सविताच्या नवऱ्याने जबरदस्तीने तुकारामकडून पॉवर ऑफ अटॉर्नी लिहून घेतली. ही गोष्ट सरिताला समजल्यावर तिने वडिलांचे मृत्युपत्र बनवायचे ठरवले. त्यामध्ये तिने मोठ्या बहिणीच्या मुलीला मोठ्या बहिणीचा जो हक्क आहे तो देण्याचे ठरवले व घरावरही सगळ्यांचा समान हक्क तिने देण्याचा ठरवले.
मुंबई हे आता जरी शहर असलं तरी ब्रिटिशांच्या काळामध्ये या ठिकाणी कोळी-आगरी यांची वसाहत होती व ती आजही आहे. या कोळी-आगरींच्या जमिनी घेऊन तिथे मुंबई शहराचा विकास करण्यात आला. यामध्ये या कोळी-आगरी बांधवांना प्रायव्हेट बिल्डरकडून भरपूर पैसा मिळाला आणि मासेमारी व शेती हा व्यवसाय असलेले हे कोळी-आगरी बांधव यांच्याकडे प्रमाणाच्या बाहेर पैसा आल्यामुळे त्यांचे आपापसांतील वाद विकोपाला भिडले.
दहिसर येथील अशाच कोळी वस्तीमध्ये घडलेला प्रकार आहे. सोनप्पा कोळी याला सहा मुलं व चार मुली असा त्याचा परिवार होता. सोनप्पाला मिळालेले पैसे त्यांनी आपल्या चार मुलींमध्ये वाटले. पुढे त्याचं निधन झालं आणि या प्रत्येकी मुलांनाही मुलं झालेली. तुकाराम होता त्याला तीन मुलीच होत्या, मुलगा नव्हता. तिन्ही मुलींचं तुकाराम याने थाटामाटात लग्न करून दिलं. मोठ्या मुलीला मुलगी झाल्यानंतर त्या मुलीला आपल्या आई-वडिलांकडे सोडून ती एका उत्तर प्रदेशच्या पुरुषाबरोबर पळून गेली. तिच्या नवऱ्याने काही काळानंतर दुसरे लग्न केलं. तिची मुलगी तन्वी ही सर्वात लहान मावशी सरिता हिच्याकडे राहत होती. दोन नंबर बहीण सविता ही दहिसरमध्येच बाजूलाच राहत होती.
तुकाराम यांची पत्नी गेल्यानंतर ते एकटेच पडले. दोन्ही मुली येऊन-जाऊन तिथे राहत होत्या. सरिता हिला नवी मुंबई या ठिकाणी दिलेली होती. तरीही ती आपल्या वडिलांची चौकशी करायला एवढ्या लांबून येत होती. आता तुकारामांची तब्येत खालावत होती व त्यातही त्यांना पॅरालाइज झाले होते. सरिता त्यांना औषध, पाणी, त्यांच्या जेवणाची व्यवस्था सर्व काही करून देत होती. बाजूलाच असलेली सविता ही मात्र त्यांना काहीही देत नव्हती; परंतु बाजूलाच असल्यामुळे दिवसभर ती आपल्या वडिलांच्या घरात राहत असायची आणि तिचा नवरा येऊन तुकाराम यांना धमक्या द्यायचा की, “हे सगळं घर आणि तुमच्या नावे असलेली प्रॉपर्टी माझ्या नावावर करा, नाहीतर मी तुम्हाला मारून कुठे फेकून देईन याचाही पत्ता लागणार नाही.” सविता तिथे येऊन सांगायची की, “माझ्या नवऱ्याशी पटत नाही म्हणून मी इथेच राहणार.”
सरिता वडील आणि मोठ्या बहिणीची त्यांच्याकडे असलेली मुलगी यांचे सर्व काही करत होती. तिच्या वडिलांना भेटायला यायची. त्यावेळी वडिलांच्या हातात पाचशे हजार रुपये देऊनच जात असे. पण तेही पैसे वडिलांच्या घरातून चोरी होत होते. सविताचा नवरा ते सगळे पैसे त्यांच्याकडून काढून घेत असे. त्याने जबरदस्तीने तुकारामकडून पॉवर ऑफ अटॉर्नी लिहून घेतली. ही गोष्ट सरिताला समजल्यावर तिने त्यांचं मृत्युपत्र बनवायचे ठरवले. त्यामध्ये तिने मोठ्या बहिणीच्या मुलीला मोठ्या बहिणीचा जो हक्क आहे तो देण्याचे ठरवले व घरावरही सगळ्यांचा समान हक्क तिने देण्याचे ठरवले. जमीन आहे तीही सर्वांनी वाटून घ्यायची आणि जर मोठी बहीण परत आली, तर तिचा अधिकार तिला द्यायचा, असं व्यवस्थित तिने आपल्या वडिलांचे मृत्युपत्र बनवलं. पण सविता हिला ते मान्य नव्हतं. कारण ती बोलत होती, “मी शेजारी राहते, त्यामुळे सगळ्या गोष्टी मलाच मिळायला पाहिजे व जी मोठ्या बहीण मुलीला सोडून गेलेली आहे, तिला आपण काहीही द्यायचं नाही. कारण तिला सांभाळतो आहे तीच मोठी मेहरबानी आहे.”
एकीकडे सरिता ही बहीण सर्वांना समान अधिकार देण्याचा प्रयत्न करत होती, तर सविता ही बहीण फक्त स्वतःचाच हक्क सर्वांवर गाजवण्याचा प्रयत्न करत होती. वडिलांचा सर्व खर्च हा सरिताच बघत होती. मोठ्या बहिणीच्या मुलीचे शिक्षणही ती करत होती. सर्वांना समान हक्क देण्याचा काठोकाठ प्रयत्न करत असताना दोन नंबर बहीण मात्र मला सर्व पाहिजे या गोष्टीवर अडून बसली होती. तिचा नवरा अजून त्यांना येऊन येऊन धमक्या देत होता व हातखर्चाला दिलेले पैसेही तो सासऱ्यांकडून काढून घेत होता. सरिता नवी मुंबईतून दहिसरपर्यंत सतत ये-जा त्या वडिलांसाठी करत होती. बाजूलाच राहणारी सविता मात्र शेजारी राहत असून वडिलांसाठी काहीही करत नव्हती. पण सगळ्या प्रॉपर्टीवर मात्र हक्क गाजवत होती व स्वतःचे सासर शेजारीच असूनही ती वडिलांच्या घरामध्ये माझं नि नवऱ्याचं पटत नाही असं सांगून रात्रंदिवस राहत होती. जर नवऱ्याचे आणि तिचे पटत नव्हतं. मग नवरा येऊन सासऱ्याला प्रॉपर्टीसाठी सतत धमक्या का देत होता? दुसरीकडे सरिता ही मात्र आपली मोठी बहीण दुसऱ्या माणसाबरोबर पळून गेली, तिच्या एका मुलीचा आपण सांभाळ करतो आहे तरीही आपल्या गेलेल्या बहिणीलाही प्रॉपर्टीमधला हिस्सा द्यायला तयार होती. दोन्हीही सख्ख्या बहिणी; परंतु एक सर्व काही करते तरी सगळ्यांना समान हक्क देण्याचा प्रयत्न करते, तर दुसरी काहीही करत नाही तरीही त्या प्रॉपर्टीवर स्वतःचाच अधिकार गाजवण्याचा प्रयत्न करते. जमिनी विकून लोक श्रीमंत झाली. आपल्या कुटुंबासाठी झटतोय कोण आणि त्या प्रॉपर्टीवर हक्क गाजवतोय कोण? अशी आज परिस्थिती निर्माण झालेली आहे.
(सत्यघटनेवर आधारित)
कोविड महामारी दरम्यान संसर्ग झालेल्या लोकांना हृदयरोगांचा धोका सर्वाधिक मुंबई: गेल्या वर्षातील आकडेवारी पाहिल्यास असे…
पुणे : विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात गुन्हेगारीचं क्षेत्र वाढतं चाललं आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या…
मुंबई : झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवर पाच वर्षांपूर्वी 'देवमाणूस' (Devmanus) ही मालिका सुरु झाली…
मुंबई: "भिऊ नको मी तुज्या पाठीशी आहे" संकट काळात स्वामी समर्थांच हे वाक्य जगण्यासाठी नवी…
शिबानी जोशी जगभरात आज मराठी माणूस पोहोचला आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशात शिक्षणाच्या निमित्ताने, नोकरीच्या…
वर्षा फडके - आंधळे जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण पर्व ठरणारी ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल…