
काय आहे प्रकरण?
नाशिक : ठाकरे गटाचे (Thackeray group) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) 'सामना' (Samana) या ठाकरे गटाच्या मुखपत्रातून सत्ताधार्यांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. पण याच वेळी ते वर्तमानपत्रातून अनेक आक्षेपार्ह विधाने करतात, तर कधी सत्ताधार्यांवर खोटेनाटे आरोप करतात. असंच एक प्रकरण संजय राऊतांना चांगलंच महागात पडणार आहे. नाशिक (Nashik) जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्याविरोधात मानहानीचा व बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध केल्याने संजय राऊतांना मालेगाव येथील मे. न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे.
संजय राऊत यांनी सामना या वृत्तपत्रात गिरणा सहकारी साखर कारखान्यात मंत्री दादा भुसे यांनी १७८ कोटी रुपयांचा शेअर्स घोटाळा केल्याचा चुकीचा व बदनामीकारक मजकूर प्रसिध्द केल्याचा आरोप दादा भुसे यांनी केला होता. त्यांनी मालेगावच्या मा.अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात राऊतांविरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला आहे. ज्येष्ठ विधीज्ञ सुधीर अक्कर यांच्या मार्फत दाखल केलेल्या या फौजदारी खटल्यात मंत्री दादा भुसे यांची जन सामन्यांमध्ये प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशाने दै. सामना या वर्तमानपत्रातून बदनामी केल्याचा आरोप संजय राऊत यांच्यावर करण्यात आला आहे.
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची मे महिन्यात मालेगाव येथे जाहीर सभा झाली होती. यावेळी कार्यक्रमात बोलताना गिरणा साखर कारखान्यात मोठा घोटाळा झाल्याचे सांगत यात दादा भुसेंचा हात आहे, अशी टीका संजय राऊत यांनी दादांचं नाव न घेता अप्रत्यक्षपणे केली होती. यानंतर त्यांनी सामना वर्तमानपत्रातून पुन्हा याच घोटाळ्याबद्दल दादा भुसेंच्या नावासकट छापून आणले. त्यांचा या प्रकरणाशी संबंध नसताना संजय राऊतांनी चुकीचा मजकूर प्रसिद्ध केल्याचा आरोप दादा भुसे यांनी केला. त्यामुळे या प्रकरणी खुलासा करण्यासाठी आज मालेगाव न्यायालयात हजर राहण्याचे आदेश संजय राऊतांना देण्यात आले आहेत.
दरम्यान, खा.संजय राऊत हे आज स्वतः मालेगाव न्यायालयात हजर राहतात की, वकिलांमार्फत आपले म्हणणे मांडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सामनामध्ये प्रसिद्ध झालेला मूळ लेख हा पुरावा म्हणून दादा भुसे यांच्याकडून सादर करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त ललित पाटील प्रकरणात देखील दादा भुसे विरुद्ध संजय राऊत असा संघर्ष सुरु आहे.