- संवाद : गुरुनाथ तेंडुलकर
पोलादी पुरुष म्हणून ज्यांना गौरवलं जातं त्या सरदार वल्लभभाई पटेलांच्या जीवनातला हा एक छोटासा प्रसंग. वल्लभभाई त्यावेळी अवघे बारा-चौदा वर्षाचे होते. त्यावेळी ते ‘सरदार वल्लभभाई’ नव्हते. साधा शाळकरी वल्लभ होते. या वल्लभच्या गावात केवळ चौथीपर्यंत शाळा होती. पाचवीच्या पुढची शाळा त्यांच्या गावात नव्हती. त्यामुळे घरापासून साधारण चार मैल दूर अंतरावर असणाऱ्या शेजारच्या गावातील शाळेत वल्लभ दाखल झाला. इतर शाळकरी मुलांप्रमाणेच वल्लभदेखील दुपारी चालत शाळेत जायचा आणि संध्याकाळी इतर मुलांसोबत चालत चालत घरी यायचा. हिवाळ्याच्या दिवसांत सूर्य लवकर मावळल्यामुळं घरी परतेपर्यंत चांगलाच अंधार पडलेला असायचा. आजच्या सारखे त्याकाळात रस्त्यावर विजेचे दिवे वगैरे नव्हते. बॅटरीवर चालणाऱ्या टॉर्चसुद्धा नव्हत्या. त्यामुळे सगळी मुलं एकमेकांच्या सोबतीने चांदण्याच्या अंधूक उजेडात घरी परतत. वल्लभच्या शाळा ते घर या वाटेवर एक भलामोठा दगड होता. काळोखात त्या दगडाला अडखळून दररोज कुणी ना कुणी ठेचकळायचा. अनेक दिवस तो दगड तिथे पडून होता. मुलं नेहमीच त्या दगडाला ठेचकाळत होती. उठून चिडचिडत होती आणि पुन्हा मार्गाला लागत होती.
एके दिवशी वल्लभची शाळा लवकर सुटली. घरी परतताना सगळी मुलं पुढे निघून गेली पण वल्लभ मात्र मागे राहिला. थोडं अंतर पुढे गेल्यानंतर वल्लभ कुठं दिसेना म्हणून सगळी मुलं माघारी फिरली. त्यावेळी वल्लभ शाळेचं दप्तर बाजूला ठेवून एकट्यानं तो दगड दूर सारण्याचा प्रयत्न करीत होता. त्याला धाप लागली होती. कपडे घामानं चिंब भिजले होते.
‘अरे वल्लभ हे काय करतोस तू?’ कुणीतरी विचारलं.
‘अरे, तू कशाला हा दगड हलवतोयस?’ आणखी एका मुलानं विचारलं. ‘मग? मी नाही तर कोण हलवणार हा दगड?’ वल्लभने प्रश्नकर्त्याला उलट प्रश्न विचारला.
‘अरे आपण गावच्या मुखियाला सांगूया. त्याचं काम आहे हे.’ कुणीतरी म्हणाला.
‘आपण हिरालाल चौधरींना सांगूया. ते या जमिनीचे मालक आहेत.’ आणखी एकानं सूचना केली.
वल्लभने त्या मुलांकडे एक कटाक्ष टाकून विचारलं, ‘जमिनीच्या मालकाचा या दगडाशी संबंध काय?’
‘कारण हा रस्ता हिरालाल चौधरींच्या मालकीच्या जमिनीतून जातो.’ हां हां म्हणता त्या मुलांमधे दोन गट पडले. दगड हलवायचं काम नेमकं कुणाचं? ‘जमिनीच्या मालकाचं की गावच्या मुखियाचं?’ एक नवा वाद रंगला. वल्लभने त्या भांडणाऱ्या मुलांना प्रथम शांत केलं आणि विचारलं. ‘दररोज या दगडाला अडखळून कोण पडतो?’
‘आपणच.’ मुलं एक सुरात उत्तरली. ‘म्हणजे या दगडाचा त्रास नेमका कुणाला होतो? जमिनीच्या मालकाला? गावच्या मुखियाला? की आपल्याला?’ ‘अर्थातच आपल्याला.’ मुलं पुन्हा एकसुरात उत्तरली. ‘मग ज्याला त्रास होतो त्यांनीच म्हणजे आपणज हा दगड हलवायला नको का?’ वल्लभचा हा युक्तिवाद मुलांना पटला आणि सगळ्यांनी मिळून तो दगड वाटेतून दूरकेला. पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेलांच्या बालपणीचा हा प्रसंग…
आपल्या सर्वसामान्य माणसांना दररोजचं आयुष्यात असे अनेक ‘दगड’ दिसतात. अनेकदा आपण त्या दगडांना अडखळून पडतो देखील पण तरीही धडपडल्यानंतर केवळ शिव्या घालण्यापलीकडे आपण काहीच करत नाही.
अगदी दररोजच्या आयुष्यातले प्रसंग असतात. रस्त्यावर कुठंतरी पाण्याची पाईपलाईन फुटून कारंज उडताना आपण पाहतो. आपण ‘फक्त पाहतो’ आणि पुढे जाताना म्हणतो, ‘एवढं पाणी वाया जातंय? ही म्युनिसिपालिटी बघ कशी झोपा काढतेय.’ पण त्या झोपलेल्या म्युनिसिपालिटीला एक फोन करून या घटनेची वर्दी देण्याचे कष्ट आपण घेतो का? रस्त्यावर काही मजूर चांगला रस्ता खणण्याचं काम करीत असतात. गेल्याच आठवड्यात हा रस्ता खणून नीट केलेला असतो. तो पुन्हा कशासाठी खणला जातोय? रस्ता खणण्याचं कंत्राट कुणी कुणाला दिलंय त्याच्याशी आपल्याला काही देणं घेणं असतं का? कशासाठी खणताहेत हा चांगला रस्ता? याची सुजाण नागरिक या नात्यानं आपण चौकशी तरी करतो काय? आपण फक्त चरफडतो. वैतागतो आणि गप्प बसतो. या अगदी साध्या साध्या गोष्टी असतात. पण आपण दुर्लक्ष केल्यामुळे त्याचा त्रास कमी न होता वाढतच जातो. आपण मध्यमवर्गीय पांढरपेशा वृत्तीची माणसं केवळ मी आणि माझं कुटुंबीय या परिधापलीकडे जातच नाही ही खरी शोकांतिका आहे. आपण वर्तमानपत्रं उघडतो आणि भ्रष्टाचाऱ्यांच्या बातम्या वाचतो. पण हे राजकारणी म्हणजे आपणच निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आहेत. त्यांना जाब विचारायचा आपल्याला हक्क आहे याची जाणीव ठेवून आपण त्यांचा साधा निषेध तरी करतो का?
राजकारण्यांचा निषेध वगैरे दूरची गोष्ट. अगदी शेजाच्या घरात एखाद्या तरुण सुनेचा हुंड्यासाठी छळ चाललेला असतो. तिला मारहाण होत असते. तिच्या किंकाळ्या ऐकू येत असतात. त्या किंकाळ्या ऐकू येऊ नये म्हणून आपल्या घरातल्या टीव्हीचा आवाज वाढवल्याची उदाहरणं मी पाहिली आहेत. मध्यमवर्गीयाच्या या संकुचित मनोवृत्तीमुळेच एखादी रिंकू पाटील, एखादी अमृता देशपांडे, एखादी विद्या प्रभुदेसाई जीवानिशी जाते. विद्या प्रभूदेसाईच्या बाबतीत तर तिला बाॅम्बे सेंट्रलच्या भर गर्दीच्या रस्त्यावर संध्याकाळच्या वेळी एका माणसाने जिवंत जाळली. सांगलीच्या चौकात १८ वर्षांच्या अमृता देशपांडेवर एकतर्फी प्रेमातून एका गुंडानं चाकूनं वार केले. त्यावेळी तिथं उपस्थितांपैकी सगळ्यांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली होती. एकही माणूस त्या हल्लेखोराला अडविण्यासाठी पुढे आला नाही की जखमी मुलीला घेऊन हॉस्पिटलात गेला नाही. ती रस्त्यावरच मेली… जर उपस्थितांपैकी कुणीतरी धैर्य दाखवून त्या हल्लेखोराला अडवलं असतं किंवा जखमी अमृताला वेळेवर वैद्यकिय मदत मिळाली असती तर…? तर, ती नक्की वाचली असती. असो. ‘मला काय करायचंय?’ या विचारानं आपण अशा घटनांकडे पहातो. क्षणभर हळहळतो आणि आपापल्या कामाला लागतो. नेमकी याच्याविरुद्ध वृत्ती बाळगणारेही समाजात आहेत. केवळ मी आणि माझं कुटुंब याच्या बाहेर जाऊन व्यापक समाजहित ध्यानात घेऊन कार्य करणारी अलौकिक माणसंही अद्याप शिल्लक आहेत. अशा माणसांपैकीच एका अलौकिक राजेंद्र सिंह नावच्या एका माणसाची ही गोष्ट…
राजस्थानातील अरवली पर्वताच्या पायथ्याशी वसलेलं एक गाव अलवार. या अलवार गावात पाण्याचं प्रचंड दुर्भिक्ष होतं. माणसं पाण्यासाठी वणवण भटकत होती. अशा वेळी राजेंद्र सिंह नावाच्या तरुणानं एक अभिनव संकल्पना मांडली. आपल्या गावाच्या आसपासच्या पर्वतावर पडणाऱ्या पावसाचं पाणी अडवलं तर? पूर्वी अशा प्रकारची पद्धत अस्तित्वात होती. त्याला आपले पूर्वज जोहड म्हणत. जोहड म्हणजे पर्वताच्या उतारावर अर्धवर्तुळाकार बांधलेली भिंत. या भिंतीच्या सहाय्याने उतारावरून वाहणारं पाणी अडवता येत असे. राजेंद्र सिंहांनी याच जोहड पद्धतीचं पुनरुज्जीवन करण्याचं ठरवलं. तरुण भारत संघ नावाची संघटना उभारली. गावकऱ्यांच्या मदतीने अलवार तालुक्यातीत अरवली पर्वताच्या उतारावर श्रमदानातून काही जोहड उभे केले. त्यानंतरच्या पावसाळ्यात उतारावरून वाहून जाणाऱ्या पाण्याला काही प्रमाणात का होईना आळा बसला. अडवलेलं पाणी जमिनीत जिरून गावातल्या तलावांना आणि विहिरींच्या पाण्याच्या पातळीतही वाढ झाली. पुढच्या वर्षी आणखी जोहाड बांधले गेले. हां हां म्हणता १५ वर्षांत आता अलवार तालुक्यात आणि आसपासच्या शे-शंभर गावातून हजारो जोहाड उभे राहिले. आज त्यांची संख्या पाच हजारांच्या वर गेली आहे. अरवली पर्वताच्या आसपासचा प्रदेश पुन्हा एकदा ‘सुजलाम सुफलाम’ झाला आहे. तुमच्या आमच्यासारखाच एक सामान्य माणूस मनात आणलं, तर कशा प्रकारचं काम करू शकतो याच हे उदाहरण. इंग्रजीत एक वचन आहे. Leadership is the capacity to translet vision the into reality. The leader is the one who knows the way, goes tha way and shows the way.
आपण अशा प्रकारचं काही भव्य दिव्य काम करू शकतो का? तसं काम करायला इतरांना प्रवृत्त करू शकतो का? कदाचित नसेलही पण कुणी करत असेल तर त्याला निदान सक्रिय सहकार्य तरी करू शकतो ना? ‘माझा काय संबंध?’ असं म्हणून स्वतःपुरता विचार करण्यापेक्षा तेवढं केलं तरी खूप होईल.
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra