंगालीतून बाहेर काढण्याचे आश्वासन जरी शरीफ यांनी दिले असले तरीही ते कितपत पाळू शकतील, याची शंकाच आहे. इम्रान खान यांच्या दृष्टीने मात्र एक जबरदस्त प्रतिस्पर्धी आला आहे.
मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…
मुंबई : मोहम्मद अजमल कसाबसह दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला.…
ऊन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला हायड्रेट ठेवणं खूप महत्वाचं असते. ऊन्हाळ्याच्या दिवसांत खाण्यापिण्याच्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी…
मुंबई: इमरान हाश्मीचा नवा चित्रपट 'ग्राउंड झिरो' सध्या चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा प्रीमियर झाला.…
श्रीनगर : सलग तीन दिवस जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. लडाख या केंद्राशासित भागात…