तीन प्रवाशांविरोधात मोठी कारवाई…
मोपा : गोव्यातील मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमातळावर (Goa Mopa Airport) २८ आयफोन (iPhone Seized) आणि सुमारे चार कोटींचं सोनं (Gold Seized) जप्त करण्यात आलं आहे. गोवा विभागाच्या अधिकाऱ्यांनी तस्करीप्रकरणी (Smuggling) मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी तीन प्रवाशांना अटक करण्यात आली आहे. या प्रवाशांच्या बॅगमध्ये आयफोन आणि सोनं आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
डीआरआय गोवा विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मोपा विमानतळावरून तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती सुत्रांकडून मिळाली होती. त्यानंतर केंद्रीय महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (DRI) अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. तीन प्रवासी अबूधाबीहून गोव्याला आले होते. त्यांची तपासणी केली असता हा माल आढळून आला.
तीनही प्रवाशांना बेकायदेशीररित्या सात किलो सोन्याची पेस्ट आणि आयफोनची तस्करी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. तसेच हा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हे तिघेजण मुंबई आणि दुबई दरम्यान कार्यरत असलेल्या सोन्याच्या तस्करी रॅकेटचा भाग असल्याचा डीआरआयला संशय असल्याने त्यांची कसून चौकशी केली जात आहे.
कशी केली कारवाई?
डीआरआय गोवा विभागाला तस्करीप्रकरणी सुत्रांकडून सुगावा लागल्याने सर्व प्रवाशांची बारीक तपासणी केली जात होती. यामध्ये तीन प्रवाशांजवळ सोनं आणि आयफोन्स आढळून आले. या आरोपींच्या बॅगमध्ये आयफोन गुंडाळलेले होते, त्याशिवाय कपड्यांमध्ये कमरेकडे सोन्याची पेस्ट लपवून ठेवली होती. या तीन प्रवाशांकडून ३ कोटी ९२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.