- नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे
‘पारसमणी’ हा १९६३ साली आलेला सिनेमा. खरे तर हा एक फँटसी सिनेमा होता. त्याचे अर्धे चित्र कृष्णधवल आणि उरलेले इस्टमन कलरमध्ये झाले होते. सिनेमा चांगला चालला. त्यामुळे त्याचा तमिळ रिमेक, खरे तर तमिळमध्ये डबिंग, होऊन तो दक्षिणेतही रिलीज १९६४ला होता!
एका सेनापतीचा मुलगा, त्याचे जहाज वादळात सापडल्याने अज्ञात बेटावर सापडतो. तेथील गरीब माणूस त्याचे पालनपोषण करतो. तरुणपणी तो एक कुशल तलवारबाज योद्धा आणि उत्तम गायकही होतो. त्याच्या गायनकौशल्याची कीर्ती राजापर्यंत पोहोचते.
राजा त्याच्या गाण्याचा कार्यक्रम राजवाड्यात ठेवतो. गाणे एकूण खूश झाल्यावर राजा त्याला ‘हवे ते मागायला’ सांगतो. दरम्यान हा नायक आधीच राजकन्येच्या प्रेमात पडलेला आहे. तो तिच्याशी लग्नाची इच्छा राजाकडे प्रांजळपणे व्यक्त करून टाकतो. राजा संतापतो. तो नायकाला दंड देण्याचे ठरवतो. मात्र इथे कथेतील फँटॅसीचा भाग सुरू होतो.
राजाला एक शाप आहे. जेव्हा राजकन्येचा विवाह होईल तेव्हा त्याला मृत्यू येणार असतो. त्यावर उपाय म्हणजे पारसमणीचे दर्शन! जर अत्यंत अमूल्य आणि अप्राप्य असलेले पारसमणी हे रत्न राजाला मिळाले, तर मात्र तो वाचणार असतो. मग राजा ‘ते रत्न आणून दे तर तुझे लग्न राजकन्येशी लावून देईन’ असे आश्वासन देऊन नायकाची बोळवण करतो. सेनापती पुत्राने अनेक संकटांना तोंड देऊन या अटीची केलेली पूर्तता म्हणजे हा सिनेमा!
कलावंत होते – काहीशी माला सिन्हासारखी दिसणारी गीतांजली साधाभोळा महिपाल, नलिनी चोणकर, मारुती राव, उमा दत्ता, पोरगेलेशी अरुणा इराणी, जुगल किशोर आणि एका गाण्यापुरती येऊन गेलेली हेलन. निर्माते होते बच्चूभाई मिस्त्री आणि पंडित मधुर, तर दिग्दर्शन केले बाबुभाई मिस्त्रींनी.
पारसमणीचे अत्यंत मधुर संगीत होते लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचे. त्याची जबरदस्त लोकप्रिय झालेली एकापेक्षा एक अशी गाणी लिहिली होती असद भोपाली यांनी! या गाण्यांचा ‘लोकप्रियतेनुसार क्रम लावा’ असे सांगितले, तर जुन्या रसिकांनाही ते अवघड जाईल इतकी सगळीच गाणी लोकांच्या ओठावर बसली होती. मग ते लतादीदीने गायलेले “मेरे दिलमें हल्कीसी, वो खलीश हैं, जो नहीं थी’, असो ‘उई माँ, ऊई मां ये क्या हो गया, उनकी गलीमे दिल खो गया” असो किंवा दीदीने कमल बारोट यांच्याबरोबर गायलेले “हसता हुआ नूरानी चेहरा, काली जुल्फें, रंग सुनेहरा” असो. एकापेक्षा एक गाणी! याशिवाय दीदीने रफीसाहेबांबरोबर गावून अमर केलेले “वो जब याद आये, बहुत याद आये” तर लोकप्रियतेच्या शिखरावर होते.
ज्या कुणाचे जीवलग माणूस कायमचे दुरावले किंवा हरवले असेल आणि त्याची एखादी आठवण सुखद असेल, तर ती म्हणजे हळव्या मनाने भूतकाळाला पुन्हा दिलेली भेट असते आणि जर ती दु:खद असेल, तर त्याचा अर्थ जुनी जखम अजून भरून आलीच नाहीये असा असतो. असद भोपालींनी या गाण्यातून जणू हिंदी समजणाऱ्या सर्वांनाच एका कायमच्या दिलाशाची सोय करून ठेवली आहे. या अत्यंत भावुक गीताचे शब्द होते –
वह जब याद आए,
बहुत याद आये,
गमे ज़िन्दगीके अँधेरेमें हमने,
चिरागे मुहब्बत जलाये बुझाए…
वह जब याद आए…
जीवनात तिच्या/त्याच्या जाण्याने जणू सगळा अंधार पसरला होता. त्यात मी आमच्या प्रेमाची ज्योत पेटवून पाहिली, न राहवून ती विझवूनही टाकली पण काही उपयोग झाला नाही, तिची आठवण तर अजूनच तीव्रतेने येतच राहिली.
कधी तिची चाहूल जाणवली, तर कधी ती येणार होती, ती वाट उजळून निघाली आहे असे वाटून गेले. मी माझ्या अस्वस्थपणे धडधडणाऱ्या हृदयाला मुठीत धरून उभा राहिलो पण तिचे येणे काही झाले नाही. कित्येकदा तर माझ्या वेड्या मनाला असाही भास झाला की, इतके दिवस अंतर ठेवल्याबद्दल नजर झुकवून, संकोचून तीच मला भेटायला येते आहे. पण जेव्हा जेव्हा तिची आठवण आली, मला जीवघेण्या जाणिवेने अस्वस्थ करून गेली –
आहटें जाग उठीं रास्ते हंस दिए,
थामकर दिल उठे हम किसीके लिए…
कई बार ऐसा भी धोखा हुआ हैं,
चले आ रहे हैं वो नज़रे झुकाए…
वह जब याद आए बहुत याद आये…
दीदीच्या आवाजातल्या ओळी अगदी स्त्रीसुलभ भावना व्यक्त करणाऱ्या होत्या. ‘ती’ म्हणते, ‘त्याच्या आठवणीने माझ्या डोळ्यांतून अश्रूंची धारच लागली. तडफडणाऱ्या मनात जणूकाही आगच लागली! लोकही मला काय काय बोल लावू लागले! पण कधीकधी मात्र मला रडतानाही हसूच आले. कारण मी त्याचा चेहरा आठवू लागले, तर तो जणू माझ्याकडे बघून स्मितहास्य करताना दिसत होता-
दिल सुलगने लगा अश्क बहने लगे,
जाने क्या क्या हमें लोग कहने लगे…
मगर रोते रोते हंसी आ गयी हैं,
खयालोंमें आके वह जब मुस्कुराये…
वह जब याद आए…
नायकाच्या तोंडी पुन्हा भोपालीजींनी उत्कट प्रेमभावना व्यक्त केली होती. प्रियकर प्रांजळपणे सांगतो, ‘तिच्या जाण्याने जणू जीवनातला अर्थच निघून गेला. आयुष्याची ज्योत तर जळतच होती पण मला कुठेच अधुंकसाही प्रकार दिसत नव्हता. मी मनाला कितीतरी प्रकारे दिलासा देण्याचा प्रयत्न केला. पण त्याला कशानेच चैन पडेना…
वो जुदा क्या हुये ज़िन्दगी खो गयी,
शमा जलती रही रौशनी खो गयी…
बहुत कोशिशें की, मगर दिल न बहला,
कई साज़ छेड़े कई गीत गाये,
वो जब याद आए…
खरेच तो उत्कट प्रेमाचा, खरे तर प्रेमासाठी अतिशय कठीण असलेला, काळ आठवला, त्या हूरहूर लावणाऱ्या प्रेमकथा आठवल्या आणि ती कानातून थेट मनात शिरून सगळी जाणीव ताब्यात घेणारी गाणी आठवली की, सगळ्या आठवणी जातच नाहीत. जाऊच नयेत, असेही वाटत राहते.
कारण अनेकदा त्यातली एक ओळ केवढा तरी आनंद देऊन गेलेली असते –
“खयालोंमें आके वह जब मुस्कुराये…
वह जब याद आए, बहुत याद आये…”
म्हणून तर हा नॉस्टॅल्जिया!