
धरमशाला : टीम इंडिया आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यामध्ये (World Cup 2023) रविवारी धर्मशालाच्या मैदानात जोरदार लढत होणार आहे. विश्वचषक स्पर्धेत भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ सध्या बलाढ्य आहेत आणि आतापर्यंत हे दोन्ही संघ अजेय राहिले आहेत. जो संघ रविवारच्या लढतीत बाजी मारेल त्याचे उपांत्य फेरीचे तिकीट निश्चित समजले जाईल. पण धरमशालाच्या मैदानात एका संघाचा विजयरथ थांबणार हे निश्चित. न्यूझीलंड संघ गुणतालिकेत सध्या पहिल्या स्थानावर आहे तर भारत दुसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे या लढतीत विजेता संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर झेप घेईलच पण तो सेमीफायनचे तिकिटही जवळपास निश्चित करेल.
न्यूझीलंड आणि भारत या दोघांनीही आपल्या पहिल्या चार सामन्यात एकतर्फी विजय मिळवला आहे. परंतु चांगल्या रनरेटमुळे, न्यूझीलंड क्रमांक-१ वर आहे आणि भारत पॉइंट टेबलमध्ये नंबर-२ वर आहे. त्यामुळे भारत आणि न्यूझीलंड यांच्यात चुरशीची लढत होईल, यात शंकाच नाही.
धरमशाला येथील एचपीसीए स्टेडियम वेगवान गोलंदाजांना मदत करते, पण हे मैदान फलंदाजांसाठीही तितकेच पोषक आहे. इतर मैदानांपेक्षा हे मैदान लहान असल्यामुळे येथे चौकार-षटकारांचा पाऊसही पडण्याची शक्यता आहे. या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांना फारशी मदत होत नाही, पण वेगवान गोलंदाज त्यांच्या कौशल्याचा फायदा घेऊ शकतात.
सध्या सुरु असलेल्या विश्वचषकात या मैदानावर आतापर्यंत ३ सामने झाले आहेत. त्यामध्ये एका संघाच्या सर्वाधिक ३६४ धावा झाल्या आहेत, तर सर्वात कमी धावसंख्या १५६ ही आहे. त्याशिवाय पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या २३१ आहे, तर दुसऱ्या डावाची सरासरी १९९ धावांची आहे. या मैदानावर दव पडण्याचीही शक्यता अधिक आहे. त्यामुळे येथे दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघाला अधिक फायदा होतो. त्यामुळे कर्णधार नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेईल असे दिसते.
भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ सध्या बलाढ्य आहेत. आतापर्यंत हे दोन्ही संघ अजेय राहिलेत. रविवारी जो संघ बाजी मारेल तो उपांत्य फेरीचे तिकीट जवळपास निश्चित करेल. कारण या विश्वचषकात सहभागी होणाऱ्या १० संघांना राउंड रॉबिन सामन्यांमध्ये ९-९ सामने खेळायचे आहेत. याआधीचा इतिहास पाहिला तर ५ किंवा ६ सामने जिंकणारा संघ उपांत्य फेरीत पोहोचला आहे. त्याशिवाय या दोन्ही संघाचा नेट रनरेटही सर्वोत्तम आहे. अशा परिस्थितीत रविवारचा सामना जिंकून उपांत्य फेरीचे तिकीट जवळपास निश्चित करण्याच्या इराद्याने दोन्ही संघ मैदानात उतरतील.
समीकरण काय आहे...
जर आपण समीकरणांबद्दल बोललो तर, प्रत्येक संघाला राउंड रॉबिन स्वरूपात ९-९ सामने खेळावे लागतात. या फॉरमॅटमध्ये गुणतालिकेतील अव्वल ४ संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. गणितावर नजर टाकली तर ६ विजय उपांत्य फेरीचे तिकीट मिळवून देऊ शकतात. अन्यथा सात विजयांमध्ये उपांत्य फेरीचे तिकीट निश्चित होईल. न्यूझीलंड आणि भारत सध्या सारख्याच समीकरणावर उभे आहेत. इथून एक विजय १० गुणांच्या जादुई आकड्याच्या जवळ घेऊन जाईल. भारत जिंकला तर त्याला चांगली संधी आहे.
परतफेड करण्यास टीम इंडिया उत्सुक
भारतीय संघाने २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेतील पहिले चार सामने जिंकून उपांत्य फेरीच्या शर्यतीत स्वतःला अग्रेसर ठेवले आहे. भारत आणि न्यूझीलंड हे दोनच संघ आतापर्यंत संपूर्ण स्पर्धेत अजिंक्य राहिले आहेत. आता हे दोन्ही संघ रविवार २२ ऑक्टोबरला आमनेसामने येणार आहेत. विशेष बाब म्हणजे टीम इंडिया २००३ पासून म्हणजेच २० वर्षांपासून वनडे वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडविरुद्ध जिंकू शकलेली नाही. २००७, २०११ आणि २०१५ मध्ये दोघे एकमेकांना सामोरे आले नव्हते. त्यानंतर २०१९ मध्ये पावसामुळे एक सामना रद्द झाला आणि उपांत्य फेरीतील पराभवाची जखम आजही प्रत्येक भारतीय चाहत्याला सलत आहे. त्यामुळे हा सामना चांगल्या फरकाने जिंकून न्यूझीलंडला धोबिपछाड देऊन परतफेड करण्यासाठी टीम इंडिया उत्सुक आहे. आता टीम इंडियाकडे ही २० वर्षांची प्रतीक्षा संपवण्याची संधी आहे, भारतीय संघ किवी संघाकडून मागील पराभवाचा बदला घेण्यास सक्षम असेल की नाही हे पाहणे बाकी आहे. पण यादरम्यान, जर आपण उपांत्य फेरीच्या समीकरणाबद्दल बोललो तर, हा एक विजय दोन्ही संघांसाठी उपांत्य फेरीचे तिकीट जवळजवळ निश्चित करू शकतो. या सामन्यानंतर न्यूझीलंडला ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान आणि श्रीलंकेचा सामना करायचा आहे. दुसरीकडे टीम इंडियाला नेदरलँड्स, श्रीलंका, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेचा सामना करावा लागणार आहे
टीम इंडियाच्या उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक
संघाचे पुढील दोन सामने नेदरलँड आणि श्रीलंकेविरुद्ध होणार आहेत. भारतीय संघाचा फॉर्म पाहता या दोन संघांमधूनही रोहितची सेना अपसेटचा बळी ठरू शकेल, असे वाटत नाही. अशा परिस्थितीत मेन इन ब्लू केवळ एका विजयासह उपांत्य फेरीचे तिकीट निश्चित करू शकतात. भारतीय संघाच्या शेवटच्या ४ सामन्यांच्या वेळापत्रकाबद्दल बोलायचे झाले तर, रविवारी, २२ ऑक्टोबर रोजी न्यूझीलंडशी झालेल्या संघर्षानंतर, संघ २९ ऑक्टोबर रोजी गतविजेत्या इंग्लंडशी भिडणार आहे. त्यानंतर टीम इंडियाचा सामना २ नोव्हेंबरला श्रीलंकेशी, ५ नोव्हेंबरला दक्षिण आफ्रिकेशी आणि १२ नोव्हेंबरला नेदरलँडशी होणार आहे.
आजचा सामना : भारत विरुद्ध न्यूझीलंड
दिनांक आणि वेळ : रविवार, २२ ऑक्टोबर, दुपारी २ वाजता
ठिकाण : एचपीसीए स्टेडियम, धरमशाला
भारताचा संभाव्य संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रवींद्र जाडेजा, मोहम्मद शामी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
न्यूझीलंडचा संभाव्य संघ : डेवोन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, टॉम लेथम (कर्णधार आणि विकेटकीपर), डेरिल मिचेल, ग्लेन फिलिप्स, मार्क चैपमैन, मिशेल सेंटनर, मॅट हेनरी, लॉकी फर्ग्यूसन, ट्रेंट बोल्ट.