Tuesday, July 9, 2024
Homeसाप्ताहिककोलाजWeaver bird : महान वास्तुविशारद सुगरण

Weaver bird : महान वास्तुविशारद सुगरण

  • निसर्गवेद : डॉ. महालक्ष्मी वानखेडकर

सुगरण हा एक छोटासा सुंदर पक्षी आहे. शत्रूंपासून रक्षण व्हावे म्हणून खजूर, नारळ यांसारख्या उंच झाडावर आणि बाभळीसारख्या काटेरी झाडांवर याची घरटी असतात. तो उत्कृष्ट कारागिरीसाठी ओळखला जातो म्हणूनच त्याला वास्तुविशारद असेही म्हणतात.

विव्हर बर्ड म्हणजेच सुगरण किंवा बया हा एक छोटासा सुंदर पक्षी आहे. पण तो घरट्याच्या उत्कृष्ट कारागिरीसाठी ओळखला जातो. म्हणूनच त्याला महान अभियंता आणि वास्तुविशारद म्हणतात. हे आशिया आणि आफ्रिकेत आढळतात. त्याला शेतात आणि जंगलात राहायला आवडते. यांची घरटी आपल्याला तलाव आणि नद्यांच्या जवळ दिसतात. शत्रूंपासून रक्षण व्हावे म्हणून खजूर, नारळ यांसारख्या उंच झाडावर आणि बाभळीसारख्या काटेरी झाडांवर यांची घरटी असतात. त्यांच्या गोल्डन, प्लेसियस, बाभूळ, सोशल, बिशप्, चिमणी, पांढऱ्या डोक्याचा सुगरण, बया अशा अनेक प्रजाती आहेत. नर पिवळ्या आणि काळा रंगाचा असतो, तर मादीचा रंग केशरी-तपकिरी असतो. त्याचा आकारही फक्त १५ सें.मी.पर्यंत आहे.

एक दिवस पावसाळ्यात मला सुगरणीचा खोपा मिळाला. मी अगदी तशाच शेडमध्ये कागद रंगविला. त्यावर सर्व प्रक्रिया केल्या. जशा खोप्यामध्ये सुकलेल्या काड्या असतात अगदी तशाच कागदाच्या बारीक बारीक काड्या कापल्या. आता वेळ आली खोपा बनविण्याची. खूप व्हीडिओ बघितले. पण माझ्या दहा बोटांनी मला विणता येत नव्हतं. एवढीशी चोच, राई एवढा मेंदू,दोन पाय एवढ्याच गोष्टींनी तो त्याच ते अप्रतिम आणि अविश्वसनीय असं घरटं एवढ्याशा चोचीने आणि पायांच्या सहाय्याने विणत असतो. बाप रे! आता मला रडूच कोसळले. कारण मी कितीही प्रयत्न केला तरी तसं घरटं मला विणता येईना. मला बहिणाबाईंच्या “सुगरण” कवितेतील ओळी आठवल्या.

“उलूशीच चोच, तेच दात तेच ओठ.
तुला दिले रे देवाने, दोन हात दहा बोटं”
पृथ्वीवरील हे मिरॅकल फक्त आणि फक्त या जीवांकडेच आहे. मानवाला फक्त बोलता येतं आणि मानवाचा मेंदू जास्त क्षमता असणारा आहे. मानव एक परिपूर्ण जीव आहे. पण या कलाकृती समोर आपण शून्य आहोत हे मला प्रत्येक वेळेला क्षणोक्षणी जाणवले. महत्प्रयासाने ते घरटे मी बनविले अगदी तसेच. गंमत म्हणजे खऱ्या आणि खोट्या काड्या ओळखताना माझाही गोंधळ व्हायचा. सुगरण नराला जास्तीत जास्त २८ दिवस लागतात. ते त्याच्या लहान-मोठ्या घरट्यांवर अवलंबून असते. मला जवळजवळ दोन महिने लागले. एवढ्या मेहनतीने बनवलेल्या या घरट्यामध्ये मादी आणि पिल्लं जेमतेम २० दिवस राहतात आणि मग उडून जातात. मेपासून ते सप्टेंबरपर्यंत घरटी विणली जातात कारण पावसाळ्यामध्ये प्रजनन काळ असतो. मग इतर दिवशी हे पक्षी झाडांवरच राहतात.

एक मी फोटो पाहिला होता. त्यात सुगरणीच्या खोप्यातून पडलेल्या पिल्लाला बया नराने चोचीत धरलेले आहे आणि त्याने स्वतःच्या पायाने खोपा पकडलेला आहे, चोचीने पिल्लाची चोच धरली आहे आणि पिल्लाने आपल्या वडिलांच्या डोक्यावरचे पंख त्याच्या पायाने धरलेले आहेत. मादी बया त्या पिल्लाला आधार देऊन वर ढकलत आहे असे दृश्य होते. मी बराच वेळ तो फोटो पाहिला आणि खूप गोष्टी लक्षात आल्या. नर बया हा मादीचे आणि पिल्लाचे वजन पेलू शकतो म्हणून त्याने त्याच्या पायाच्या आधाराने खोपा धरलेला होता आणि पिल्लाला वर ढकलण्याचे काम मादी करत होती. पिल्लाच्या डोळ्यांत आई-वडिलांबद्दल त्याच्या संरक्षणाचे भाव दिसत होते. खरं तर हा बया पक्षी हा सुद्धा कुटुंबवत्सल असतो. आपल्या पिल्लांची आपल्या मादीची खूप काळजी घेतो, त्यांचे संरक्षण करतो. बऱ्याचदा पिल्लं सापाचे भक्ष्य बनतात. तेव्हा नर किंवा मादी पिल्ल उडून जाईपर्यंत एकजण घरट्यात पिल्लांचे संरक्षण करीत तिथेच थांबत असतात. जर एखादा शत्रू आला, तर त्याला तिथून पिटाळल्याशिवाय ते राहत नाही. त्यांचा खूप कलकलाट असतो आणि त्यांच्या मदतीला अशा वेळेला इतर पक्षी सुद्धा धावून येतात. त्यांच्या विशिष्ट आवाजावरून आपल्याला सुद्धा हे समजते.

त्यांची घरटी झाडावर टांगलेली असतात. सर्व पक्ष्यांना पावसाची कल्पना असते आणि त्यानुसार ते आपली घरटी बनवतात. नर घरटे बांधतो, तेव्हा मादी त्याची पाहणी करते; जर तिला घरटे आवडत नसेल, तर ती निघून जाते. म्हणूनच अनेक वेळा नर ते घरटे अर्धेच सोडतो आणि नवीन विणतो. मादीला घरटे आवडले, तरच ती घरट्यात येते. त्यामुळेच कधी कधी झाडावर अर्धी अपूर्ण घरटी दिसतात. त्यांचे घरटे अतिशय गुंतागुंतीचे असतात. प्रत्येक गवताची काडी घेऊन विशिष्ट पद्धतीने तो त्याची गाठ मारून फांदीवर मजबूतपणे गुंफतो. एकदा का घरट्याची कडी तयार झाली की मग घरट्याला सुरुवात. नाजूक हिरव्या गवताच्या काड्यांच्या गाठी सुकल्यावर मजबूत होतात. आता त्या घरट्यामध्ये पिल्लांना झोपण्यासाठी जागा, मादीची बसण्याची-आरामाची सोय, त्यांचे अन्न साठवणूक करण्याची जागा असं अगदी व्यवस्थित नीटनेटकं. अगदी आपल्या घरासारखं अनेक दालनांचे घर. कापूस, सुतळ्या,पिसं, तलम धागे आणि चिखल यांचा उपयोग करून तो ऊबदार आणि मऊ असा घरट्याच्या आतील भाग करतो. तर अन्नसाठा म्हणून स्पायडर, काजवे हेही तो त्यांच्या अन्नसाठ्याच्या खोलीत ठेवतो. त्यानंतर प्रवेशद्वारापर्यंत पोहोचण्याचा निमुळता संकीर्ण अगदी आपल्या घरातल्या पॅसेजेसारखा आकार. बाहेरून जर आकार बघितला, तर दुधी भोपळ्यासारखा वाटणारा. गंमत म्हणजे त्यांच्या घराच्या रचनेचा आकार अनेक दालनांमुळे मोठा होत गेलेला आणि बाहेरच्या शत्रूने हमला न करावा, आपल्या पिलांपर्यंत लवकर पोहोचू नये यासाठी असणारा लांबट निमुळता आकार. आपल्या कुटुंबाच्या रक्षणासाठी त्यांच्या सुख सोयींचा विचार करून केलेलं घर. एखाद्या आपल्यासारख्या वास्तुविशारदाला लाजवेल असं. डहाळ्या, झाडाची पाने आणि गवत मिळून घरटे बनविल्यामुळे ते वजनाने खूप हलके, पण खूप मजबूत असत म्हणून ते कधीही वादळात पडत नाहीत. हे घरटे बनवताना मला एक गोष्ट समजली की, या जगात निसर्ग आपल्याला नेहमीच संरक्षण आणि शक्ती देतो. नारळाचे झाड हे नैसर्गिकरित्या खूप उंच असले तरी मजबूत असत. शिवाय सापासारखे शत्रू तिथपर्यंत लवकर पोहोचू शकत नाहीत हेही या पक्ष्यांना माहीत असतं म्हणूनच त्यांची घरटी नारळासारख्या उंच झाडांवरच असतात. जेव्हा ते आपली घरटी झाडांच्या फांद्यांशी जोडतात, तेव्हा या नारळाच्या तुसांचा त्यांना चांगला उपयोग होतो. त्यांचे गोल घर कुटुंबासाठी नाजूक, हलके, मजबूत आणि ऊबदार असेच बनलेले असते. दक्षिण आफ्रिकेमधील नामिबिया आणि वात्सवाना येथे सोशल बया पक्ष्यांची एकाच ठिकाणी गवताच्या पेंडींसारखी जास्तीत जास्त दोनशे घरट्यांच्या कॉलनी शुष्क झाडांवर आणि विजेच्या खांबांवर आढळतात.

माझ्या या कलाकृतीत सुगरणीचा खोपा आणि तिचे कुटुंब, एक मादी आपल्या घरट्याकडे जात आहे आणि तिथे घरट्यातून बाहेर वाकून तिचं पिल्लू तिची वाट पाहत आहे, तर एक मादी बया एका फांदीवर विसावली आहे आणि दुसरा नर बया दुसऱ्या फांदीवर घरटे विणत आहे. त्यांची वसाहत आणि वेगळी जीवनशैली एकाच नारळाच्या झाडावर दिसते. ६१सें.मी.× ९२ सें.मी. असलेली ही कलाकृती माझी आवडती आहे. कारण त्यातून मला निसर्गाची अद्भुत कलाकृती अनुभवायला मिळाली.

निसर्गाच्या रचनेबद्दल जेव्हा मी अभ्यास करते, तेव्हा कायम असेच वाटते की, आपण या स्वर्गीय सुंदर कलाकृतीपर्यंत पोहोचू शकतच नाही. आपण या सर्व निसर्गापुढे खूप फिके आहोत हे मानवाने कायम लक्षात ठेवावे. निसर्ग खूप अद्वितीय, अनाकलनीय असे गूढ रहस्यच आहे. मानव स्वतःला जगतज्जेता समजतो. का? हे सुद्धा एक गूढच आहे. या जगात किती जीव आहेत हे तंतोतंत कोणीही सांगू शकत नाही. या धरतीमातेच्या आंतरिक आणि बाह्यसौंदर्याचे कोडे हे कधीही न उलगडणारे आहे. आपण त्याच्या बाह्यसौंदर्याचा विध्वंस केल्यामुळे आंतरिक सौंदर्याचा आणि संतुलनाचा विध्वंस होत आहे.

dr.mahalaxmiwankhedkar@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -