- गुलदस्ता : मृणालिनी कुलकर्णी
आयुष्यभर ज्ञानग्रहण करून आपल्या यशस्वी जीवनाचा पाया रचणारे माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन १५ ऑक्टोबर हा ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा केला जातो. तसेच १५ ते २२ ऑक्टोबर असा काही विद्यापीठांत ‘वाचन प्रेरणा सप्ताह’ साजरा केला जातो.
शिक्षणाची वा श्रीमंतीची कोणतीही पार्श्वभूमी नसताना देखील एका सर्वसामान्य कुटुंबात अत्यंत गरिबीत वाढलेला मुलगा भारतातील सर्वोच्च पुरस्कार पटकावून भारतातील सर्वोच्च स्थानावर बसतात, असे ते भारतरत्न, माजी राष्ट्रपती, ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. अब्दुल कलाम!
डॉ. कलाम यांचे शिक्षक विविध धर्माचे असल्याने ते धर्मनिरपेक्ष वातावरणात वाढले. दुर्दम्य इच्छाशक्ती, ठाम आत्मविश्वास, नितळ मन आणि दिलदार स्वभाव हे डॉ. कलमांचे वैशिष्ट्य होते. लेखन-भाषणातून व्यक्त होणारे सकारात्मक, प्रगल्भ विचार सर्वांच्याच मुख्यतः युवापिढीच्या मुलांमध्ये चैतन्य, आशावाद आणि प्रेरणा निर्माण करीत होते. मुलांमध्ये राष्ट्रभक्तीचे बीज पेरत होते.
डॉ. कलामांनी सदैव आपल्या कृतीतून समाजाला प्रेरणा दिल्याने ते देशाचे आदर्श ठरले. त्यांच्या मोठेपणाचे बीज वाचनात दडले आहे. आयुष्यभर ज्ञानग्रहण करून आपल्या यशस्वी जीवनाचा पाया रचणाऱ्या डॉ. अब्दुल कलामांची स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने त्यांचा जन्मदिन १५ ऑक्टोबर हा ‘वाचन प्रेरणा दिन’ ते २२ ऑक्टोबर असा काही विद्यापीठांत सप्ताह साजरा केला जातो.
देश शक्तिशाली होण्यासाठी डॉ. कलाम म्हणत, विद्यार्थी आणि समाजातील इतर घटकामध्ये अवांतर वाचनाची आवड निर्माण होणे गरजेचे आहे. अवांतर वाचनाने मिळणाऱ्या संदर्भामुळे व्यक्तिगत/व्यक्तिमत्त्व आणि भाषा विकास हे उद्दिष्ट साध्य होते.
स्वामी विवेकानंद ग्रंथालयातून रोज एक पुस्तक वाचीत. पुस्तकच माणसाला समृद्ध करतात. राजमाता जिजाऊने बाल शिवाजीला पराक्रमाच्या गोष्टी सांगून त्याच्या शौर्याला आकार दिला होता. दलित असल्यामुळे आंबेडकरांनी ‘पुस्तक माझा मित्र’यातूनच नव्या आयुष्याला सुरुवात करताना, वाचनातूनच त्यांना समाजाची विचारधारा, स्वतःच्या कार्याची दिशा गवसली. दबलेल्या समाजाला मुख्य प्रवाहात आणायचे असल्यास वाचनाशिवाय दुसरा पर्याय नाही. बहिणाबाईंच्या कविता लोकांनी लिहून ठेवल्यामुळे त्यांचा जीवानुभव समजला.
पुस्तकांचे जगचं विलक्षण आहे. शांतपणे, निवांतपणे वाचनाचा आनंद घेताना, पुन्हा मागची पाने वाचण्यात गुंग होतो. वाचनामुळे स्मरणशक्ती, एकाग्रता वाढते. एखादे पुस्तक, पुस्तकातले पान आयुष्य बदलवतं. एक वाक्य आयुष्याचे धेय ठरू शकतं. एवढी ताकद त्या वाचनात आहे. रामायण, महाभारत, भगवतगीता, पंचतंत्र यांतून भारतीय जीवनमूल्य प्रतिबिंबित होतात.
मुलांना वाचनाची गोडी लागण्यासाठी छोट्या पुस्तकांपासून सुरुवात करावी. त्यांना त्याच्या आवडीच्या विषयाचे काहीही वाचू दे. पुस्तक हातात घेणं, बघणं, चाळणं हे महत्त्वाचे आहे. त्यासाठी सहज हाताला लागतील अशी वृत्तपत्रे, मासिके पुस्तके पसरलेली असावीत. हा पसारा नव्हे; संधी द्या. पुस्तक प्रदर्शनात मुक्तपणे फिरू दे. नाहीतर कार्टूनमधले हिरोच त्यांचे खरे हिरो होतील.
वाचन संस्कृती रुजावी या हेतूने वाचन प्रेरणा दिनी विविध चर्चासत्र, वाचन कट्टा, ग्रंथ प्रदर्शन, पुस्तक भिशी, वाचू आनंदे वर्गाचे आयोजन केले जाते. आज वाचनाची माध्यम बदलली आहेत. आज जगात कोणत्या देशांत काय चाललेय हे इंटरनेटवरून जाणून घेतात. वाचन मग ते छापील, ई-पुस्तक, संकेत स्थळाचे गुगल, यूट्यूब कोणतेही असो वाचनाची सवय लागणे, काय वाचावे हे समजणे महत्त्वाचे! भारतातील ग्रंथालयाचे जनक शियाली रामामृत रंगनाथन आहेत.
२०२३ चा राष्ट्रीय वाचनदिनाची थीम ‘देशीय भाषा’! भारताच्या ‘विविधता मे एकता’ या संस्कृतीत भारतातील अनेक भाषाचा परिचय व्हावा. त्या भाषा जिवंत राहण्यासाठी अनुवादित पुस्तके वाचा. भाषेतून देश समृद्ध होत जातो. कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी बक्षिसाची रक्कम कन्नड भाषेच्या विकासासाठी दिली. ते म्हणाले, भाषा टिकली तर वाचक टिकेल.
‘अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष विल्सन यांनी २१ वर्षांचे होण्यापूर्वी एक हजार ग्रंथाचे वाचन केले होते. वाचन-मनन-चिंतन या वाचनाच्या पायऱ्यातून माणसाच्या जाणिवा विस्तारल्या जातात. अनेक यशस्वी लोकांची चरित्र वाचताना त्याचा स्वतःवरील आत्मविश्वास, कामाची पद्धत, अपयशावर कशी मात केली यातून प्रेरणा मिळते. शिवरायांच्या आग्र्याहून सुटकाच्या प्रेरणेने सुभाषबाबू कोलकाता सोडून देशाबाहेर गेले.
प्रेरणा म्हणजे स्फूर्ती मिळणे, चालना देणे, साध्यापर्यंत पोहोचण्याचे सामर्थ्य देणे. पुस्तकांत नवसंजीवनी देण्याचे अलौकिक सामर्थ्य असते. जगभरात असंख्य पुस्तकांनी असंख्य लोकांना प्रेरणा दिल्या आहेत.
काही वाचक प्रतिक्रिया –
१. घरची गरिबी, आजारपण, कष्ट असूनही स्वाभिमानी आणि मायाळू श्यामच्या आईने छोट्या-छोट्या कृतीतून श्यामवर केलेले संस्कार आपल्याला प्रेरणा देतात.
२. कलामांनी प्रमुख म्हणून कोणावर आपले मत लादले नाही. (अग्निपंख) आपल्या सहकाऱ्यांना समजून घेतले. हे त्यांचे डोळस अध्यात्म आदर्श जीवन जगण्याचे धडे देते.
३. एका दरिद्री घरातल्या कृष्णवर्णीय (एक होता कार्व्हर) मुलाने कृषिक्षेत्रात घडविलेली क्रांती मार्गदर्शक ठरते.
४. किर्लोस्कर मासिकांनी त्या काळांत अनेकांच्या जीवनाला एक नवे
वळण दिले.
५. ‘अरुणिमा सिन्हा’ एव्हरेस्ट सर करणारी पहिली भारतीय अपंग महिलेची शौर्याची कहाणी.
६. आपल्यातील लपलेल्या अप्रकट आंतरिक शक्तीची जाणीव
‘सिक्रेट’ वाढविते.
७. हॉस्टेलमध्ये शरदचंद्र चटोपाध्यायांच्या कादंबऱ्या चोरी होत असत. वाचून झाल्यावर ते पुस्तक जागेवर मिळे.
सकाळ वृत्तपत्राच्या अंतर्गत ‘मी सध्या हे वाचत आहे’ यात वाचक लिहितात. ज्ञानेश्वरी, ययाती, मृत्युंजय, कोल्ह्याट्याचे पोर, बलुतं, इडली ऑर्किड आणि मी, मन ही हैं विश्वास, गरुडझेप, प्रकाश वाटा, ‘हॅपी थॉट’ …लेखक संपादक उत्तम कांबळे लिहितात, समाजजीवनात पुस्तके लढण्याची क्षमता निर्माण करतात. नवा दृष्टिकोन देतात.
वाचन नवनिर्मितीक्षम असावे. जागतिक पातळीच्या दृष्टीने पूर्वसंस्कार पूर्वग्रह, पूर्वानुभव यावर पुन्हा विचार व्हावा. जेथे पोकळी असते तेथे नवनिर्माण होते. शिक्षणाचा खरा अर्थ पोकळी शोधून भरून काढणे. विचार विस्तारले पाहिजेत.
१. आजच्या जगात टिकण्यासाठी, जसे मोडेन पण वाकणार नाही, आज वाकणं हे मोडण्यापेक्षा चांगलं!
२. अंथरून पाहून पाय पसारा त्याऐवजी पाय पसारा नि अंथरून वाढवा. अग्निपंखमध्ये कलाम म्हणतात, ‘जेव्हा एैरण होशील तेव्हा घाव सोस आणि हातोडा होशील तेव्हा घाव घाल.’ यासाठी मानसिक सक्षम असणे ही काळाची गरज आहे. सगळ्यांत महत्त्वाचे, विचार करण्याची ताकद गमावली की नैराश्य येते. त्यासाठी योग्य पुस्तकांची निवड हवी.
वाचनाला वय नसते. वाचन ही एक शक्ती तुम्हाला अडचणीत, नैराश्यांत, अभ्यासांत, सुधारण्यास मदत करते. त्यासाठी ‘वाचाल तर वाचाल.’
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra