- मनस्विनी : पूर्णिमा शिंदे
स्त्री स्वातंत्र्य महती ते स्त्रीचा प्रवास अनेक पातळीवर जन्मापासूनच रोखला जातो. नव्हे नव्हे गर्भातच तिच्यावर अपेक्षांचं ओझं लादलं जातं. ‘ती’ तो नाही म्हणून पण ती माणूस नाहीच का? समाजाची निर्मिती, उत्पत्ती जिच्यापासून होते ते विश्व आणि या विश्वात ती दुय्यम, शूद्र, उपभोग्यदासी कशी असू शकते? समाजाला मुळातच तिचे अस्तित्व पटवावेच का लागते? सरपंच ते राष्ट्रपती अशा तिचा प्रवास झाला तरी तिचा वनवास काही केल्या संपला नाही. चूल गेली गॅस आला, नांगर गेला ट्रॅक्टर आला, बैलगाडी गेली चारचाकी आली. वेळोवेळी देवीची सोयीनुसार दासी होते. मखरातील ती, तिचं कधी घराघरात, उंबऱ्याबाहेर, कधी हक्कापासून वंचित, उपेक्षित! काय रे देवा हे जीणं? किती हा पक्षपातीपणा? हे दुःख कुणा जन्माचं? विटंबना, अवहेलना, अपमान, अपेक्षा का तर ती परित्यक्ता स्त्री.
समाजात अशा अनेक महिला आहेत की, ज्यांना त्यांच्या स्वतःच्या हक्कापासून वंचित ठेवले जाते. हक्क हिरावून घेतले जातात. लग्नाची पत्नी हयात असतानाही पुरुषांनी पुरुषप्रधान संस्कृतीत वाटेल ते करावं. स्वतःचे आई-वडील, संसार, आपणच जन्म दिलेली लेकरं सोडून तिला न जुमानता मग दुसरं लग्नही करावे! पत्नीला सोडून घटस्फोट देऊन तिला आयुष्यातून उठवून काहीही करावे. मग ती घटस्फोटीत पीडित विधवा बेदखल स्त्रियांना समाजात मिळणारी वागणूकही बरबटलेल्या नजरांचीच असते. पदोपदी सुधारित म्हणून घेणाऱ्यांच्याही पापबुद्धीला कधीकधी लकवा मारतोस. नतभ्रष्ट समाजातही काही प्रामाणिक माणसं असतात. जे यांना दुःख देत नाही. प्रवास हा रेल्वे वा रस्त्याचा असो वा जीवनाचा असो तो एकट्याचाच प्रवास असतो. तेव्हा ती स्वबळावर पुढे जाते. आत्मविश्वासाने आत्मनिर्धार आणि आत्मबलाने पाऊल टाकत तावून-सुलाखून निघते, स्वसंरक्षणाचे कवच बनते, अशा स्त्रियांना त्यांचे कुटुंबीय दीपस्तंभासारखं साथसोबत करतात. आप्तपरिवार साथ देतात. सुसंस्काराचा पाया मजबूत अन् स्वतःच्या सामर्थ्यावर त्या पुढे जातात.
मागे वळून पाहताना जिद्दीने कधीकाळी समोर अशीच कोणी आली की, त्या तिलाही आत्मिक बळ, ऊर्जा, प्रेरणा देतात. प्रत्येकीचं एक आभाळ असतं उत्तुंग भरारीचं. प्रत्येकीचे एक स्वप्न असतं आकाशाला कवेत घेण्याचं. प्रत्येक क्षणागणिक वैचारिक चिंतन, संवेदनशील मन असतं. रोमारोमांतून तिचा आजवरचा प्रवास, ध्यास, प्रयत्नांची कास तिला क्षणाक्षणाला जागवीत असते व जगवीत असते. राखेच्या निखाऱ्यातून स्फुल्लिंग चेतवाव्यात तशा फिनिक्स पक्ष्यासारखी. आगीच्या वणव्यासारखं पेटणाऱ्या धगधगत्या मशालीला पदरात विस्तव घेऊन विस्तव, तर विझू नये आणि पदर पेटू नये, चालत राहते अंतिम ध्येयाप्रत जाण्यासाठी. पोटच्या लेकरांना मोठं करून मायेने सांभाळण्यासाठी. भूतकाळ पायाखाली तुडवते, वर्तमानाला भविष्याच्या स्वप्नांनी सांधत, रांधत चालतच राहते काट्याकुट्यांना तुडवत आनंदाचे गाणे गात, एक प्रकाशवाट निर्माण करत, आयुष्याचे सोने करत, संघर्षाचे धडे गिरवत संयमाने, तर कधी स्थितप्रज्ञतेने क्रांती घडवत… एकच असते मनात जिद्द, ‘माय आहे, मी माय आहे. लेकरांचं सुख ते माझं सुख.’ त्यांचे संगोपन, शिक्षण, पुनर्वसन यात वाहून घेतलेलं एकल पालकत्व, एकटीचाच कार्यभाग, सोबतीशिवाय एकटीने जगलेला नव्हे, जागलेला प्रवास. कित्येक हिंसाचारातींचा जगण्याचा श्वासागणिक फोडलेल्या हुंदक्यांचा, भावभावनांचा हिशोब तो प्रवास. कुशीतल्या पिलात आनंद शोधण्याचा लेकरांच्या उदंड भविष्य स्वप्न व आसक्तीचा, क्षणोक्षणी काळीज पिळवटून टाकण्याचा प्रवास.
अशाच टप्प्यावर एकल पालकत्वातून जाणं, असंख्य भगिनी असतील जगण्याचा सूर शोधणाऱ्या, आपल्या भगिनी आपापल्या कार्यातून मनगटातून जीवनातील अनंत स्वप्न सत्यात साकारणाऱ्या त्या प्रत्येक माऊलीला सलाम. तिच्या आंतरिक ऊर्जेला, कर्मत्याग समर्पणाला, तिच्यातील ममत्व, देवत्व, संतत्वाला सलाम. तिच्या प्रत्येक टप्प्यावरील संघर्ष प्रयत्नांना, त्याच्याशिवायही तिनं निर्माण केलेल्या तिच्या जीवनसमिधेला, समिधेतून उठलेल्या पुनश्च नवसंजीवनी देणाऱ्या जीवन सार्थकतेला अन् कार्यकर्तृत्वाला, सात्त्विकतेला सलाम. तिच्या मानसिकतेला आणि सलाम तिच्या एकल पालकत्वाला. सलाम अशा या साऱ्या नवदुर्गांना.
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra