चुलीत गेले नेते आणि चुलीत गेला पक्ष; लासलगावात सर्वपक्षीय राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी
लासलगाव : मराठा आरक्षणाचा लढा दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. राजकीय नेते मंडळींबाबत सकल मराठा समाजामध्ये उद्रेकाची भावना निर्माण झाली आहे. मराठा आरक्षणासाठी जिल्ह्यातील पहिली ठिणगी लासलगावात पडली असून येथे सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. लासलगावात मराठा समाजाच्या वतीने राजकीय नेत्यांना प्रवेशबंदी असल्याचा बॅनर लावण्यात आला आहे.
मराठा आरक्षणासाठी राज्य शासनाला दिलेली मुदत संपत आली आहे. राज्यभर ठिकठिकाणी आंदोलने सुरू आहेत. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या गावात महिनाभरापूर्वी मनोज जरांगे पाटील यांचे मराठा समाजाच्या आरक्षण मागणीसाठी उपोषण सुरू होते. त्यानंतर आता जरांगे पाटील राज्यभर दौरे करत आहेत. येवला येथे त्यांची जाहीर सभा झाली. त्यानंतर ब्राह्मणगाव पाठोपाठ लासलगावकरांनीही मुख्य चौकात जमा होत मराठा आरक्षणास विरोध असलेल्या नेत्यांविरुद्ध घोषणा बाजी करत बॅनर झळकवत पाठिंबा दिला आहे.
याच पार्श्वभूमीवर लासलगावातील सकल मराठा समाजाच्या वतीने सर्वच राजकीय पक्षाचे नेते, पदाधिकाऱ्यांना गावात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. त्या आशयाचा बॅनर मुख्य चौकात लावला आहे. ‘चुलीत गेले नेते आणि चुलीत गेले पक्ष, मराठा आरक्षण एकच आमचं लक्ष्य’ मराठा आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत कोणत्याही राजकीय पक्ष आणि नेत्यास गावात प्रवेश नाही. त्यामुळे आपली मान मर्यादा राखून गावात प्रवेश करावा. तसेच, जो समाजाला मानत नाही त्याला आम्ही मानत नाही , असा मजकूर असलेला बॅनर मुख्य चौकात लावला आहे. हा बॅनर लोकांचे लक्ष वेधून घेत आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळणे ही काळाची गरज:- काँग्रेस नेते कृषीतज्ञ सचिन होळकर
महाराष्ट्रात गेल्या अनेक दिवसांपासून मराठ्यांना आरक्षण देण्याच्या मागणीने जोर धरला आहे. आंतरवाली सराटी या गावामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या उपोषणाचा परिणाम संपूर्ण राज्यभर पाहायला मिळाला आणि उपोषण सोडण्यासाठी तसेच आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने ३० दिवसांची वेळ मागितली होती. मात्र ही वेळ आता निघून जाऊन देखील अद्याप मराठ्यांना आरक्षण मिळाले नसल्याने संपूर्ण राज्यांमध्ये मराठा समाजाचा प्रक्षोभ झालेला पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील सध्याचे वातावरण हे अत्यंत गंभीर वळणावर आले असून याला सर्वतोपरी राज्य सरकार जबाबदार आहे.
तसेच महाराष्ट्रातील शेतीवर अवलंबून असणारा सर्वाधिक घटक हा मराठा समाज असून शेतीकडे झालेल्या दुर्लक्षाचा परिणाम म्हणून मराठा समाजाची अधोगती झाली आहे. त्यामुळेच मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी मागणी होताना दिसत आहे असे मत प्रसिद्द कृषीतज्ञ तसेच नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटी सरचिटणीस सचिन आत्माराम होळकर यांनी दैनिक प्रहारशी बोलताना व्यक्त केले.
मराठा समाजाच्या मागण्यांसाठी नेतृत्व करत असताना सर्वच पक्षांची अनेक नेते मंडळी रस्त्यावर उतरत आहेत. याशिवाय समाजातील इतर सर्व जाती आणि धर्माचा मराठा आरक्षणास पाठिंबा असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र असे असताना देखील राज्यातील काही ज्येष्ठ मंत्री आणि नेते मराठा आरक्षणाला विरोध करताना आढळतायत, त्यांचा निषेध म्हणून महाराष्ट्रातील विविध गावांमध्ये अशा नेत्यांना प्रवेश बंदी चा बोर्ड लावला जात आहे. निवडणुकांमध्ये निवडून येण्यासाठी मराठी मतांचा उपयोग करून घेऊन अनेक नेते मोठ्या-मोठ्या पदांवर बसले आहेत. मात्र आज त्याच मराठ्यांना गरज असतांना त्यांना आरक्षण देण्याचे सोडून त्यांच्या आरक्षणाला विरोध करणाऱ्या नेत्यांचा समाजाच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे.
राज्यातील याच मोठ्या नेत्यांची चमचेगिरी करणाऱ्या स्थानिक नेत्यांना देखील समाजाने बाजूला केले पाहिजे, अशा आंदोलनामध्ये साधुच्या वेशातील संधीसाधू ओळखण्याची गरज आहे. अनेक मराठा समाजाचे नेते हे मोठ्या नेत्यांना फायदा पोहोचवण्यासाठी त्यांना विरोध करून त्यांचेच काम करत आहे अशी परिस्थिती आहे. अनेक नेत्यांना निवडून येण्यासाठी मतदारसंघात मराठा समाजाचे डमी नेते उभे करून मतांची विभागणी करून स्वतः निवडुन येन्याचे षडयंत्र आखले जात आहे. एकंदर मराठा समाजाला आरक्षण ही काळाची गरज असली तरी समाजाने यापुढे खूप सावधरीतीने काम करण्याची गरज असल्याचे मत कृषीतज्ञ, काँग्रेस नेते सचिन होळकर यांनी व्यक्त केले.